ETV Bharat / city

कोरोनाच्या सावटाखाली मुंबई-पुण्यात 'अशा' पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव

author img

By

Published : Aug 18, 2020, 8:52 PM IST

मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे देशभरातील गणेशभक्तांसाठीची पर्वणी. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत लाखोने भाविकांची गर्दी होते, परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव मंडळांनी उत्सव गर्दी न करता साजरा करायचा ठरवले आहे. मुंबईत एकूण बारा हजार पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळे आहेत. याप्रमाणेच पुण्यात सुद्धा पाच मानाचे आणि तीन प्रमुख गणपती आहेत.

गणपती
गणपती

मुंबई/पुणे - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. यामुळे यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. सोबतच गणरायाच्या आगमणापासून विसर्जनापर्यंतची नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, मायानगरी मुंबई आणि गणेशोत्सवाला सुरूवात झाली त्या पुण्यात या निर्बंधांमुळे गणेश मंडळांच्या उत्साहावर विरजन पडले. सुरूवातीला तर मागील अनेक वर्षांची परपंदा यंदा खंडित होते की काय अशी भिती या मंडळांना होती. मात्र, राज्यशासनाने आखून दिलेली नियमावली फार आनंददायक नसली तरी समाधानकारक नक्कीच आहे. आता याच नियमांच्या अधीनराहून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातील मानाच्या गणेशमंडळांनी कशापद्धतीने तयारी केली आहे, यासंदर्भातील ईटीव्ही भारताचा विशेष रिपोर्ट.

मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे देशभरातील गणेशभक्तांसाठीची पर्वणी. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत लाखोने भाविकांची गर्दी होते, परतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव मंडळांनी उत्सव गर्दी न करता साजरा करायचा ठरवले आहे. मुंबईत एकूण बारा हजार पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रामुख्याने पाच, सात आणि अकरा दिवसांच्या गणपतीची येथे प्राणप्रतीष्ठापणा होते.

मुंबईतील मानाचे गणपती साध्यापद्धतीने -

मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा आणि गणेशगल्ली मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळानी यंदा या अकरा दिवसांमध्ये अनोखे उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्लाजमा दान आणि आरोग्य शिबीर घेण्याचा संकल्प लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने केला असून शरद पवार यांच्या हस्ते या शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सव होणार असून त्याची रूपरेषा शनिवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जाहीर करण्यात आली. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर होणार असून ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात रक्तद्रव दानाकरिता नोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये व शौर्यचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत जनतेची सेवा करताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये व शौर्यचिन्हाने सन्मानित केले जाईल. तर २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात विविध आस्थापनांतील कोविडयोद्धय़ांचा सन्मान केला जाणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे.

गणेश गल्लीच्या गणपतीचा संकल्प -

मुंबईचा राजा अशी 'गणेश गल्लीच्या' गणपतीची ओळख आहे. दरवर्षी विविध रुपातील आणि भव्य गणेश मूर्ती हे मुंबईच्या राजाची विशेषत: असते. परंतु यंदा गणेशभक्तांना मंडपात हे चित्र दिसणार नाही. मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये चर्चा झाली होती. याच चर्चेत कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने हा निर्णय घेतला असून लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी दिली आहे. तसेच स्थानिकांसाठी सामाजिक अंतर पाळून गणपती बाप्पाच्या दर्शनाची व्यवस्था करणार असल्याची माहिती किरण तावडे यांनी दिली.

पुण्यातील मानाचे गणपती अशा पद्धतीने साजरा करणार उत्सव -

कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती, 'हे' पुण्यातील मानाचे पाच गणपती आहेत. हे पाचही गणपती १० x १५च्या मंडपामध्ये बसवण्याचा निर्णय 'या' मंडळाच्या अध्यक्षांनी घेतला आहे. गणेशोत्सव काळात करण्यात येणारे सर्व विधीही याच मंडपाच्या आत केले जातील, असेही या मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंडपांमध्ये गणरायाची स्थापना होणार असली तरी भाविकांना मात्र दर्शनासाठी मनाई असणार आहे. असे असले तरी भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था मात्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती. हे तीन गणपती मंडळे मानाच्या पाच गणपतींच्या व्यतीरिक्त प्रमुख गणपती मंडळे म्हणून प्रसिद्ध आहेत. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने यंदा दरवर्षी होणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामदौल रद्द केला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे. 127 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला 'हा' गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार आहे. गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

यासह भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणेच्या गणेशोत्सवाचे यंदा 129 वे वर्षे आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सालाबादप्रमाणे मंदिरामध्येच होणार आहे. उत्सव मोठा नसला तरी सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने केले जाणार आहेत. दरम्यान, भाविकांना सांस्कृतिक महोत्सवासह गणरायांच्या दर्शनाचा आणि आरतीचा लाभ फक्त ऑनलाइन घेता येणार आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साधेपणाने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.

अशा पद्धतीने करण्यात येणार प्राणप्रतिष्ठापना -

कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या शुभहस्ते तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या शुभहस्ते तर अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या शुभहस्ते होणार आहे. गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या शुभहस्ते तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या वंशजातील केसरी वाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या शुभहस्ते तर केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना व आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिका-यांच्या शुभहस्ते होणार आहे. मागील 128 वर्षात प्रथमच असे घडणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.