ETV Bharat / bharat

Khalistan In Punjab : पंजाबमध्ये 1980 च्या दशकाची पुनरावृत्ती? वेळीच पावले न उचलल्यास पुन्हा पेटेल पंजाब!

author img

By

Published : Feb 27, 2023, 7:47 AM IST

Updated : Feb 27, 2023, 1:48 PM IST

कट्टरपंथी अमृतपाल सिंह याने पंजाबचे वातावरण बदलून टाकले आहे. राज्यात पुन्हा 1980 सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी भिंडरावाला याने संपूर्ण राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. भिंडरावालावर ज्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप होता त्याच्या हत्येला भिंडरावाला जबाबदार नसल्याचे तत्कालीन गृहमंत्री ग्यानी झैल सिंह यांनी म्हटले होते. पंजाबमधील 'आप' सरकार देखील आता त्याच पद्धतीने वागत आहे. डीजीपी म्हणाले की, अमृतपाल सिंहचा सहकारी तुफान सिंह या गुन्ह्यात सहभागी नाही. पोलिसांची ही प्रवृत्ती भयावह आहे. वाचा ईटीव्ही भारत नेटवर्कचे एडिटर बिलाल भट यांचे हे विश्लेषण.

Khalistan In Punjab
पंजाबमध्ये खलिस्तान

हैदराबाद : कृपाण, तलवारी आणि बंदुकांनी सशस्त्र संतप्त शीखांनी अमृतसरच्या रस्त्यावर निदर्शने केली आणि 1980 च्या दशकाच्या भयानक आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा पंजाब दहशतवादाने ग्रासलेला होता. आंदोलकांनी अजनाला पोलिस ठाण्यात पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांना लवप्रीत सिंह उर्फ ​​तुफान सिंहच्या सुटकेचे आश्वासन देणे भाग पडले. त्याच्या अटकेमुळे हा निषेध चिघळला होता.

तुफान सिंहच्या अटकेनंतर हिंसाचार : अमृतपाल सिंह हा 29 वर्षाचा इंजिनिअर आहे. खलिस्तानचा नारा देऊन तो पंजाबमधील तरुणांवर प्रभाव टाकतो आहे. वेगळ्या देशाच्या नावाने तो नारे देत आहे. अमृतपालचा निकटवर्तीय असलेल्या तुफान सिंहला अपहरणाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. त्याविरोधात हे आंदोलन सुरू झाले होते. ही परिस्थिती एवढी चिघळेल याची पोलिसांनाही कल्पना नव्हती. अमृतपालच्या समर्थनार्थ अमृतसरमधील रस्त्यांवर तरुणांचा मोठा जमाव जमल्याने पोलिसही चक्रावून गेले. दंगलखोर तरुणांविरुद्ध राज्य सुरक्षा यंत्रणा ढिली झाली, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.

1981 ची स्थिती पुन्हा उद्भवतेय? : पंजाबच्या डीजीपीने अपहरण प्रकरणात तुफान सिंहची सुटका या कारणास्तव केली की तो गुन्हा घडला त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. मात्र डीजीपीच्या या टिप्पणीने लोकांना आश्चर्य वाटले आहे. या आधी 1981 मध्ये जर्नेलसिंह भिंडरावाला याला सोडवण्यासाठी त्याच्या साथीदारांनी हिंसाचाराचा वापर केला होता. त्याला मुक्त करण्यासाठी तत्कालीन सरकारच्या विशेषत: केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर, इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन गृहमंत्री झैल सिंह यांनी संसदेतून सांगितले की, वृत्तपत्र मालकाच्या हत्येसाठी भिंडरावाला जबाबदार नाही, ज्यासाठी त्याला अटक करण्यात आली होती.

