ETV Bharat / bharat

अजित पवारांच्या 'या' वक्तव्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला निषेध

author img

By

Published : Nov 18, 2020, 5:02 PM IST

बेळगावच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकात वाद सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहताना केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा हा वाद उफाळून आला आहे.

येडियुरप्पा
येडियुरप्पा

बंगळुरू - बेळगाव आणि शेजारील इतर गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र करत आला आहे. बेळगावच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकात वाद सुरू आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहताना केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून याप्रकराची वक्तव्य चुकीचे आहेत, असे म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्याचा मी निषेध करतो. महाजन समितीच्या अहवालात जो निर्णय आला होता. तो जगाला माहीत आहे. महाजन समिती अहवालावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ज्यानुसार, बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या पद्धतीची वक्तव्य करणे चुकीचे आहे, असंही येडियुरप्पा यांनी म्हटलं. याबद्दल आम्ही निश्चितच पत्र लिहिणार आहोत, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार ?

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असे अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना म्हणाले होते.

महाजन समितीचा अहवाल -

कर्नाटक राज्याची 1 नोव्हेंबर 1956 रोजी निर्मिती झाली त्यानंतर बेळगाव, निपाणी, बीदर या भागांचा समावेश कर्नाटकात करण्यात आला. या विरोधात बेळगावात आंदोलन झाले. हा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने 25 ऑक्टोबर 1966 ला न्या. मेहेरचंद महाजन आयोगाची नेमणूक केली. संसदेत 1972 मध्ये सादर करण्यात आलेल्या आपल्या अहवालात महाजन यांनी महाराष्ट्राचा बेळगाववर असलेला दावा फेटाळून लावला होता. 1956 साली राज्य पुनर्रचना झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळते. आजही बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो.

हेही वाचा - बेळगाव सीमा प्रश्न : सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, याद राखा..; शिवसेनेने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना खडसावलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.