ETV Bharat / bharat

तुमच्या राशींनुसार उजळेल का तुमचे भाग्य? वाचा 2024 चे राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 1:03 AM IST

जुने वर्षे जाऊन, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आपले नवीन वर्षे चांगले जावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच नवीन वर्षात आपल्या आयुष्यात काय बदल होतील, हे जाणुन घेण्याची प्रत्येकाला उत्सुक्ता असते. चला तर मग नवीन वर्षात 'या' 12 राशींचे 'वार्षिक राशी भविष्य' काय असेल ते जाणुन घेऊया.

YEARLY HOROSCOPE 2024
वार्षिक राशीभविष्य

मेष : अत्यंत कार्यक्षम असता व स्वतःचे काम स्वतःच करण्यास प्राधान्य देता. वर्षाच्या सुरवातीस गुरु आपल्या राशीस व शनी लाभस्थानी असल्यामुळे आपणास उत्तम अर्थ प्राप्ती होईल. योग्य निर्णय घेतल्याने जीवनात प्रगती करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपण आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घेऊन जीवनात प्रगती कराल. आपली अर्थ प्राप्ती सुद्धा दिवसें - दिवस वाढतच राहील. असे असले तरी आपण अति आत्मविश्वासात राहू नये. शासन सुद्धा आपल्या पाठीशी राहील. परंतु व्ययातील राहू त्रास सुद्धा देत राहील. ह्या वर्षात आपणास आपल्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपले खर्च सुद्धा वाढतील. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. आपणास जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती ह्या वर्षी पूर्ण होऊ शकते. आपणास परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. मनात दडून बसलेल्या जुन्या इच्छा पूर्ण होतील व त्यामुळे मन हर्षित होईल. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी सुद्धा खूप काही कराल. तीचे हृदय जिंकण्यासाठी तिला एखादी चांगली भेटवस्तू सुद्धा द्याल. वडिलांशी असलेल्या संबंधात सुद्धा चढ - उतार येतील. नशिबाच्या प्राबल्यामुळे आपली कामे होतील. कोणतेही काम पैश्यां अभावी अडून राहणार नाही. आज पर्यंत आपल्या ज्या काही योजना पूर्ण झाल्या नव्हत्या त्या ह्या वर्षी पूर्ण होतील. हे वर्ष आपण अपेक्षा सुद्धा केली नसेल इतके जास्त चांगले आपणास देणार आहे. व्यक्तिगत संबंधात आपणास चांगले यश प्राप्त होईल. प्रणयी जीवनात एखादी सुखद बातमी सुद्धा मिळू शकते. हे वर्ष विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी सुद्धा चांगले आहे. सासुरवाडी कडील लोक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतील. काही नवीन लोकांच्या सहकार्याने व्यापारात प्रगतीची संधी मिळेल. आपल्या योजना फलद्रुप होतील. सरकारी क्षेत्राकडून आपणास चांगला लाभ प्राप्त होऊन आपणास मान - सन्मान व सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा मिळू शकते. ह्या वर्षी आपणास आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त लक्ष द्यावे लागेल. इतर सर्व गोष्टीत आपोआपच सुधारणा होतील. ह्या वर्षात आपल्या प्रेमिकेस सोडून इतर स्त्री मध्ये आपले मन गुंतवू नये. अन्यथा सर्वांचे नुकसान होऊ शकते.

