ETV Bharat / city

Ayodhya Tour : रामभूमीवरुन राजकारण; मतांची पोळी भाजण्यासाठीच राजकीय नेत्यांची अयोध्यावारी, पहा कोणते नेते जाणार दौऱ्यावर

author img

By

Published : May 7, 2022, 12:52 PM IST

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यावरुन सध्या राज्यात रणकंदन सुरू आहे.

Political Leaders Visit To Ayodhya
संपादित छायाचित्र

मुंबई - मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्यावरुन राज्यात राजकारण तापले आहे. आता अयोध्या दौऱ्यावरुन राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि मनसेकडून अयोध्या दौरा निश्चित करण्यात आला. तर राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय पक्षांच्या अयोध्या दौऱ्याचा मुद्दा राजकारण ढवळून काढेल, असे मत विश्लेषक व्यक्त करत आहेत.

राम मंदिरावरुन राज्यात रंगणार महाभारत - राम मंदिर, अयोध्या हा मुद्दा नेहमीच देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अयोध्या दौरा आणि राम मंदिर सारख्या मुद्द्यावरुन राज्यात महाभारत होण्याची शक्यता आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यावरुन सध्या राज्यात रणकंदन सुरू असताना, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मुस्लिम आणि हिंदू समाजाने दाखवलेल्या संयमामुळे तशी परिस्थिती राज्यात उद्भवू शकली नाही. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात अयोध्या दौऱ्यावरून राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवार कुटुंबातील सदस्य रोहीत पवार हे देखील आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.

पक्षांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न! - राम मंदिराच्या उभारणीसाठी जवळपास चौदाशे कोटीचा निधी उभारण्यात आला. मात्र त्या निधीचा अद्यापही हिशोब मिळालेला नाही. तसेच राम मंदिर बांधावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी आपल्यामुळेच राम मंदिर बांधण्यात येत आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने देशभरात केला आहे. मात्र राम मंदिर आणि हिंदुत्व यांच्याशी आपली कास घट्ट बांधली गेली आहे, हे दाखवण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगोदर अयोध्याचा दौरा केला होता. मात्र बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेमध्ये झालेला बदल यातून महाराष्ट्रात नवीन व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी राज ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भारतीय जनता पक्षही अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणार असल्याचे बोलले जाते. त्यातून राज्याचे राजकारण ढवळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वच पक्ष राम मंदिर आणि आयोध्या दौऱ्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करेल, असे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आधी भारतीय जनता पक्ष आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युतीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्वाशी नाते तुटल्याची सातत्याने टीका भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेवर होत आहे. तर राज ठाकरे यांनी देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्यांना उत्तर म्हणून शिवसेना नेत्यांनी राज्याचे परिवहन मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा नियोजित करण्यात आला आहे. अद्याप या दौऱ्याची तारीख निश्चित नसली, तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा दौरा केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यासाठी खासदार संजय राऊत यांच्याकडून सर्व बांधणी केली जात आहे. अयोध्या दौऱ्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात असून केव्हाही तारीख जाहीर केली जाईल, असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर शिवसेनेकडे कसे कडवट हिंदुत्व आहे, हे सांगण्याचा प्रयत्न शिवसेना आता करताना पाहायला मिळेल. मात्र याच मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील विरोधकांकडून केला जाणार एवढे मात्र निश्चित.

राज ठाकरे जाणार रामभूमीत - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडणारे राज ठाकरे हे देखील अयोध्या दौरा करणार आहेत. त्यांच्या आयोध्या दौऱ्यासाठी देखील जय्यत तयारी सुरू झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा नियोजनाचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. राज ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या आयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण तापले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्दावरून येणाऱ्या काळात कलगीतुरा रंगणार आहे. त्यातच मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली होती. ही स्तुती करताना ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला होता. त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध - राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आतापासूनच राजकारण तापायला लागला आहे. राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाही, तोपर्यंत राज ठाकरेंना राम जन्मभूमीत पाऊल ठेवू देणार नाही, असा पवित्रा भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या निर्मितीच्या काळात राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत घेतलेली आक्रमक भूमिका अजूनही उत्तर भारतीय नागरिक विसरलेला नाही. मुंबईच्या रस्त्यावर उत्तर भारतीयांना झालेली मारहाण अपमानकारक असल्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच अयोध्येत पाऊल ठेवावे असा इशारा ब्रिज भूषण शरण सिंह यांच्याकडून देण्यात आला आहे.

रोहित पवारांचा आज आयोध्या दौरा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पवार कुटुंबीयांचे सदस्य रोहित पवार हेदेखील आज आयोध्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसापासून उत्तर भारताच्या दौर्‍यावर असलेले रोहीत पवार आज आयोध्या येथे जाऊन राम जन्मभूमीचे दर्शन घेणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.