ETV Bharat / city

आजपासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास सुरू; राज्य सरकारची परवानगी

author img

By

Published : Sep 17, 2020, 10:22 PM IST

Updated : Sep 18, 2020, 3:19 AM IST

एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. त्याचा विचार करुन राज्य सरकारने प्रवासी, वाहक आणि चालक यांच्यासाठी काही नियम व अटी निर्धारित करुन एसटीला परवानगी दिली आहे.

state government give permission to st journey starts with full seating capacity from tomorrow
उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास सुरू; राज्य सरकारची परवानगी

मुंबई - पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे व हात निर्जंतुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

20 ऑगस्ट पासून राज्यभरात एसटी बसेस सुरू झाल्या. परंतु, एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवासी घेऊन प्रवास करणे बंधनकारक होते. याबाबत एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारने प्रत्येक प्रवासी व कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे व निर्जंतुक करणे या अटीवर बसेसच्या पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार दिनांक 18 सप्टेंबर पासून सर्व एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळे बंदीच्या काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. नंतर राज्य सरकारच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. सद्यस्थितीला दिवसभरात एसटीच्या सुमारे 5 हजार बसेस राज्यभरात धावत असून या बसेस द्वारे सरासरी 5 ते 6 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाल्यास, भविष्यात कमी बसेसद्वारे जास्तीत जास्त लोकांची ने-आण करणे शक्य होणार आहे.अर्थात, प्रवासादरम्यान प्रत्येकाने मास्क लावणे व आपले हात निर्जंतुक करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर एसटीच्या सर्व बसेस वारंवार निर्जंतुक करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसचा प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Last Updated : Sep 18, 2020, 3:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.