कोलकाता - आयपीएल २०१९ मध्ये केकेआरचा फलंदाज आंद्रे रसेलने सर्वात जास्त स्फोटक फलंदाजी केली आहे. कोलकाताने ज्या ज्या सामन्यात विजय मिळविला आहे, त्या सामन्याचा खरा हिरो रसेल आहे. आंद्रे रसेलने १२ सामन्यातील ११ डावात ४८६ धावा केल्या आहेत. ज्यात ५० षटकार असून त्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे.
आयपीएलच्या एक सीजनमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा पराक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने २०१२ मध्ये ५९ षटकार मारले होते. तर २०१३ मध्ये त्याने ५१ षटकार मारले होते. आंद्रे रसेलने यावर्षी ५० षटकार खेचले आहेत. कोलकाताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. जर या सामन्यात रसेलला फलंदाजी करण्यास मिळाली तर गेलचा एका सीजनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम तो सहज मोडू शकतो.
आयपीएलमधील बहारदार कामगिरीनंतर त्याला विंडीज संघाने विश्वचषकाच्या संघातही स्थान दिले आहे. कोलकात्याचा पुढचा सामना ३ मे रोजी पंजाबसोबत आहे. त्यानंतर ५ मे'ला मुंबई विरुद्ध भिडणार आहे.