ETV Bharat / city

तपास यंत्रणांकडून मानसिक छळ होतोय; मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे केली होती तक्रार

author img

By

Published : Mar 6, 2021, 10:14 AM IST

Updated : Mar 6, 2021, 1:32 PM IST

मनसुख हिरेन यांचा तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ केला जात होता. अशी तक्रार मृत्यूपूर्वी स्वत: मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली होती.

मनसुख हिरेन
मनसुख हिरेन

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी मृतदेह आढळला होता. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुतीचे होत असताना या प्रकरणात आणखी एक खुलासा समोर आला आहे. मनसुख हिरेन यांचा तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ केला जात होता. अशी तक्रार मृत्यूपूर्वी स्वत: मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली होती.

मनसुख हिरेन यांचे एक पत्र माध्यमांच्या हाती लागले आहे. यामध्ये पोलीस आणि काही माध्यम प्रतिनिधींकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार त्यांनी मुंबई, ठाणे पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. २ मार्चला त्यांनी हे पत्र लिहिले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गुढ आता आणखी वाढले आहे.

काय म्हटले आहे पत्रात-

विविध पोलीस ठाण्यातून चौकशीच्या नावाने मानसिक छळ केला जात असल्याचे हिरेन यांनी पत्रात म्हटले आहे.

हिरेन यांचा ठाण्यात स्वत:चा कार अॅक्सेसेरीजचा व्यवसाय आहे. मी एक शांत स्वभावाचा व्यक्ती असून आजपर्यंत माझा कोणत्याही गुन्हाशी संबंध आला नसल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

१७ फेब्रवारीला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मी ठाण्यावरून कामानिमित्त मुंबईला जात होतो. त्यावेळी माझ्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नेहरू उड्डाणपुलाजवळ गाडी लावून मी पुढे टॅक्सीने मुंबईला गेलो होतो. त्यानंतर यायला उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी मेकॅनिकची मदत घेऊन गाडी घेऊन जाण्याचा विचार केला होता, असेही हिरेन यांनी त्या पत्रात म्हटले आहे.

दुसऱ्या दिवशी १८ तारखेला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मी,एक मेकॅनिक आणि चालकाला घेऊन माझी गाडी पार्क केलेल्या ठिकाणी गेलो असता, माझी गाडी तिथे नसल्याचे पाहून मला धक्काच बसला. त्यानंतर गाडीचा शोध घेऊन मी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहितीही पत्रात दिली आहे.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी घरी भेट दिली-

तक्रार दाखल केल्यानंतर २५ फेब्रुवारीला माझ्या घऱी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन माझी कार अंबानीच्या घऱाबाहेर सापाडली असून त्यात स्फोटके असल्याची धक्कादायक माहिती दिली. तसेच मला ताब्यात घेऊन सध्याकाळी सहा वाजता सोडले असल्याचा उल्लेख हिरेन यांनी पत्रात केला आहे.

२७ फेब्रुवारीलाा सकाळी ११ वाजताच्या सुमारास विक्रोळी पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यानंतर ३ वाजता घाटकोपर पोलीस ठाण्यातूनही फोन आला, त्यानंतर १ मार्चला सायंकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसच्या कार्यालयातून सचिन वझे यांचा फोन आला. या सगळ्यांना मी एकच माहिती देत होतो. मात्र, ते वारंवार तेच तेच प्रश्न विचारत होते. त्यानंतर एनआयचे आय़ुक्त मी भामरे यांनीही चौकशी केली असल्याचे हिरेन यांनी म्हटले आहे.

मला या घटनेमागे कोण आहे हे माहित नाही, माझी कार कोण चोरली हे देखील माहित नाही,तरी देखील मला आणि माझ्या कुटुबीयांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे हिरेन यांनी त्या पत्रात म्हटले आहे.

या पत्रामध्ये मध्ये मनसुख हिरेन यांनी त्यांचे वाहन अंबानींच्या घराबाहेर सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यामागे कशा प्रकारे चौकशीचा ससेमिरा लावला होता, याची माहिती दिली आहे. २७ फेब्रुवारी पासून घाटकोपर, विक्रोळी, नागपाडा एटीएस, सचिन वझे, यांनी या प्रकरणात चौकशी केली होती, हे सर्वजण एकसारखाच प्रश्न विचारत होते, असा उल्लेख त्या पत्रात हिरेन यांनी केला आहे.

माध्यम प्रतिनिधींकडूनही त्रास-

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली गाडी माझी असल्याची माहिती समोर आल्यानंतर सुरू असलेल्या तपसासंबंधात काही माध्यमप्रतिनिधींकडूनही वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येत होते. हे सर्व त्रासदायक होते. त्याचा परिणाम मला आणि माझ्या कुटुंबीयांना सहन करावा लागत होता, असेही हिरेन यांनी आपल्या तक्रार पत्रात नमूद केले आहे.

गुढ वाढवणारा पोलिसांचा हलगर्जीपणा-

तपास अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाबदद्ल हिरेन यांनी 3 मार्चला तक्रारीचे पत्र लिहले होते. मात्र, या पत्रानंतर ठाणे पोलीस आयुक्तालय, मुंबई पोलीस आयुक्तालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्री यांचे कार्यालयातील कोणीही दखल घेतली नाही. पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने का घेतली नाही? तसेच त्यानंतर मनसुख यांचा मृतदेह आढळल्याने पोलिसांचा हलगर्जीपणा या प्रकरणाचे गुढ वाढवणारा ठरत आहे.

कोण आहेत तावडे-

या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या पत्नी यांनी तावडे या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख केला होता. तावडे हे मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या कांदिवली गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत. मात्र, तावडे हे मागील काही दिवसांपासून सुट्टीवर असल्याचे मुंबई पोलीस दलाचे म्हणणे आहे.

मनसुख हिरेन याला कांदिवली क्राईम ब्रांचचे तावडे यांचा फोन आला आणि त्यांनी घोडबंदर रोडला भेटण्यासाठी बोलावले ते परत आलेच नाहीत, असा धक्कादायक खुलासा मनसुख याच्या पत्नी विमला यांनी प्रसारमाध्यमासमोर केला. तसेच मनसुख हे आत्महत्या करूच शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी छातीठोकपणे सांगितले.

माझा हिरेन यांच्याशी संपर्क नाही - तावडे

मनसुख हिरेन हे पोलिसांना सहकार्य करत होते. शुक्रवारी कांदिवली गुन्हे शाखेतून पोलीस अधिकारी तावडे म्हणून यांचा कॉल आला होता, त्यांनी हिरेन यांना घोडबंदर येथे भेटण्यास बोलावले होते. त्यानंतर हिरेन हे तावडे यांना भेटायला गेले आणि त्यानंतर घरी परतलेच नाहीत, असा आरोप हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांनी दिली होती. यावर तावडे यांनी विमला मनसुख यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा प्रकारे माझे आणि हिरेन यांच्यामध्ये संभाषणच झाले नसल्याचे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हे प्रकरण एनआयएकडे देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.

मनसुख हिरेनच्या तोंडावर सापडले पाच हात रुमाल


मनसुख हिरेन याच्या तोंडावर असलेल्या मास्क खाली पाच हात रुमाल आढळून आले आहेत. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मास्क हाटवल्यावर ही बाब समोर आली आहे. याबाबत एक व्हिडिओ देखील स्थानिकांनी काढला असून, यावर अजूनही पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. शंकेला वाव देणारे अनेक पुरावे समोर आले असून या प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Last Updated : Mar 6, 2021, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.