ETV Bharat / city

'योगींचा राजीनामा मागणाऱ्यांनी आधी राजीनामा द्यावा'

author img

By

Published : Oct 2, 2020, 4:13 PM IST

योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी आधी राजीनामे दिले पाहिजेत. महाराष्ट्रात अनेक घटना होत आहेत. महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.

mla pravin darekar
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

औरंगाबाद - हाथरसमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत झालं ते चुकीचं आहे. मात्र, मुद्दाम कोणी असं करेल असं वाटत नाही. नेमकं त्यांना ढकललं की ते पडले हे पहावं लागेल. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळावी लागते आणि नेत्यांना नागरिकांचे प्रश्न मांडायचे असतात, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

हेही वाचा - 'हाथरसमध्ये लपवण्यासारखे काहीच नाही, तर मग विरोधीपक्षांना का रोखलं'

हाथरसच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागणी राज्यात केली जात आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. मात्र, राजीनामा मागणाऱ्यांनी आधी राजीनामे दिले पाहिजेत. महाराष्ट्रात अनेक घटना होत आहेत. महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. हाथरसच्या घटनेवर बोलणारे राऊत राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांवर का बोलत नाही? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.

हाथरसची झालेली घटना अत्यंत वाईट आहे. त्या घटनेची सखोल चौकशी होऊन आरोपींवर योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी आमची आहे. मात्र, त्या घटनेचा आधार घेऊन राजकारण केले जात आहे. काही गोष्टींवर भाजप बोलत असेल तर राज्यातील सत्ताधारी आम्ही राजकारण करत असल्याचा आरोप करत आहे. तर हाथरसमध्ये झालेल्या घटनेचे हे राजकारण करत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये आणि इतरत्र महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांनी महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची घटना आहे. त्या घटनांवर कोणीही बोलायला तयार नाहीत. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागत आहेत. खरं राजीनामा मागणाऱ्यांनीच राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

मराठा समाजाच्या एका युवकाने बीडमध्ये आत्महत्या केली. ही अत्यंत वाईट घटना आहे. राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली असती, मराठा आरक्षण टिकून दिल असतं तर निश्चित ही आत्महत्या झाली नसती. मात्र, राज्य सरकार कोणत्याही प्रकरणात गंभीर नाही, असा आरोप देखील प्रवीण दरेकर यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.