ETV Bharat / city

राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका; घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

author img

By

Published : Jun 24, 2021, 4:49 PM IST

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज (गुरुवार) ते दूरचित्र प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पाठोपाठ तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका कायम आहे. त्याचा मुकाबला करायचा आहे. तसेच डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. त्यामुळे आरोग्य सेवा सुविधा वाढवून घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका. तसेच आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे", असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज (गुरुवार) ते दूरचित्र प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती.

'घाईघाईने व्यवहार खुले करू नका' -

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, दुसरी लाट अजून कायम आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती आणखी बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विशेषतः दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. त्यामुले सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवण्याचेही त्यांनी सांगितले.

७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बोलताना सांगितले कि, राज्यातील ७ जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील ३ जिल्हे कोकण, ३ पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल. तसेच या जिल्ह्याना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील असे सांगितले. आरटीपीसीआर चाचणी वाढविणे, कोरोनाग्रस्त भागात उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे याकडे सर्वानीच लक्ष द्यावे, असे मुख्य सचिव म्हणाले. तर सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजूती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार असल्याचे टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक आणि डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

फिरत्या प्रयोग शाळा पुरवा

प्रारंभी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०.१५ इतका कमी झाला आहे. मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे, असे सांगितले. रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३ हजार ७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५ हजार ६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १ हजार ३४६ तर सध्या ५ हजार ५०० , हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली. तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.