ETV Bharat / city

मराठा उमेदवारांच्या नोकरभरतीच्या प्रश्नावर लवकरच बैठक - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Dec 15, 2020, 3:40 PM IST

मराठा आरक्षणांतर्गत उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत काय तोडगा काढता येईल, यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. त्या मंगळवारी मुंबईत बोलत होत्या.

Supriya Sule Latest News
खा. सुप्रिया सुळे

मुंबई - मराठा आरक्षणांतर्गत उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत काय तोडगा काढता येईल, यासाठी आंदोलकांच्या वकिलांकडून कागदपत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही कागदपत्र मिळाल्यावर अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे उमेद या संस्थेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतही बैठक घेतली जाईल असे सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या मराठा तरुणांच्या आंदोलनाला भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या.

आझाद मैदानामध्ये मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन

राज्यात मराठा आरक्षण लागू केल्यानंतर त्यानुसार राज्यात भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. यामध्ये मराठा समाजातील काही तरुणांची एसईबीसीच्या अंतर्गत नोकर भरती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती झाल्यानंतर त्याचे परिपत्रक काढून सुद्धा कोरोना संक्रमण असल्यामुळे त्यांची नियुक्ती पुढे ढकलण्यात आली. यातच मराठा आरक्षणाचा वाद सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. मात्र ज्या मराठा समाजांच्या तरुणांची भरती करण्यात आली आहे, त्यांना नोकरीत संरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये मराठा तरुणांचे आंदोलन सुरू आहे.

सुप्रिया सुळेंची आंदोलनाला भेट

या आंदोलनाला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, तरुणांना स्थिरता हवी आहे. कोणतेही सरकार असले तरी लोकांना त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करणे सरकारचे काम असते. त्यानुसार त्यांचे म्हणणे आणि प्रश्न मी ऐकून घेतले आहेत. त्यांचे म्हणणे आणि त्यांच्या वकिलांचे म्हणणे यात काही तफावत आहे. त्यांच्या वकिलांना कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ती कागदपत्रे आली की याबाबत अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा उमेदवारांच्या नोकरभरतीच्या प्रश्नावर लवकरच बैठक

सरकार विरोधात घोषणाबाजी

कालच आमदार नितेश राणे यांनी सरकार आरक्षण देत नसल्याने त्यांच्याशी संवाद साधू नका. आरक्षण मागून मिळत नसल्यास ते खेचून घ्या, आंदोलन करून प्रश्न सुटणार नाही वेगळा मार्ग अवलंबा असे आवाहन केले होते. त्यानंतर आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी भेट देताच सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नरेंद्र पाटील, विरेंद्र पवार यांनी सुळे यांच्याशी चर्चा केल्यावर आंदोलकांनी आपले प्रश्न सुळे यांच्यासमोर मांडले.

'उमेद'साठीही बैठक

दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळ म्हणजेच 'उमेद' मध्ये काम करणाऱ्या ८४ लाख महिला कर्मचाऱ्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन लागू करावे, दरमहा ५ तारखेपूर्वी मानधन मिळावे, बाहेरच्या संस्थेकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हस्तांतरण करू नये, या मागणीसाठी आझाद मैदानातं आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान अधिवेशन संपल्यावर संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी या महिलांना दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.