ETV Bharat / city

Chandrakant Patil : आमदारांनी मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणला पाहिजे, शरद पवारांच्या मेट्रो प्रवासावर चंद्रकांत पाटलांचा आक्षेप

author img

By

Published : Jan 17, 2022, 4:13 PM IST

Updated : Jan 17, 2022, 5:12 PM IST

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

शरद पवारांच्या मेट्रो पाहणीला भारतीय जनता पक्षाने ( BJP ) आक्षेप घेतला आहे. आमदारांनी मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणला पाहिजे, असा संताप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state President Chandrakant Patil ) यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी आज (सोमवारी) पुणे मेट्रोतून प्रवास ( Travel by Pune Metro) केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सध्या सुरू असलेल्या कामाचीही माहिती घेतली. पवारांच्या या पाहणीला भारतीय जनता पक्षाने ( BJP ) आक्षेप घेतला आहे. आमदारांनी मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणला पाहिजे, असा संताप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state President Chandrakant Patil ) यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलतांना चंद्रकांत पाटील


भाजपाचा आक्षेप

भाजपाने पवारांच्या या मेट्रो पाहणीला आक्षेप घेतला आहे. पुण्यातील कुठल्याही खासदाराला किंवा आमदाराला न कळवता मेट्रो कंपनीने आज शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल घेतली. 'शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदरच आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत. परंतु अशा प्रकारे घाईघाईत ट्रायल घेण्याचे कारण काय? ही श्रेयवादाची लढाई सुरू आहे का? सुमारे ११ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यातील ८ हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान केंद्र सरकारचे आहे. तीन हजार कोटी महापालिकेचे व काही प्रमाणात राज्याचे योगदान आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. पण कोविड स्थितीमुळे ते लांबवणीवर पडले. मग मेट्रो कंपनीला इतकी घाई का झाली?, असा सवाल पाटील यांनी केला. हे उद्घाटन नाही, ट्रायल आहे असे मेट्रो कंपनीचे म्हणणे आहे. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायल असेल तर तिथे शरद पवार कशाला हवेत? त्यांनी मेट्रोने प्रवास करायचा, त्याचे फोटो छापून आणायचे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे झाले, असे सांगायचे, हा काय प्रकार आहे, असे पाटील म्हणाले.

'पवारांचा संबंध काय?'

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार अधूनमधून पुण्यातील विकासकामांची पाहणी करत असतात. यापूर्वी दोन वेळा भल्या सकाळी त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. आज चक्क शरद पवार यांनीच मेट्रोतून प्रवास केला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक मेट्रो स्थानकाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. कामांमध्ये येत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. फुगेवाडी स्थानक ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत त्यांनी प्रवास केला. विशेष म्हणजे पवारांनी उभे राहूनच प्रवास केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व काही अधिकारी देखील त्यांच्या सोबत होते. फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली.


'आमदारांना का डावललं जाते?'

पुण्यात विविध पक्षांचे आमदार आहेत. त्यांना का डावललं गेले? हे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे हे काम आहे. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना मेट्रोचा प्रकल्प का पूर्ण नाही झाला? फडणवीसांचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रकल्प पूर्ण झाला. पण आता वेगळंच सुरू आहे. मेट्रो कंपनीने ही घाई कशाला केली? मी कंपनीविरोधात हक्कभंग मांडणारच आहे. पण अन्य आमदारांनीही हक्कभंग मांडावा, ही आपल्या हक्कावरची गदा आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - HC on Nitesh Rane's Bail : आमदार नितेश राणे यांना न्यायालयाचा मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Last Updated :Jan 17, 2022, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.