ETV Bharat / bharat

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे भाषण, वाचा महत्वाचे मुद्दे...

author img

By

Published : Jan 25, 2021, 7:18 PM IST

Updated : Jan 25, 2021, 7:42 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची सुरक्षा, कोरोना, आत्मनिर्भर भारत, लॉकडाऊन, कोरोना लस, शेतकरी आदी मुद्यांवर भाष्य केले.

राष्ट्रपती
राष्ट्रपती

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची सुरक्षा, कोरोना, आत्मनिर्भर भारत, लॉकडाऊन, कोरोना लस, शेतकरी आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपत राय, महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांनी स्वतंत्रता संग्रामाला प्रेरीत केले. न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता आपल्या जीवनाचे सिद्धांत आहेत. या मुल्यांचा प्रवाह आपल्या जीवनाला समृद्ध करतो. वेळेनुसार बदलत नव्या पीढीने याची सार्थकता स्थापित करावी, असे राष्ट्रपती म्हणाले.

नैसर्गिक संकट, कोरोना संकट आणि इतर आव्हानांचा सामना करून शेतकऱ्यांनी कृषी उत्पादन केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देश बांधील आहे, असे राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले.

सियाचीन आणि गलवान घाटीतील प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवान देशाची रक्षा करत आहेत. सैनिकांची शौर्य, देशप्रेम आणि त्यागावर सर्व देशवासियांना गर्व आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

अंतराळ, कृषी क्षेत्र, शैक्षणिक संस्था ते रुग्णालयांपर्यंत वैज्ञानिकांनी आपले जीवन आणि कार्य सुधारले आहे. अहोरात्र मेहनतीने, कोरोना-विषाणूचे डी-कोडिंग करून आणि अगदी थोड्या वेळातच लस विकसित करून आपल्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी एक नवीन इतिहास रचला आहे. देशातील सर्व शेतकरी, सैनिक आणि शास्त्रज्ञ विशेष कौतूकासाठी पात्र आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

गेल्या वर्षी जगाने कोरोना संकटाचा सामना केला. केवळ आपल्या बंधुत्वाच्या घटनात्मक आदर्शांच्या बळावरच या संकटाचा प्रभावीपणे सामना करणे शक्य झाले आहे. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवा प्रशासक आणि ज्यांनी स्वत: चा जीव धोक्यात घालत देशातील नागरिकांची काळजी घेतली. यात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयाप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असे राष्ट्रपती म्हणाले.

कोरोना महामारीमुळे मुले आणि तरुण पिढीच्या शिक्षण प्रक्रियेत अडथळा आला होता. मात्र, आपल्या शैक्षणीक संस्था आणि शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आणि शिक्षण प्रकिया सुरु राहिली, असे राष्ट्रपती म्हणाले.

बिहार, जम्मू-काश्मीर आणि लडाखसारख्या आव्हानात्मक भागात निवडणुका घेण्यात आल्या. हे आपल्या लोकशाही आणि निवडणूक आयोगाचे कौतुकास्पद यश आहे. न्यायपालिकेने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्याय प्रक्रिया सुरूच ठेवली, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

आपत्तीचे संधीमध्ये रुपांतर करत पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत मोहीम’ ची हाक दिली. देशातील नागरिक आणि तरुण एक स्वावलंबी भारत घडविण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ देत आहे. या मोहिमेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन आणि स्टार्ट-अप इको सिस्टम अधिक मजबूत बनवून आर्थिक वाढीसह रोजगार निर्मितीसाठी पावले उचलली गेली आहेत. आत्मनिर्भर भारत अभियान एका जनआंदोलनाचे रूप घेत आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

नव्या भारतात सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, पोषण महिलांचे कल्याण यावर विशेष भर देत आहोत. तसेच शांततेविषयीच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम असलो तरी आपले सैन्य, हवाई दल आणि नौदल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. प्रत्येक परिस्थितीत आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असे राष्ट्रपती म्हणाले.

Last Updated :Jan 25, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.