वृषभ : २०२४ चे हे नूतन वर्ष आपल्यासाठी खूपच खास काहीतरी घेऊन येणारे आहे. ह्या वर्षी आपणास आपला क्रोध नियंत्रित ठेवावा लागेल, अन्यथा होऊ घातलेल्या कामात त्रास होईल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपल्यावर खर्चाचा दबाव व मानसिक दडपण असेल, जे वर्षाच्या अधिकांश भागात आपल्या अनुभवास येईल. आपणास सुरवाती पासूनच त्यास सामोरे जाण्याची तयारी करावी लागेल. कितीही आव्हाने आपल्या समोर आली तरी आपण त्या समर्थपणे पेलू शकाल हे लक्षात ठेवावे. ह्या वर्षी आपणास चांगली अर्थप्राप्ती होईल. आपल्या इच्छा पूर्ण होतील. घरातील वडिलधाऱ्यांचा आपणास पूर्ण पाठिंबा राहील. आपण जर वडिलोपार्जित व्यवसाय करत असाल तर ह्या वर्षी आपण त्यात सुद्धा चांगले यशस्वी होऊ शकता. आपणास जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी ऑगस्ट व ऑक्टोबर महिना सर्वात जास्त अनुकूल आहे. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हे वर्ष चांगले आहे. ह्या वर्षी आपणास परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. आपणास जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर लवकरात लवकर व्हिसासाठी अर्ज करा. त्यात आपण ताबडतोब यशस्वी होऊन परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकाल. ह्या वर्षात आपली प्रकृती काहीशी नाजूक राहील, तेव्हा त्याकडे प्रथम लक्ष द्या. लोकांचे बोलणे ऐकून चिटफंडात पैसा गुंतवू नका, अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत सावध राहावे लागेल. कोणत्याही व्यक्तीची किंवा प्रॉपर्टीची पूर्ण माहिती नसल्यास व्यवहार करू नये, अन्यथा आपणास दगा फटका होण्याची संभावना आहे. वर्षाच्या अखेरच्या महिन्यात मुलांच्या प्रकृतीत बिघाड होण्याची संभावना असल्याने त्या बाबत थोडे सावध राहावे. ह्या वर्षाच्या मार्च ते ऑगस्ट महिन्या दरम्यान कुटुंबातील एखादी वृद्ध व्यक्ती आजारी पडून त्याच्या आजारपणावर खूप खर्च सुद्धा करावा लागेल. तसेच रुग्णालयाच्या फेऱ्या सुद्धा माराव्या लागू शकतात. थोडी काळजी घेतल्यास बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. हे लक्षात ठेवावे. आपणास जर आपल्या जन्मस्थानाहून दूरवरच्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर ह्या वर्षी त्या संबंधी आपणास चांगली बातमी मिळू शकते.

मिथुन : वर्षाच्या सुरवातीस आपण काहीसे क्रोधीत झाल्याचे दिसून येईल. आपल्या नाते संबंधांना योग्य प्रकारे समजून न घेतल्याने आपणास अनेकदा त्रास होऊ शकतो. आपणास आपल्या वैवाहिक जीवनासाठी सुद्धा वेळ काढावा लागेल, अन्यथा आपणास जोडीदाराच्या क्रोधास सामोरे जावे लागू शकते व त्यांची समजूत काढणे आपल्यासाठी जड जाईल. आपल्या सासुरवाडी कडील लोक जसे कि जोडीदाराची भावंडे आपणास खूप उपयोगी पडतील व आपल्यासाठी ते नशीबदार ठरतील. त्यांच्या बरोबर काम केल्याने आपण यशस्वी व्हाल. ह्या वर्षी आपणास परदेश वारी करण्याची भरपूर संधी मिळेल. आपणास जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ह्या वर्षी आपली हि इच्छा पूर्ण होईल. परदेशाशी केलेल्या व्यापारात लाभ होईल. परदेशी संपर्कातून आपल्या जीवनात ख़ुशी येऊन अर्थप्राप्तीत वाढ होईल. आपणास भावंडांचे प्रेम मिळेल, परंतु कौटुंबिक जीवनात काहीशी अशांतता राहील. कौटुंबिक सौख्य कमीच मिळेल. कामातील अति व्यस्ततेमुळे आपण कुटुंबास योग्य तितका वेळ देऊ शकणार नाही. मित्र व शत्रू दोघांची भेट होईल. मित्र पाठीशी राहतील व ते मोठ्यात मोठया संकटातून बाहेर पडण्यास आपणास मदत करतील. आपण जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर व्यावसायिक भागीदारामुळे आपला व्यवसाय जलद गतीने प्रगती करेल व आपणास चांगली अर्थप्राप्ती सुद्धा होईल. आपल्या अपेक्षेहून जास्त लाभ होईल. आपल्या योजना यशस्वी होतील. प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने होत असल्याने आपण यशस्वी होत जाल. आपणास आपला व्यवसाय व आपले जीवन ह्यासाठी एखाद्या तज्ञ व्यक्तीचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एखाद्या तज्ञ व्यक्तीची मदत मिळेल. ते एखादी मोठी कामगिरी सुद्धा करू शकतील. आपण ज्या क्षेत्रात आहात त्यात चांगले यश प्राप्त कराल. वर्षाच्या मध्यास माता - पित्यांच्या प्रकृतीच्या बाबतीत आपण काहीसे चिंतीत होऊ शकता. वेळेवर त्यांच्यावर उपचार करा, अन्यथा ताण येईल. भावंडां बरोबरच कार्यालयीन सहकाऱ्यांचे सुद्धा सहकार्य मिळेल. असे असले तरी आपण अति आत्मविश्वासात राहू नये. आपल्या व्यक्तिगत गोष्टी कोणाला सांगू नका, अन्यथा अडचणीत याल.

