ETV Bharat / briefs

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित

author img

By

Published : Jun 19, 2020, 3:48 PM IST

पुरस्कार समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत होणार असून त्यांच्यामार्फत पुरस्काराची नामांकने मागविण्यात येणार आहेत, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

मंत्रालय संग्रहित छायाचित्र
मंत्रालय संग्रहित छायाचित्र

मुंबई- कोरोनामुळे ठप्प झालेले प्रशासन सुरू करण्याच्या दृष्टीने राज्याने 'मिशन बिगीन' चा नारा दिला असतानाच आता प्रशासकीय कामकाजाला देखील वेग आला आहे. भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येत्या १४ जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे.

पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेचे जनक

'पाणी अडवा, पाणी जिरवा'ची संकल्पना अंमलात आणणारे तसेच जलसंस्कृतीचे जनक म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येणाऱ्या माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जलसंधारण, जलसंपदा व पाणी पुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

प्रथम विजेत्याला 5 लाख रुपये बक्षिस

पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला ५ लाख रूपये व प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ३ लाख, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी २ लाख, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या जन्मदिनी येत्या १४ जुलै २०२० रोजी करण्यात येणार आहे.

या पुरस्कारच्या निवडीसाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव, लाभक्षेत्र विकासचे सचिव, यशदामधील जलसाक्षरता केंद्राचे संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (पा.), जलसाक्षरता केंद्राने निवडलेले दोन जलनायक यांचा समावेश असून जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकासचे उपसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.

या पुरस्कार समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत होणार असून त्यांच्यामार्फत पुरस्काराची नामांकने मागविण्यात येणार आहेत, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.