ETV Bharat / city

वाणी चाळप्रकरणाची अखेर गृहनिर्माण मंत्र्यांकडून दखल, चर्चेसाठी रहिवाशांना बोलावले

author img

By

Published : Jan 24, 2021, 4:44 PM IST

शिवडी येथील के. के. मोदी वाणी चाळीचा पुनर्विकास मागील 23 वर्षांपासून रखडला आहे. 23 वर्षांपासून हक्काच्या घरापासून दूर असलेल्या रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून, आता त्यांनी म्हाडा आणि बिल्डरविरोधात आंदोलन छेडले आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी रहिवाशांनी वाणी चाळीबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे.

वाणी चाळप्रकरणाची अखेर गृहनिर्माण मंत्र्यांकडून दखल
वाणी चाळप्रकरणाची अखेर गृहनिर्माण मंत्र्यांकडून दखल

मुंबई- शिवडी येथील के. के. मोदी वाणी चाळीचा पुनर्विकास मागील 23 वर्षांपासून रखडला आहे. 23 वर्षांपासून हक्काच्या घरापासून दूर असलेल्या रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून, आता त्यांनी म्हाडा आणि बिल्डरविरोधात आंदोलन छेडले आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी रहिवाशांनी वाणी चाळीबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. बुधवारी 27 तारखेला त्यांनी येथील रहिवाशांना भेटीसाठी बोलावले असल्याची माहिती ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली आहे.

1998 पासून रहिवासी संक्रमण शिबिरात

शिवडी येथील वाणी चाळीत मूळ 202 रहिवासी आहेत. 1992 मध्ये या चाळीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. तर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने 1998 मध्ये चाळीचा मालक असलेल्या आर एम भट्टडला मालक तसेच बिल्डर म्हणून पुनर्विकासाठी एनओसी दिली. पण त्याने काहीच काम केले नाही आणि रहिवाशांना संक्रमण शिबिरात नरकयातना भोगण्यास सोडून दिले. बिल्डर पुनर्विकास करत नसल्याने रहिवाशांनी त्याच्या विरोधात 2012 पासून रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरू केली. दरम्यान एकदा त्याची एनओसी ही रद्द करून घेतली. पण त्याला 2016 मध्ये न्यायालयाकडून पुन्हा एकदा पुनर्विकासाची संधी मिळाली, पुन्हा एनओसी मिळाली आहे. यावेळी 36 महिन्यांमध्ये काम करण्यास न्यायालयाने सांगितले आहे, मात्र अजूनही काम सुरू झाले नसून, बिल्डरला म्हाडा अभय देत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

बिल्डरने म्हाडाचे 6 कोटी थकवले

आर. एम. भट्टड अर्थात मे.एम बी कन्स्ट्रक्शनने 23 वर्षे वाणी चाळीचा पुनर्विकास रखडवला आहे. पण म्हाडाचे दुरुस्ती मंडळ मात्र त्याच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही, की पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. एकूणच म्हाडा बिल्डरला अभय देत आहे असा आरोप रहिवाशांचा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे म्हाडाकडून ज्या बिल्डरला अभय देण्यात येत आहे. त्याच बिल्डरने म्हाडाचेही पैसे थकवले आहेत. म्हाडाकडून बिल्डरला भाडे तत्त्वावर संक्रमण शिबिराचे काही गाळे वितरित केले जातात. त्यानुसार या बिल्डरला देण्यात आलेल्या गाळ्याचे भाडेच त्याने भरलेले नाही. सप्टेंबर 2019 पर्यंत या बिल्डरने म्हाडाचे 6 कोटी 46 लाख 38 हजार 159 रुपये थकवले आहेत. याप्रकरणी म्हाडाने सप्टेंबर 2019 मध्ये बिल्डर विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण त्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. याप्रकरणी म्हाडा कोणताही पाठपुरावा करत नसल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे.

अन्यथा खेरवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा

कालच्या रहिवाशांच्या आंदोलनाची दखल आव्हाड यांनी घेतली आहे. त्यानुसार बुधवारी ते रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. या बैठकीत काही ठोस पाऊल उचलले गेले तर ठीक, अन्यथा बिल्डर आणि म्हाडाविरोधातील आंदोलन तीव्र करण्यात येईल असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. तर बिल्डरला त्वरित अटक करावी या मागणीसाठी खेरवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई का नाही याचा जाब विचारला जाईल असेही रेड्डी यांनी यावेळी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.