ETV Bharat / city

दौरे नुसते फोटोपुरतेच, शेतकऱ्यांचा राजकीय पक्षांवर रोष

author img

By

Published : Oct 20, 2020, 7:48 PM IST

परतीच्या पावसाने दाणादाण उडवत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यानंतर आता राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरू झाले. मात्र, या दौऱ्यांमधून शेतकऱ्यांच्या वाट्याला मदत मिळणार आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

farmers
वैजापूर येथील शेतकरी

औरंगाबाद - मराठवाड्यात यावर्षी निसर्गाने अवकृपा केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परतीच्या पावसाने दाणादाण उडवत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यानंतर आता राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरू झाले. मात्र, या दौऱ्यांमधून शेतकऱ्यांच्या वाट्याला मदत मिळणार आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या आधीचा अनुभव पाहता दौरे फोटोपुरते मर्यादित आहेत असा भ्रम शेतकऱ्यांना आहे.

प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी शेतकऱयांसोबत साधलेला संवाद

हेही वाचा - नाशिक: कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर; भाव नियंत्रणात ठेवण्याची गृहिणींची मागणी

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहण्यासाठी असेच दौरे राजकीय नेत्यांनी केले. असाच एक पाहणी दौरा होता तो उद्धव ठाकरे यांचा. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी पीक परिस्थतीची पाहणी केली होती. त्यावेळी 25 हजार रुपये हेक्टरी मदत देऊ असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, सत्तेत येऊन दहा महिने होत आहेत मात्र ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. 25 हजार तर सोडा साधे 25 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. त्यामुळे होणारे पाहणी दौरे शेतकऱ्यांच्या कामाचे आहेत का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह इतर नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यंदा मराठवाड्यात दुष्काळामुळे नाही तर अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. कापूस, मका, सोयाबीन या पिकांचं मुख्यतः नुकसान झालं. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे सुरू केले. मात्र, या दौऱ्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. खरतर शेतकऱ्यांना मदत कधी आणि कशी मिळणार याबाबत माहिती मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही.

हेही वाचा - मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

मुळात आज पर्यंत झालेल्या राजकीय दौऱ्यांमधून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच मिळाली आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्याला भेट देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देऊ असे आश्वासन दिले होते. तेच आज मुख्यमंत्री झाल्यावर अद्याप पाहणी दौरेच करत आहेत. त्यामुळे या दौऱ्यांमधून जर मदत मिळणारच नसेल तर दौरे कशासाठी? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.