ETV Bharat / city

मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेविरोधात हरकतींचा पाऊस, ८१२ सूचना व हरकती

author img

By

Published : Feb 14, 2022, 10:29 PM IST

मंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने प्रभाग पुनर्रचना केली आहे. त्यावर शेवटच्या दिवशी सूचना व हरकतींचा पाऊस पडला आहे. एकाच दिवसात ४५१ तक्रारी दाखल झाल्या असून आतापर्यंत एकूण ८१२ सूचना व हरकती आल्या आहेत.

bmc
bmc

मुंबई - मंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने प्रभाग पुनर्रचना केली आहे. त्यावर शेवटच्या दिवशी सूचना व हरकतींचा पाऊस पडला आहे. एकाच दिवसात ४५१ तक्रारी दाखल झाल्या असून आतापर्यंत एकूण ८१२ सूचना व हरकती आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी पश्चिम उपनगरात ३३९, त्या खालोखाल पूर्व उपनगरात २६३ तर, शहर विभागात सर्वात कमी म्हणजेच ७६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सूचना व हरकतींवर २२ फेब्रुवारीपासून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या समितीपुढे सुनावणी घेतली जाणार असून २ मार्चला निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला जाणार आहे.

हेही वाचा - अभियांत्रिकीच्या नवीन शाखांना मागणी ४० हजार जागांना मान्यता

अशा आहेत तक्रारी -

एकाच प्रकारच्या तक्रारी एकत्र करून ग्रुप करून सुनावणी केली जाईल. आलेल्या तक्रारींमध्ये वॉर्ड सीमारेषा चुकीची नोंद केली आहे, प्रभाग लोकसंख्या १० टक्के पेक्षा कमी जास्त आहे, इतर तक्रारी अशा स्वरुपाच्या बहुसंख्य तक्रारी आहेत. माटुंगा येथील सुप्रसिद्ध असलेले पाच उद्यान आमच्या विभागात असावे, अशीही तक्रार आहे. ४ ते ५ वॉर्डमधील म्हणजेच जी साऊथ नॉर्थ, एफ साऊथ नॉर्थ, आर सेंट्रल आर नॉर्थ या विभागांमधील काही प्रभाग इतर वॉर्डच्या हद्दीत गेले आहेत. सध्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्याची साईड व्हिजिट सुरू आहे. २२ फेब्रुवारीपासून ४ दिवस या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. एका दिवसाला ५ ते ६ वॉर्डमधील सुनावणी केली जाईल. सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने कमिटी नियुक्त केली आहे. ही कमिटी सुनावणीची जागा ठरवेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

प्रभाग पुरर्रचना -

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. ९ मार्चला महापौरांची निवड झाली. हा कालावधी येत्या ८ मार्चला संपत आहे. ही निवडणूक ८ मार्चआधी घेणे अपेक्षित होते. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रसार असल्याने तसेच, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असल्याने निवडणूक एप्रिल महिन्याच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ता असताना भाजपाने आपल्या सोयीची प्रभाग रचना केली होती. त्यामुळे, त्यांचे नगरसेवक जास्त संख्येने निवडून आले, असा आरोप करत पुन्हा प्रभाग रचना नव्याने करण्यात आली आहे. मुंबईमध्ये २२७ प्रभाग होते, लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने त्यात ९ ने वाढ करून २३६ प्रभाग केले आहेत. त्यानुसार नव्याने प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या प्रभाग रचनेचा मसुदा पालिकेने आपल्या वेबसाईटवर १ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला आहे.

कमिटीपुढे सुनावणी -

प्रभाग पुनर्रचनेबाबत सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, कोंकण विभागीय आयुक्त, मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्त यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या पुढे आलेल्या ८१२ सूचना व हरकतींवर १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी घेण्यात येईल व त्याचा अहवाल २ मार्चला निवडणूक आयोगाला सादर केला जाईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

तक्रारीची संख्या वाढली -

मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्याआधी भाजपा शिवसेनेच्या सरकारने २०१६ मध्ये प्रभाग पुनर्रचना केली होती. त्याविरोधात ६१३ सूचना व हरकती आल्या होत्या. महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. त्याआधी प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. त्या विरोधात ८१२ सूचना व हरकती आल्या आहेत.

या विभागात सर्वाधिक तक्रारी -

पालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील के ईस्ट विभागात ८५, एम ईस्ट विभागात ८४, आर साऊथ विभागात ७६, कुर्ला एल विभाग ६३ तक्रारी आल्या आहेत. तर कुलाबा फोर्ट ए विभागात एकही तक्रार आलेली नाही. बी विभागात २, पी साऊथ विभागात २, जी नॉर्थ विभागात ३, सी विभागात ४, डी विभागात ५, ई विभागात ६ तसेच, एस विभागात ६ तक्रारी नोंद झाल्या आहेत.

मुंबईत महापालिका एकूण वॉर्ड २३६

ओपन २१९

एससी १५

एसटी २

महिलांसाठी राखीव

एकूण ११८

एससी ८

एसटी १

हेही वाचा - जिनोम सिक्वेन्सिंगच्या नवव्या फेरीचा अहवाल, मुंबईत ९५ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.