ETV Bharat / briefs

हिंगोलीत कंटेनरची दोन बैलगाड्यांना धडक; युवकासह एक बैल ठार

author img

By

Published : Jun 22, 2020, 3:07 PM IST

खरिपाची पेरणी आटोपून येणाऱ्या दोन बैलगाड्यांना आराटी फाट्याजवळ एका कंटेनरने (आरजे 14 जीजी 1790) अचानक धडक दिली. हा कंटेनर नांदेडहून कळमनुरी मार्गे जात होता. ही धडक एवढी गंभीर होती की, कंटेनरखाली एकजणाचा दबून मृत्यू झाला असून एक बैलदेखील दगावला आहे. तर, बैलगाडीतील इतर पाचजण जखमी झाले आहेत.

कंटेनरची दोन बैल गाडीला धडक
कंटेनरची दोन बैल गाडीला धडक

हिंगोली - जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील फाट्याजवळ राज्य रस्त्यावर एका कंटेनरने दोन बैलगाड्यांना दिलेल्या धडकेत एकजणाचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाला. तर एक बैलदेखील ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. तसेच, इतर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. शिवम माखणे असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

खरिपाची पेरणी आटोपून येणाऱ्या दोन बैलगाड्यांना आराटी फाट्याजवळ एका कंटेनरने (आरजे 14 जीजी 1790) अचानक धडक दिली. हा कंटेनर नांदेडहुन कळमनुरी मार्गे जात होता. ही धडक एवढी गंभीर होती की, कंटेनरखाली शिवम माखणे हा दबला गेला. तर, एक बैल हा दगावला आहे. तसेच बैलगाडी कंटेनर खाली दबल्या गेल्यामुळे पूर्णपणे चकनाचूर झाली आहे.

विशेष म्हणजे बैलगाडीत असलेले प्रताप माखणे (40), त्यांची पत्नी नीता माखणे (35), शिवानी (15) हे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, शिवम हा कंटेनर खाली दबला गेल्यामुळे त्याची प्रकृती फारच चिंताजनक होती. त्यामुळे त्याला कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले होते. तर, तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर, दुसऱ्या बैलगाडीतील असलेले पुंडलिक आवटे हे देखील जखमी झाले आहेत.

शिवम हा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक शिक्षण घेत होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून शिवमचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पेरणीचे काम असल्याने घरातील लहानसहान व्यक्ती कमी पडतात. त्यामुळे शिवमला देखील पेरणीच्या कामानिमित्त शेतामध्ये नेण्यात आले होते. मात्र, हा अपघात घडल्यानंतर अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जेसीपी बोलावून कंटेनर सरळ करण्यात आले होते. घटनास्थळी कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. घटनेतील जखमींना नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी अजून तरी कोणतीही गुन्हा दाखल झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.