ETV Bharat / briefs

जळगाव जिल्ह्यात 10 वर्षांत प्रथमच जूनमध्ये पावसाची सरासरी 30 टक्के; निम्म्या पेरण्या पूर्ण

author img

By

Published : Jun 28, 2020, 4:40 PM IST

जून महिना हा तसा पावसाळा ऋतू सुरू होणारा महिना मानला जातो. पण हवामानात होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्यात जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये पावसाळा खऱ्या अर्थाने सुरू होतो. यावर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. जून महिन्यातच एकूण सरासरीच्या 30 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Heavy rainfall jalgaon
Heavy rainfall jalgaon

जळगाव- जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांत प्रथमच जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या 30 टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी जिल्ह्यात मान्सून वेळेवर दाखल झाला, त्याचाच हा सकारात्मक परिणाम आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस पावसाने खंड दिला. मात्र, गेल्या 3 दिवसांपासून ठिकठिकाणी मान्सूनचा पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाची सरासरी वाढली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात मान्सून सक्रिय होतो. पावसाची अनियमितता, हवामान बदलाचा परिणाम यामुळे जून महिन्यातील पावसाच्या सरासरीत मोठी घट होत होती. गेल्या काही वर्षांपासून वाढते प्रदूषण, वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. याच कारणामुळे जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडत होते. जून महिना हा तसा पावसाळा ऋतू सुरू होणारा महिना मानला जातो. पण हवामानात होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्यात जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये पावसाळा खऱ्या अर्थाने सुरू होतो. यावर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. जून महिन्यातच एकूण सरासरीच्या 30 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम-

जून महिन्याच्या सुरुवातीलाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग 3 ते 4 दिवस पावसाने हजेरी लावली. 1 ते 4 जूनदरम्यान जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 10 टक्के इतका पाऊस झाला होता. त्यातच मान्सून देखील काही वर्षांच्या तुलनेत जरा लवकरच दाखल झाल्यामुळे पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात 50 टक्के पेरण्या पूर्ण-

जून महिन्यातच जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 50 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हंगामी कापसाची पेरणी पूर्ण झाली आहे. तर ज्वारी, बाजरी, उडीद, मूग व सोयाबीनच्या पेरणीला देखील वेग आला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. पाऊस चांगला झाला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

2010 पासून जूनमध्ये झालेल्या पावसाची टक्केवारी-

2010 - 21 टक्के

2011 - 16 टक्के

2012 - 18 टक्के

2013 - 20 टक्के

2014 - 13 टक्के

2015 - 09 टक्के

2016 - 17 टक्के

2017 - 12 टक्के

2018 - 11 टक्के

2019 - 11 टक्के

2020 - 30 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.