कर्क : आपण अत्यंत भावनाप्रधान असता. आपण कुटुंबियांसह राहण्यास जास्त प्राधान्य देता. ह्या वर्षी भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकते. वर्षाच्या सुरवातीसच आपण अर्थप्राप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक गोष्टींवर सुद्धा आपले लक्ष राहील. कुटुंबियांच्या पाठबळामुळे आपण काही मोठे निर्णय घ्याल. आपण जर वडिलोपार्जित किंवा कुटुंबाच्या अनेक वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय करत असाल तर ह्या वर्षी व्यवसायात आपणास मोठा लाभ होईल. आपली आर्थिक स्थिती उंचावू शकेल. परदेशवारी संभवते. आपण जर लष्कर, वायुदल किंवा पोलिसात नोकरी करण्यास इच्छुक असाल व त्यासाठी स्पर्धा परीक्षा देणार असाल तर ह्या वर्षी यशस्वी होण्याची संभावना असल्याचे दिसत आहे. कौटुंबिक जीवन सुखद होईल. कुटुंबीय मदत करतील. मातेशी विशेष प्रेम राहील. मातेकडून काही चांगल्या कामाची शिकवण सुद्धा मिळेल. तिच्या कडून आपणास मार्गदर्शन मिळेल व त्यामुळे एखादी नवीन संधी सुद्धा आपणास मिळू शकते. वडिलांशी सुद्धा आपले संबंध उत्तम राहतील, परंतु त्यांच्या प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसू शकते. वडिलांशी आपले मतभेद सुद्धा संभवतात, तेव्हा त्यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा व त्यांची काळजी घ्या. आपण जर रिअल इस्टेटशी संबंधित असलात तर जमीन - जुमल्याची काही महत्वाचे दस्तावेज आपणास काळजीपूर्वक जपून ठेवावे लागतील. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करावयाची असल्यास ह्या वर्षी एखाद्या वादापासून दूर राहा, अन्यथा कोर्ट - कचेरीचा सामना करावा लागू शकतो. कर्ज काढून प्रॉपर्टी खरेदी करणे आपल्या हिताचे होईल. अशी प्रॉपर्टी आपणास यशस्वी करेल व आपल्यासाठी नशीबवान सुद्धा ठरू शकेल. कोणावरही विचार न करता विश्वास ठेवू नका. भविष्यात कोणत्याही वादास सामोरे जावे लागू नये म्हणून पूर्ण पडताळणी करूनच प्रॉपर्टीच्या दस्तावेजांवर स्वाक्षरी करावी. सासुरवाडी कडील लोकांकडून आपणास खूप चांगल्या उपयुक्त गोष्टी ऐकावयास मिळतील व काही महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा ते आपणास खूप मदत करतील. ह्या वर्षी वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. संततीशी संबंधीत सुखद बातमी मिळेल. संततीस सुद्धा सौख्य प्राप्ती होईल.

