ETV Bharat / city

सचिन वाझे प्रकरण समोर करून, डेलकर प्रकरण दाबण्याचा भाजपचा डाव - पटोले

author img

By

Published : Mar 16, 2021, 5:38 PM IST

सचिन वाझे प्रकरण समोर करून, डेलकर प्रकरण दडपण्याचा भाजपचा डाव आहे. ज्या राज्यात भाजप विरोधी सरकार सत्तेत आहे, तेथे भाजपकडून 'ईडी' आणि 'एनआयए' या पोपटांचा वापर केला जात आहे. असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले
नाना पटोले

मुंबई - सचिन वाझे प्रकरण समोर करून, डेलकर प्रकरण दडपण्याचा भाजपचा डाव आहे. ज्या राज्यात भाजप विरोधी सरकार सत्तेत आहे, तेथे भाजपकडून 'ईडी' आणि 'एनआयए' या पोपटांचा वापर केला जात आहे. असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

वीजबिल सवलतीबाबत लवकरच अहवाल

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये कृषी, वीजबिल, महामंडळ अशा विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे, आमचा कोणत्याही विषयावर वाद नव्हता, आणि भविष्यातही राहणार नाही. वीजबिल सवलतीबाबत ऊर्जा विभागाकडून मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवला आहे. अहवाल प्राप्त होताच तात्काळ निर्णय घेतला जाईल.

पोलीसायुक्तांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना

राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत पटोले म्हणाले की, पोलीसायुक्तांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत, त्यामुळे कोणाची बदली कुठे करायची? याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र सध्या तरी खांदेपालटबाबत कोणतीही चर्चा नाही. ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी तुम्हाला कळेलच असेही यावेळी पटोले म्हणाले.

कर नाही, त्याला डर कशाला

सचिन वाझे प्रकरणाच्या आडून खासदार मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पुलवामा घटनेची एनआयएमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल एनआयएने अद्याप दिलेला नाही. का दिला नाही, कोण होते मागे हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र मुंबई पोलिसांचे कौतुक संपूर्ण जगामध्ये केले जाते. त्याच पोलिसांना आणि राज्य सरकारला कशा पद्धतीने बदनाम केले जात आहे, हे संपूर्ण जग पाहात आहे. त्यामुळे आमच्यासाठी 'एनआयए' काही नवीन विषय नाही. ज्या ठिकाणी भाजपविरोधी सरकार असेल तिथे ईडी आणि एनआयए हे पोपट येणारच. त्यामुळे ज्याला कर नाही, त्याला डर कशाला ही आमची भूमिका आहे. वाझे असो किंवा अन्य कोणी कोणालाही सरकार पाठिशी घालणार नाही. मात्र राज्यातील भाजपकडून पोलिसांचा जो आपमान केला जात आहे, तो आम्ही कदापी सहन करणार नाही.

हेही वाचा जामनेरमध्ये कोविडपेक्षा गैरसोई भयंकर, कोविड सेंटरमधून १५ रुग्ण पळाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.