ETV Bharat / city

कोरोना: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २०० दिवसांहून अधिक; आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार

author img

By

Published : Nov 7, 2020, 12:05 PM IST

Updated : Nov 7, 2020, 12:27 PM IST

मुंबई महापालिकेच्या विभागांमध्ये रुग्णवाढीचा साप्ताहिक सरासरी दरदेखील घसरून ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

मुंबई - कोरोना विषाणुबाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचे प्रमाण २०८ दिवसांवर गेले आहे. महापालिका क्षेत्रातील २४ विभागांपैकी ४ विभागांमध्ये ३०० पेक्षा अधिक दिवसांचा तर ११ विभागांमध्ये २०० पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागत आहे. कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

मुंबई महापालिकेच्या विभागांमध्ये रुग्णवाढीचा साप्ताहिक सरासरी दरदेखील घसरून ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत.

महापालिकेकडून प्रभावी योजनांची अंमलबजावणी-

विविध राज्य, शहर तसेच तर इतर देशांनीही मुंबईचे ‘मॉडेल’ स्वीकारले आहे. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक यांनीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे जाहीर कौतुक केले. असे असले तरी महानगरपालिका प्रशासनाने हुरळून न जाता कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिकाधिक वेग देताना ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली. मास्कचा नियमित उपयोग, हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, यासाठी जनजागृती करून भर देण्यात आला. मुंबई महानगरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वाचा परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.

असा वाढला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी -
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने २१ ऑक्टोबर २०२० रोजी रुग्ण दुप्पटी होण्याचे प्रमाण १०० दिवसांवर गाठले होते. तर दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत म्हणजे दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी ५१ दिवसांनी वाढून २०८ दिवस इतका झाला आहे.

२४ विभागांची आकडेवारी -
महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीमध्ये ४ विभागांनी ३०० दिवसांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ‘जी-उत्तर’ ३५१ दिवस, ‘एफ-दक्षिण’ ३१६ दिवस, ‘ए’ विभाग ३०८ दिवस आणि ‘सी’ विभाग ३०६ दिवस यांचा समावेश आहे. तसेच, एकूण ११ विभागांनी २०० दिवसांपेक्षा जास्त रुग्ण दुप्पटीचा कालावधी गाठला आहे. त्यात ‘जी-दक्षिण’ विभाग २८३, ‘एल’ विभाग २४५, ‘ई’ विभाग २४२, ‘एस’ विभाग २३८, ‘डी’ विभाग २३३ दिवस, ‘एफ-उत्तर’ विभाग २१३ दिवस, ‘एम-पूर्व’ विभाग २०७ दिवस, ‘के-पूर्व’ विभाग २०७ दिवस, ‘एच-पश्चिम’ विभाग २०६ दिवस, ‘एच-पूर्व’ विभाग २०३ दिवस आणि ‘के-पश्चिम’ विभाग २०० दिवस यांचा समावेश आहे. उर्वरित ९ विभागांमध्येही रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा जास्तच आहे.

सरासरी दर ०.३३ टक्के -
रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीमध्येही लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली आहे. मुंबईत २९ ऑक्टोबर २०२० रोजी असलेला ०.४४ टक्के इतका रुग्ण वाढीचा सरासरी दर आता ०.३३ टक्के इतका झाला आहे.


मुंबईकरांचे आभार -
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुन्हा एकदा सर्व मुंबईकरांचे आभार मानले आहेत. मुंबई महानगरातील सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना यशस्वी होत असल्याचे चहल यांनी म्हटले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महानगरपालिकेला निश्चितपणे मिळेल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतील महत्त्वाचे टप्पे..
१०० दिवस २० ऑक्टोबर
१२६ दिवस २४ ऑक्टोबर
१५० दिवस २९ ऑक्टोबर
२०८ दिवस ०५ नोव्हेंबर

कोरोना रुग्णांचे दुप्पट होण्यात सर्वात जास्त कालावधी असलेले ५ विभाग
जी उत्तर ३५१ दिवस
एफ दक्षिण ३१६ दिवस
ए ३०८ दिवस
सी ३०६ दिवस
जी दक्षिण २८३ दिवस

कोरोना रुग्णांचे दुप्पट होण्यात सर्वात कमी कालावधी असलेले ५ विभाग....
आर दक्षिण १८१ दिवस
एन १७५ दिवस
आर उत्तर १७२ दिवस
एम पश्चिम १६३ दिवस
आर मध्य १५० दिवस

Last Updated : Nov 7, 2020, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.