ETV Bharat / city

'कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेसने निवडणुकांकडे लक्ष दिलं नाही'

author img

By

Published : May 2, 2021, 6:13 PM IST

देशभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काँग्रेसने निवडणुकीकडे लक्ष दिलं नाही. देशाच्या जनतेची सुरक्षा हेच आमचे ध्येय आहे, मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार बेजबादार पद्धतीने वागले, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांची पत्रकार परिषद
नाना पटोले यांची पत्रकार परिषद

मुंबई - देशभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काँग्रेसने निवडणुकीकडे लक्ष दिलं नाही. देशाच्या जनतेची सुरक्षा हेच आमचे ध्येय आहे, मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार बेजबादार पद्धतीने वागले, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. देशातील जनता सुरक्षीत राहावी हे एकच ध्येय काँग्रेससमोर असून, काँग्रेसने निवडणुकीचा प्रचार सर्वात आधी बंद केला. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांना निवडणुकीची चिंता आहे, त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही भाजपाने प्रचार सुरूच ठेवा होता, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

'भाजपाने कोरोना पसरवण्याचे काम केले'

पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्र्यांना हरवण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री यांनी जंग जंग पछाडले. भाजपाचे सगळे नेते पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. मात्र त्यांना ममता बॅनर्जींचा पराभव करणं जमलं नाही. उलट कोरोना पसरवण्याचे काम केंद्र सरकारने केलं, असा टोला नाना पटोले यांनी भाजपाला लगावला आहे. याच निवडणुका दोन ते तीन महिन्यानंतर घेण्यात आल्या असत्या, तर भाजपाला आता मिळालं तेवढं देखील यश मिळालं नसतं, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. संपूर्ण ताकद पणाला लावून भाजपाला यश मिळवता आलं नाही, कारण भाजपचा खरा चेहरा जनतेला समजला असून, जनतेनेच पंतप्रधानांची हवा काढली असंही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

'कोरोनाच्या परिस्थितीबाबत काँग्रेसने भाजपाला सावध केले होते'

देशावर कोरोनाचे सावट वाढत असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि खासदार राहुल गांधी यांनी देशासमोर येणाऱ्या परिस्थितीबद्दल केंद्र सरकारला सावध केलं होतं. मात्र तरीही त्यांच्या सूचनांकडे केंद्रसरकारने कानाडोळा केला, त्यामुळेच देशात आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे आता जगाने देखील केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली असल्याचं नाना पटोले यांनी म्हटले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने वाढत्या कोरोना प्रादुर्भावासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले, मात्र उच्च न्यायालयाची टीका निवडणूक आयोगावर नसून, थेट केंद्र सरकारवर असल्याचेही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

नाना पटोले यांची पत्रकार परिषद

'पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघात मविआचा पराभव'

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला असून, या पराभवाची कारणे शेधली जातील असं नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्द्यावरून मतदान झालं असून, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - पुणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी; ऑनलाइन नोंदणी न केलेलेही दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.