ETV Bharat / business

केंद्र सरकार 4,50,000 रेमडेसिवीर इंजेक्शनची करणार आयात

author img

By

Published : Apr 30, 2021, 5:24 PM IST

केंद्र सरकारने देशातील रेमडेसिवीरचे उत्पादनही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशात रेमडेसिवीरचे उत्पादक असलेल्या सात परवानाधारक औषधी कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून दरमहा 38 लाखांवरून 1.03 कोटी इंजेक्शनचे उत्पादन घेण्यात येत आहे.

Remdesivir
रेमडेसिवीर इंजेक्शन

नवी दिल्ली- केंद्र सरकारने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी 4,50,000 रेमडेसिवीर आयात करण्यास सुरुवात केली आहे. देशात रेमडेसिवीरचा मागणीच्या प्रमाणात तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार रेमडेसिवीर देशात आयात करत आहे. पहिल्या टप्प्यात देशात 75,000 रेमडेसिवीर पोहोचले आहेत.

केंद्र सरकारची मालकी असलेल्या एचएलएल लाईफकेअर कंपनीने 4,50,000 रेमडेसिवीरची मागणी अमेरिकेतील गिलीड सायन्स आणि इजिप्तची एव्हा फार्माकडे नोंदविली आहे. त्यापैकी गिलीड सायन्सेसकडून 75,000 ते 1,00,000 रेमडेसिवीर एक ते दोन दिवसांत पोहोचण्याची शक्यता आहे. एव्हा फार्मा कंपनीकडून जुलैपर्यंत दर पंधरा दिवसाला 10 हजार असे एकूण 50 हजार रेमडेसिवीर भारताला मिळणार आहेत.

हेही वाचा-रायगडात रेमडेसिवीर इंजेक्शनची खराब बॅच; 90 रुग्णांना साईड इफेक्ट

देशात 38 लाखांवरून 1.03 कोटी रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन

केंद्र सरकारने देशातील रेमडेसिवीरचे उत्पादनही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशात रेमडेसिवीरचे उत्पादक असलेल्या सात परवानाधारक औषधी कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून दरमहा 38 लाखांवरून 1.03 कोटी इंजेक्शनचे उत्पादन घेण्यात येत आहे. गेल्या सात दिवसात (21 ते 28 एप्रिल 2021) औषधी कंपन्यांनी 13.73 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन पुरविले आहेत. केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे. तर रेमडेसिवीर इंजेक्शन व त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटक पदार्थांवरील आयात शुल्क तीन महिन्यांसाठी माफ केले आहे.

हेही वाचा-बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कंपनीवर दिल्ली पोलिसांचा छापा, 5 जण जेरबंद

महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

गंभीर कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जात आहे. राज्यात मागील महिन्याभरापासून या इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. सध्या राज्याला अंदाजे 65 हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला 30 हजार इतकेच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिल या दिवसाच्या कालावधीसाठी 4 लाख इंजेक्शन पुरवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार दिवसाला 28 ते 30 हजार इंजेक्शन उपलब्ध होत असून अंदाजे 35 हजार इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने दिली आहे. त्यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांचे हाल सुरूच आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.