ETV Bharat / bharat

Jaipur to Mumbai Train firing : आरपीएफ जवानाने वरिष्ठांसह तीन प्रवाशांची हत्या का केली?

author img

By

Published : Jul 31, 2023, 2:28 PM IST

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. ही घटना सोमवारी पहाटे मुंबई सेंट्रल एसएफ एक्स्प्रेसमध्ये दहिसर आणि मीरा रोड दरम्यान घडली. चेतन कुमार, असे गोळीबार करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचे नाव आहे. त्याने हत्या का केली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

कॉन्स्टेबल चेतनकुमार
कॉन्स्टेबल चेतनकुमार

पालघर: मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल चेतन कुमारने धावत्या रेल्वेमध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात या 4 जणांचा मृत्यू झाला आहे. चेतन कुमारला अटक करण्यात आली असून त्याला बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आरोपीला दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अशी घडली घटना: रेल्वेमध्ये गोळीबाराची घटना सोमवारी पहाटे मुंबई सेंट्रल एसएफ एक्स्प्रेसमध्ये दहिसर आणि मीरा रोड दरम्यान घडली. घटनेनंतर पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, सुरतहून मुंबईला येत होता. या प्रवासादरम्यान वापी येथे चेतन आणि बी-५ बोगीमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये वाद झाला होता. यात चेतनच्या संतापाचा पारा चढला. त्याने स्वत:कडील रिव्हॉल्व्हर प्रवाशांवर रोखले. यावेळी आरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक टिका राम मीना तेथे आले. प्रवाशांवर पिस्तूल रोखून असलेल्या चेतनची ते समजूत काढू लागले. मात्र, संतापलेल्या चेतनने त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर चेतन सिंह याने इतर तीन प्रवाशांनाही गोळ्या घातल्या.

गोळीबारानंतरचा व्हिडिओ व्हायरल- चेतन कुमारचा रेल्वेमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्याच्या गोळीबारात मृत पडलेल्या मृतदेहासमोर उभा असल्याचे दिसत आहे. एका विशिष्ट समाजाविषयी द्वेषपूर्ण विधान करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 'ईटीव्ही भारत'कडे देखील आहे. परंतु समाजाप्रती संवदेनशील भावना ठेवून 'ईटीव्ही भारत' तो व्हिडिओ प्रसारित करणार नाही.

कुठला आहे चेतन: हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी असलेला आरपीएफचा जवान कॉन्स्टेबल चेतन कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे. त्याची अनुकंपावर आरपीएफ दलात भरती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच भावनानगर रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावत होता. त्यानंतर चेतन कुमारची मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात बदली करण्यात आली होती. तर मृत टीकाराम रेल्वे स्थानकात आरपीएफ दलात तैनात होते. मृत झालेला सहाय्यक पोलीस निरीक्षक टीका राम मीना हा मूळचा राजस्थानचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

तापट स्वभावाचा चेतन : मिळालेल्या माहितीनुसार, चेतन कुमार हा एस्कॉर्टिंगच्या ड्युटीवर होता. त्याला अनुकंपावर नोकरी मिळाली होती. चेतन नुकताच सुट्टीवरुन परतला होता. तो सुरतहून मुंबईकडे येत होता. त्या प्रवासादरम्यान त्याचे प्रवाशांसोबत भांडण झाले. चेतन हा तापट स्वभावाचा असल्याने त्याच्या संतापाचा पारा लगेचच चढला. भांडणावेळी डोकं फिरल्याने त्याने समोर दिसेल त्याला गोळ्या घातल्या, अशी माहिती रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

हेही वाचा-

  1. Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?
  2. Jaipur to Mumbai Train firing : जयपूर-मुंबई रेल्वेत नेमका गोळीबार कसा झाला? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.