ETV Bharat / city

सुशांत सिंह प्रकरण : 'मीडिया ट्रायल'च्या विरोधात माजी आयपीएस अधिकारी उच्च न्यायालयात

author img

By

Published : Sep 3, 2020, 7:30 AM IST

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मीडियाकडून सुरू असलेल्या ट्रायल्समधून मुंबई पोलिसांची छबी खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
सुशांत सिंह प्रकरण : 'मीडिया ट्रायल'च्या विरोधात माजी आयपीएस अधिकारी उच्च न्यायालयात

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मीडियाकडून ट्रायल सुरू असून यामुळे जाणून-बुजून मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्यात येत असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. मुंबई पोलीस खात्यात एकेकाळी दबदबा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधले असून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत होते. मात्र या दरम्यान संबंधित तपास सीबीआयकडे देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. या प्रकरणात आता राजकारण देखील सुरू असल्याचा आरोप होत आहे. यामुळे मीडिया ट्रायल सुरू असून मुंबई पोलिसांची प्रतिमा जाणून-बुजून खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे याचिकेत मांडण्यात आले आहे. ही याचिका मुंबई पोलीस खात्याचे माजी पोलीस महासंचालक एम एन सिंग, पीएस पसरीचा, डिके शिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर आणि के.सुब्रमण्यम या माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी दाखल केलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करत मीडियाकडून सुरू असलेल्या बदनामीकारक वृत्तांकनावर आवर घालण्याची विनंती या याचिकेत करण्यात आलेली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सध्या सीबीआय, ईडी व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता बदनामीकारक वृत्तांकन केल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. यामुळे मुंबई पोलिसांवर नाहक टीका होत असून नागरिकांमध्ये एक वेगळे वातावरण निर्माण करण्याचे हे षडयंत्र असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.