ETV Bharat / bharat

Virgin Orbit Laysoff : अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळणे सुरूच, आता वर्जिन ऑर्बिटसह रोकू कंपनीने काढले कर्मचारी

author img

By

Published : Mar 31, 2023, 2:56 PM IST

अमेरिकेच्या प्रसिद्ध असलेल्या वर्जिन ऑर्बिट या कंपनीने आपल्या 85 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

Laysoff
संग्रहित छायाचित्र

सॅन फ्रान्सिस्को : जागतिक मंदीचा जगभरातील अनेक उद्योजकांना फटका बसल्याने अनेक कंपन्यांनी आपले कर्मचारी कमी केले आहेत. त्यात आता आणखी रोकू आणि वर्जिन ऑर्बिट या कंपन्यांची भर पडली आहे. ब्रिटीश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी स्थापन केलेल्या वर्जिन ऑर्बिट या कंपनीने आपल्या 85 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कंपनीच्या 675 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असून वर्जिन ऑर्बिटने भविष्यातील भरतीही बंद केली आहे. कंपनीचे सीईओ डॅन हार्ट यांनी गुरुवारी ही माहिती दिली. दुर्दैवाने आम्ही या कंपनीसाठी निधी मिळवू शकलो नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्याकडे तत्काळ कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

85 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता : कंपनीने अंदाजे 675 कर्मचारी कमी केल्याची घोषणा गुरुवारी केली आहे. काढलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण कंपनी कर्मचार्‍यांच्या एकूण 85 टक्के आहे. बाधित कर्मचारी कंपनीच्या सर्व विभागातील आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रक्रियेसाठी अंदाजे 15 दशलक्ष डॉलर इतका खर्च लागेल असा कंपनीचा अंदाज आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांची 3 एप्रिलपर्यंत छाटणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशीही कंपनीची अपेक्षा आहे.

2017 मध्ये वर्जिन ऑर्बिट कंपनीची स्थापना : ब्रिटीश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी त्यांची बहीण कंपनी वर्जिन गॅलेक्टिकपासून विभक्त झाल्यानंतर 2017 मध्ये व्हर्जिन ऑर्बिटची स्थापना केली. वर्जिन ऑर्बिट लहान उपग्रहांना अवकाश कक्षेत घेऊन जाण्यासाठी एअर लाँचर रॉकेट विकसित करत आहे. मात्र जानेवारीमध्ये उपग्रहांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या रॉकेटमध्ये विसंगती निर्माण झाली होती. त्यामुळे यूकेच्या प्रदेशातून प्रथम इन ऑर्बिटल प्रक्षेपणाची योजना अचानक संपुष्टात आली. त्यामुळे त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. त्या अयशस्वी मोहिमेची तपासणी जवळजवळ पूर्ण झाल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने 15 मार्चला निवेदनामधून दिली आहे. आमचे पुढील उत्पादन रॉकेट सगळ्या सुधारणांसह चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले आहे.

रोकू या कंपनीनेही काढले 200 कर्मचारी : स्ट्रीमिंग कंपनी रोकू Roku आणखी 200 कर्मचार्‍यांना काढून टाकत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे फाइलिंगमध्ये कंपनीने याबाबतचा खुलासा केला. 29 मार्च रोजी कंपनीने ऑपरेटिंग खर्चातील वाढ कमी करण्यासाठी आणि प्रकल्पांना प्राधान्य देण्यासाठी पुनर्रचना योजना मंजूर केल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Accenture Company Layoffs : मेटा पाठोपाठ एक्सेंचर देणार १९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.