ETV Bharat / city

आयुक्तांनी कसली कंबर...'संसर्गजन्य आजार' कायद्याची कडक अंमलबजावणी होणार

author img

By

Published : Oct 1, 2020, 6:40 AM IST

आयुक्त इक्बाल सिंह चहल
आयुक्तांनी कसली कंबर...'संसर्गजन्य आजार' कायद्याची कडक अंमलबजावणी होणार

‘कोरोना कोविड – १९’ या संसर्गजन्‍य रोगास प्रतिबंध करण्‍यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांची एक विशेष 'ऑनलाइन बैठक' पार पडली. यामध्ये आयुक्तांनी नव्याने काही आदेश दिले असून कोरोना संदर्भातील नियमांची कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई - शहरातील वाढता कोरोनाचा प्रसार लक्षात घेता नव्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी सील इमारती, इमारतीमध्‍ये प्रवेश करणे व बाहेर जाणे यावर अधिक कठोर निर्बंध घालण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा, यासाठी एसटी महामंडळाकडून १ हजार बसेस भाडेतत्‍वावर मागवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिलीय.

‘कोरोना कोविड – १९’ या संसर्गजन्‍य रोगास प्रतिबंध करण्‍यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांची एक विशेष 'ऑनलाइन बैठक' पार पडली. यामध्ये आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

सील इमारतीमध्‍ये प्रवेश करण्यास, बाहेर जाण्यास निर्बंध

ज्‍या इमारतींमध्‍ये कोणत्‍याही दोन मजल्‍यावर कोरानाबाधित रुग्‍ण आढळून आले किंवा संपूर्ण इमारतीमध्‍ये १० किंवा अधिक रुग्‍ण आहेत, अशा इमारती सील करण्‍याचे आदेश यापूर्वीच देण्‍यात आले होते. या इमारतींमध्‍ये आता अधिक प्रभावीपणे कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबवण्‍याचे निर्देश नव्याने देण्‍यात आले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने इमारतीत प्रवेश करणे व इमारतीतून बाहेर जाणे, यावर अधिक कठोर निर्बंध लागू करण्‍याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्‍याचबरोबर इमारतीमध्‍ये कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक, लिफ्टमन, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्‍याचे आदेश महापालिका आयुक्त चहल यांनी दिले आहेत.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी’

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत करण्‍यात येत असलेले सर्वेक्षण योग्‍य प्रकारे होत असल्‍याची खातरजमा करणे, यासाठी परिमंडळीय उपायुक्‍तांच्‍या स्‍तरावरुन काही व्‍यक्‍तींची नेमणूक करुन त्‍यांच्‍याद्वारे नमूना पद्धतीने सर्वेक्षणाची चाचणी करण्‍याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

खाटा उपलब्‍धतेची अपडेट करा

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुगणालयांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या खाटांचे व्‍यवस्‍थापन अधिक प्रभावीप्रणे साध्‍य व्‍हावे, यासाठी महापालिकेने संगणकीय डॅशबोर्ड यापूर्वीच कार्यान्वित केले आहेत. या डॅशबोर्डवर संबंधित रुग्‍णालयांनी आपापल्‍या रुग्‍णालयातील माहिती नियमितपणे ‘अपडेट’ करणे गरजेचे आहे. मात्र काही रुग्‍णांलयाद्वारे ही माहिती वेळेत अपडेट होत नसल्‍यामुळे खाटांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यात अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन वेळेत माहिती अपडेट न करणा-या रुग्‍णालयांना संबंधित नियमांनुसार नोटीस बजवण्‍याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

वैद्यकीय चाचण्‍या व्‍यापकतेने करण्‍याचे निर्देश

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचण्‍यांची संख्‍या वाढवण्‍याची गरज लक्षात घेऊन सर्व विभागस्‍तरीय सहाय्यक आयुक्‍तांनी आपापल्‍या विभागातील दैनंदिन चाचण्‍यांची संख्‍या नियोजनपूर्वक वाढवण्‍याचे निर्देश देण्यात आले आहेत.

'विना मास्क' = दंडात्‍मक कारवाई

महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांच्‍या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्‍ये बिना ‘मास्क’ वावरणा-या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये २०० याप्रमाणे दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे निर्देश यापूर्वीच देण्‍यात आले आहेत. ही कारवाई अधिक प्रभावीपणे करण्‍यासह व्‍यापकतेने करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले.

एसटी महामंडळाकडून १ हजार बसेस भाडेतत्‍वावर

महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाकडून (एस.टी महामंडळ) १ हजार बसेस बेस्‍ट मार्गांवर चालवण्‍यासाठी भाडेत्‍त्‍वावर घेण्‍यात येत आहेत. याबाबतची माहिती बेस्‍टचे महाव्‍यवस्‍थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बैठकीदरम्‍यान दिली. या अनुषंगाने अधिक नियोजनपूर्वक बसेसचे व्‍यवस्‍थापन करावे असे निर्देश महापालिका आयुक्‍तांनी बैठकीदरम्‍यान दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.