ETV Bharat / city

ड्रग्स विक्रीच्या नफ्यातून एकाची हत्या, अवघ्या बारा तासात तिघे गजाआड

author img

By

Published : Jun 26, 2021, 10:06 PM IST

ड्रग्स विक्रीच्या नफ्यातून झालेल्या वादात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या तीन साथीदारांनी खून केल्याची घटना नवी मुंबईतील जुहू गावात घडली आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या बारा तासात गजाआड केले आहे.

तिघे गजाआड
तिघे गजाआड

नवी मुंबई - ड्रग्स विक्रीच्या नफ्यातून झालेल्या वादात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या तीन साथीदारांनी खून केल्याची घटना नवी मुंबईतील जुहू गावात घडली आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या बारा तासात गजाआड केले आहे.

पार्टनर अधिक नफा कमावत असल्याने केला खून -


जेकब क्रिस्तोपा वै (३३)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचा खून झाल्याची घटना घडली. जेकब हा नवी मुंबई वाशीतील जुहू गाव येथील काळुबाई निवास इमारतीत राहायला आला होता. तो सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात पंधराहून अधिक गुन्हे दाखल होते. तो काही दिवसांपूर्वीच ड्रग्स विक्रीमध्ये सक्रिय झाला होता. ड्रग्स पुरवणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या ड्रग्स मागवायचा व त्याचे साथीदार विजय राठोड (३३), तोहीद खान (३५), सूरज मांढरे (२८) यांच्या साथीने नवी मुंबई परिसरात विक्री करायचा. तिघांना त्यांचा वाटा दिल्यावर उर्वरीत नफा स्वतःला ठेवायचा. जेकब स्वतःला अधिक वाटा ठेवतो म्हणून तिघांमध्ये असंतोष होता. त्यामुळे त्यांचा नेहमी जेकब सोबत वाद होत होता. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ड्रग्सच्या नफ्यातून आलेले पैसे मोजत असताना त्याच्या तिन्ही साथीदारांनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. जबर घाव बसल्याने जेकब जागीच ठार झाला व तिघे घराला कुलूप लावून पसार झाले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला आरोपींचा सुगावा

रात्रीच्या सुमारास हे तिन्ही आरोपी जेकबच्या घरी आले व खिडकीतून डोकावून कांगावा करीत शेजाऱ्यांना बोलावले व जेकब मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले. त्यानुसार रात्री उशिरा वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मात्र तिन्ही आरोपींचे वागणे संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच संध्याकाळी हे तिघेही जेकबच्या घराच्या बाजूला संशयास्पद फिरत होते. पोलीसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या 12 तासात तपास केला आहे.

हेही वाचा - राज्याची सूत्रे आमच्या हाती दिल्यास तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण देऊ; अन्यथा राजकीय संन्यास घेईल - फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.