ETV Bharat / business

TCS CEO Rajesh Gopinathan : कोण आहेत राजेश गोपीनाथन, ज्यांनी दिला टीसीएसच्या सीईओ पदाचा राजीनामा

author img

By

Published : Mar 17, 2023, 1:31 PM IST

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते गेली 22 वर्षे टाटा समूहाशी जोडलेले होते. त्यांच्या कार्यकाळातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली होती.

TCS CEO Rajesh Gopinathan
टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन

नवी दिल्ली : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिला आहे. कृतिवासन त्यांची जागा घेतील. ते सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) व्यवसाय समूहाचे अध्यक्ष आणि जागतिक व्यवसायाचे प्रमुख आहेत. क्रितिवासन 15 सप्टेंबर 2023 पासून नवीन सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. तोपर्यंत राजेश गोपीनाथन हे सीईओ आहेत. जाणून घेऊया राजेश गोपीनाथन यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी.

कोण आहेत राजेश गोपीनाथन? : राजेश गोपीनाथन हे 22 वर्षांपासून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) शी जोडलेले आहेत. ते गेल्या सहा वर्षांपासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते टाटा समूहातील सर्वात तरुण सीईओ आहेत. राजेश गोपीनाथन 1996 मध्ये टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर, 2001 मध्ये ते डिझायनिंग, स्ट्रक्चर यासारख्या कामात रुजू झाले आणि 2013 मध्ये टीसीएसचे मुख्य वित्तीय अधिकारी बनले. या अंतर्गत ते समूहाशी संबंधित प्रत्येक लहान - मोठे वित्त व्यवस्थापन पाहत होते. ते जवळपास 4 वर्षे या पदावर होते.

टीसीएसच्या वाढीत योगदान : राजेश गोपीनाथन 2017 साली टीसीएसचे सीईओ बनले. एप्रिल 2018 मध्ये कंपनीने 100 अब्ज डॉलर्स बाजार भांडवल पार केले. त्यांच्या कार्यकाळातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली. 2021 मध्ये, टीसीएसचे ब्रँड मूल्य मागील वर्षाच्या तुलनेत 1.4 अब्ज डॉलर्सने वाढून 15 अब्ज डॉलर्स झाले. ब्रँड फायनान्स 2021 च्या अहवालानुसार, टीसीएसने जागतिक स्तरावर आयटी सेवा क्षेत्रातील शीर्ष 3 सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये स्थान मिळवले आहे. 2020 मध्ये टाटा समूहाला जागतिक स्तरावर 22 अब्जांची कंपनी बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अनेक पुरस्कारांचे मानकरी : राजेश गोपीनाथन हे मुळचे केरळचे आहेत. पण त्यांचे शालेय शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंट इंटर कॉलेज आरडीएसओ, लखनऊ येथून झाले. 1994 मध्ये त्यांनी तिरुचिरापल्ली येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. राजेश गोपीनाथन यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांगल्या कामगिरीमुळे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी 2021 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट सीईओचा किताब पटकावला. तसेच त्यांना 2020 मध्ये बिझनेस लीडर आणि 2019 मध्ये मॅनेजमेंट मॅन ऑफ द इयर, याशिवाय अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा : Job in India : तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदी दरम्यान, 'या' नोकरीला भारतात सर्वाधिक मागणी आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.