भिंडरावाला अमृतपालचा आदर्श : पंजाबमधील तत्कालीन रक्तरंजित घटनांच्या कारणांमागे भिंडरावालाची सुटका ही मुख्य कारणांपैकी एक म्हणून पाहिली जाते. त्याच्या सुटकेमुळे खलिस्तान समर्थक शक्तींना चालना मिळाली. त्याची परिणती ऑपरेशन ब्लू स्टार आणि नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येत झाली. शिखांना वेगळी मातृभूमी 'खलिस्तान'चे समर्थन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अमृतपाल सिंह देखील भिंडरावालासारखे कपडे परिधान करतो. त्याच्या विचारसरणीपासून प्रेरणा घेत भिंडरावाला याने त्याच्या संघर्षाच्या काळात जी भाषा वापरली होती तीच भाषा तो वापरतो.

पंजाबमधील वातावरणात बदल : पंजाबमधील सत्तेत असलेले लोक मात्र शीख फुटीरतावाद्यांच्या या नव्या सैन्याला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे पंजाबमधील वातावरणात हळूहळू बदल होताना दिसतो आहे. तुफान सिंहच्या सुटकेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीने बरेच काही स्पष्ट झाले आहे. अमृतपालचे चिथावणीखोर वक्तव्य थांबण्याचे नाव नाही घेत आहे. शनिवारी त्याने पुन्हा एकदा तुफान सिंहवर गुन्हा दाखल केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पोलिसांना दिली. त्यामुळे अमृतपालला काही काळ मोकळे ठेवणे हे 'आप' आणि केंद्र सरकार दोघांच्याही हिताचे आहे, हे स्पष्ट आहे.

शिखांमध्ये फूट पडण्याची शक्यता : 1980 च्या खलिस्तान चळवळीच्या पार्श्वभूमीवर अमृतपालच्या या निर्णयामुळे राज्याचे ध्रुवीकरण होईल आणि राज्यातील हिंदू लोकसंख्या एकत्र येईल असे दिसते. मात्र यामुळे शिखांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडेल. धर्मनिरपेक्ष शीख तटस्थ मार्ग स्वीकारतील आणि राज्यातील कोणत्याही बदलांबाबत उदासीन राहण्याची शक्यता आहे. कट्टर धार्मिक शीख अमृतपालची निवड करतील, परंतु हिंदू, जे राज्याच्या लोकसंख्येच्या 40% आहेत, ते 'आप' किंवा कॉंग्रेस या दोघांनाही पाठिंबा देणार नाहीत. ते फक्त भाजपकडे पर्याय म्हणून पाहतील.

अमरिंदर सिंहकडून भाजपला अपेक्षा : राज्यातील या आधीच्या निवडणुकांचा अनुभव पाहिला तर येथे भाजपला अद्यापही आपली उपस्थिती नोंदवता आलेली नाही. मात्र आता पक्षाकडे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत कॅप्टन पक्षात काही बदल घडवून आणतील अशी भाजपला आशा आहे. अमरिंदर सिंह यांनी पंजाबमध्ये अनेक वर्षे हिंसाचाराचा सामना केला आहे. किंबहुना, ते 80 च्या दशकाच्या सुरुवातीस इंदिरा गांधींच्या अकालींविरुद्धच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्य नेते होते.

ध्रूवीकरण झाल्यास भाजपला फायदा : पंजाबमधील खलिस्तान समर्थक नव्या लाटेचा सर्वाधिक फायदा भाजपला होताना दिसतो आहे. अमृतपालच्या उदयामुळे पक्षाकडे हिंदू मते एकवटतील, तर दुसरीकडे कॅप्टन आणि त्यांचे लोक त्यांच्यासाठी शीख मते आकर्षित करण्यास मदत करतील. दुसरीकडे केजरीवाल हे केवळ परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते ती काळजीपूर्वक हाताळत आहेत. कारण त्यांना माहित आहे की जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर ते केवळ राज्यातील सत्ताच गमावणार नाहीत तर राष्ट्रीय राजकारणात देखील त्यांच्या प्रतिमेला तडा बसेल.

हेही वाचा : Story Of Operation Blue Star : ..म्हणून इंदिरा गांधींनी हल्ला करण्याचे आदेश दिले, ऑपरेशन ब्लू स्टारबाबत अनेक खळबळजनक खुलासे

Last Updated : Feb 27, 2023, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.