कुस्ती परिषदेचा 'आखाडा': निलंबन मान्य नाही, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेणार; संजय सिंह यांचं सरकारला आव्हान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 7:07 AM IST

Updated : Jan 2, 2024, 12:14 PM IST

Indian Wrestling Controversy

Indian Wrestling Controversy : केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती परिषदेचे निवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचं निलंबन केलं आहे. मात्र हे निलंबन मान्य नसल्याचं स्पष्ट करत संजय सिंह यांनी सरकारला आव्हान दिलं आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरवण्यावर संजय सिंह हे ठाम आहेत.

नवी दिल्ली Indian Wrestling Controversy : भारतीय कुस्ती परिषदेच्या निवडणुकीवरुन मोठा वाद रंगला आहे. कुस्ती परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचं तदर्थ समिती आणि सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं निलंबन केलं आहे. मंत्रालय आणि तदर्थ समितीनं केलेलं निलंबन मान्य नसल्याचं स्पष्ट करत संजय सिंह यांनी सरकारला सोमवारी आव्हान दिलं आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरवणारचं यावर संजय सिंह हे ठाम आहेत. त्यामुळं कुस्ती परिषदेचा वाद आणखी चिघळला आहे.

कुस्ती परिषदेच्या अध्यक्षांचं निलंबन : भारतीय कुस्ती परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या गटाचे संजय सिंह यांनी कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. मात्र त्यामुळं मोठा वाद रंगला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपली पदकं सरकारला परत करण्याचा सपाटा लावला. त्यामुळं कुस्ती परिषदेची निवडणूक वादात सापडली. त्यानंतर सरकारनं नवनियुक्त अध्यक्षांचं निलंबन केलं.

भूपेंद्र सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती : भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुका झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच क्रीडा मंत्रालयानं कुस्ती परिषदेच्या अध्यक्ष आणि इतरांना निलंबित केलं. सरकारच्या विनंतीवरून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) भूपेंद्र सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पॅनेलची स्थापना केली. या समितीत माजी हॉकीपटू एम एम सोमाया आणि माजी बॅडमिंटनपटू मंजुषा कंवर यांचा समावेश आहे. तदर्थ समितीनं 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान जयपूर इथं सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप आयोजित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं हा वाद आणखी चिघळला.

संजय सिंह यांचं सरकारला आव्हान : भारतीय कुस्ती परिषदेचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह यांनी मंत्रालयानं केलेलं निलंबन मान्य नसल्याचं स्पष्ट केलं. आमच्या "आमच्या निवडणुका लोकशाही पद्धतीनं झाल्या आहेत. रिटर्निंग ऑफिसरनं कागदपत्रांवर सह्या केल्या असून त्याकडं दुर्लक्ष कसं करणार ? ही तदर्थ समितीच आम्हाला मान्य नाही. त्यामुळं आम्हाला हे निलंबन मान्य नाही. भारतीय कुस्ती परिषद WFI चांगलं काम करत आहे. राज्य संघटनांनी संघ पाठवलाच नाही, तर तदर्थ समिती राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन कसं करणार ? आम्ही लवकरच आमची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करणार आहोत. त्यासाठी लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येणार आहे. त्याबाबतची नोटीस एक ते दोन दिवसात पाठवली जाणार आहे" असंही संजय सिंह यांनी यावेळी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. कुस्तीपटूंच्या विरोधानंतर क्रीडा मंत्रालयाला जाग; भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द
  2. माझा कुस्तीशी आता काहीही संबंध नाही, संजय सिंह माझे नातेवाईक नाहीत - ब्रिजभूषण शरण सिंह
  3. संजय सिंहांची WFI अध्यक्षपदी निवड होताच कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा; पत्रकार परिषदेत बोलताना अश्रू अनावर
Last Updated :Jan 2, 2024, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.