ETV Bharat / city

नारायण राणे हे दुधारी शस्त्र, मंत्रिपद मिळाल्याने आक्रमक स्वभावाची अडचण होणार?

author img

By

Published : Jul 9, 2021, 7:24 PM IST

नारायण राणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत नारायण राणे यांचे वाद होत राहीले. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नारायण राणेंजवळ राजकीय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेतल्याशिवाय इतर पर्याय उरलेला नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

नारायण राणे
नारायण राणे

मुंबई - नारायण राणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत नारायण राणे यांचे वाद होत राहीले. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नारायण राणेंजवळ राजकीय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेतल्याशिवाय इतर पर्याय उरलेला नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

नारायण राणे पुन्हा एकदा पॉवरमध्ये!

मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद तर, इतर तीन जणांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला गेला. नारायण राणे यांचा राजकीय इतिहास पाहिला तर, शिवसेनेत असताना नारायण राणे यांचे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेले वाद हे सर्वश्रुत आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत नारायण राणे यांचे कधीही पटले नाही. त्यामुळेच नारायण राणे यांना 2005 साली शिवसेना पक्ष सोडावा लागला. त्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेस पक्षातही नारायण राणे यांचे राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यांच्यासोबत कधीही जमलं नाही. आपल्या भूमिकेशी ठाम असणाऱ्या नारायण राणेंनी काँग्रेस पक्षातील पक्षश्रेष्ठींच्या विचारांना कधीही किंमत दिली नाही. त्यामुळे अखेर काँग्रेस पक्षातूनही नारायण राणे यांना बाहेर पडावे लागले. 2019 लोकसभा निवडणुकीआधी नारायण राणे यांनी आपला "स्वाभिमानी पक्ष" भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला आणि राज्यसभेवर भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून गेले. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी दिली. लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्यांचा कारभार आता नारायण राणे हे पाहणार आहेत. नारायण राणे पुन्हा एकदा पॉवरमध्ये आल्याने आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तसेच पक्षश्रेष्ठींना जुमानतील का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

नारायण राणे हे एक आक्रमक नेते

नारायण राणे यांचा स्वभाव पाहता त्यांच्या भूमिकेविरोधात असणाऱ्या नेत्यांना नारायण राणे फारसे महत्त्व देत नाहीत. नारायण राणे यांची वेगळी शैली आहे. त्या शैलीमुळे अनेक वेळा त्यांना राजकीय नुकसानही झाले. मात्र त्याच शैलीमुळे नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री पदावर वर्णी लागली हे देखील तेवढेच खरे. त्यामुळे पक्ष शिस्तीला महत्त्व देणारा भारतीय जनता पक्षात नारायण राणे हे स्वतःला कसे सामावून घेतील किंवा त्यांच्या शैलीमुळे भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेते तसेच दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यांच्याशी देखील खटके उडतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. नारायण राणे हे एक आक्रमक नेते आहेत. ज्या पक्षात ते काम करतात त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कालांतराने ते जुमानत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांना पुढच्या काही दिवसात याची प्रचिती येऊ शकेल, असं ईटीव्ही भारतशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. तसेच नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी दबक्या आवाजात शंका व्यक्त केली आहे. मात्र उघडपणे बोलण्यास भाजपचे नेते सध्यातरी तयार नाहीत.

'राणेंकडे जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही'
नारायण राणे हे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यामध्ये असलेली आक्रमकता आता भारतीय जनता पक्षात दाखवू शकणार नाहीत. सध्या नारायण राणेंची राजकीय परिस्थिती पाहता केंद्रीय मंत्रिपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा स्वभाव जरी आक्रमक असला तरी, आता त्यांना काहीसं नमतं घ्यावं लागेल, असे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडले आहे. राणेंना दुसरा राजकीय पर्याय उरला नसल्याने भारतीय जनता पक्षात त्यांना जुळवून घ्यावे लागेल, असेही अजय वैद्य यांनी सांगितले.

भविष्यात युती करावी लागली तर, राणेंमुळे अडचण होईल?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिनही पक्षाने एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले असले तरी, भविष्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल, अशी आशा दोन्ही पक्षांमधील काही नेत्यांमध्ये अजूनही आहे. भविष्यात असे घडल्यास युती करण्यासाठी नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेचे असलेले वाद हे अडसर ठरणार आहेत. त्यामुळे आता जरी नारायण राणे यांचे हात भारतीय जनता पक्षात बळकट करण्यात आले असल्याने याची अडचण भविष्यात भारतीय जनता पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - NEW PRIVACY POLICY अंमलबजावणीकरता व्हॉट्सअपचे पुन्हा एक पाऊल मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.