सिंह : हे नवीन वर्ष आपणास खूप चांगले परिणाम मिळवून देणारे आहे. आपल्या खोळंबलेल्या योजनांना गती येईल. आपण आपल्या व्यावसायिक प्रवृत्तींना पुढे घेऊन जाण्यात सुद्धा यशस्वी व्हाल. आपणास जर व्यापारवृद्धी करावयाची असेल तर ह्या वर्षी आपण त्यात यशस्वी व्हाल. ह्या वर्षी आपणास अचानक मोठा धनलाभ होण्याची संभावना आहे. आपले आरोग्य सुद्धा उत्तम राहील. परंतु, वर्षाच्या सुरवातीस प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. ह्या वर्षी आपसातील समन्वय बिघडून कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची संभावना असल्याने आपणास आपल्या कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. व्यापारा निमित्त अनेकदा परदेशवारी करावी लागू शकते. उच्च शिक्षणासाठी सुद्धा हे वर्ष अनुकूल आहे. ह्या वर्षी आपली उन्नती होईल. हळू - हळू जीवनातील सर्व क्षेत्रात आपण उन्नती कराल व वर्षाच्या मध्या पर्यंत आपण अत्यंत चांगल्या स्थितीत याल. जस - जसे हे वर्ष पुढे सरकेल तस - तसे आपल्याला खूप काही प्राप्त होत असल्याचे आपणास वाटू लागेल. त्यामुळे आपण खुश व्हाल व आपला आत्मविश्वास उंचावेल. आपण जर एखादे एनजीओ चालवत असाल किंवा एखाद्या संस्थेची फ्रेचाईजी घेऊन काम करत असाल तर ह्या वर्षी आपण त्यात खूपच यशस्वी व्हाल. आपण नाव सुद्धा कमवाल व आपल्या कामात वाढ सुद्धा होईल. त्यामुळे आपणास चांगली अर्थप्राप्ती सुद्धा होईल. आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक उपलब्धी सुद्धा प्राप्त करू शकाल. गर्भवती महिलांना वर्षाच्या सुरवातीस थोडी काळजी घ्यावी लागेल. पोटात उष्णता वाढून रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. आपण आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या सुद्धा उत्तम प्रकारे पार पाडाल. ह्या संपूर्ण वर्षात आपणास सूर्यदेवतेची आराधना करावी लागेल. असे केल्याने आपण शक्तिशाली होऊन आजारी पडण्या पासून चार हात लांब राहू शकाल. ह्या वर्षात आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत असताना आपणास आपल्या मित्रांना सुद्धा मदत करावी लागेल. वर्षाच्या सुरवातीस आपण घराचे नूतनीकरण करू शकता. माता - पिता आपल्या पाठीशी उभे राहतील. त्यांच्या आशीर्वादाने आपली सर्व कामे होतील. आपणास नशिबाची साथ सुद्धा मिळेल व त्यामुळे वर्षाच्या सुरवातीस आपण जे काम मनापासून करू इच्छित असाल त्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे समाजात आपली प्रतिष्ठा उंचावेल. आपली सामाजिक प्रतिमा प्रबळ होऊन सामाजिक वर्तुळ सुद्धा वाढेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्यास एप्रिल नंतरचे दिवस जास्त अनुकूल आहेत. आपली जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर मार्च ते ऑक्टोबर दरम्यान आपण त्यात यशस्वी होऊ शकाल.

कन्या : ह्या वर्षाची सुरवात आपल्यासाठी काहीशी प्रतिकूल असेल. मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी आपणास खूपच प्रयत्न करावे लागतील. ह्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपणास एखाद्या मार्गदर्शकाची गरज सुद्धा भासू शकते. असे असले तरी त्या नंतर आपण हळू हळू पूर्ण वर्षभर उन्नतीच्या मार्गावर वाटचाल कराल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबीय सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतील. स्वतः सर्वात पुढे जात असताना इतर लोकांना मागे सोडण्याच्या वृत्तीचा अवलंब करू नका. अन्यथा आपलीच माणसे आपल्यावर रुसतील व आपण एकटे पडाल. हे वर्ष स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खूपच अनुकूल आहे. आपण जर राजकारणात असाल तर आपणास घवघवीत यश प्राप्त होऊन एखादे पद सुद्धा आपणास प्राप्त होऊ शकते. आपल्याकडून भरपूर प्रयत्न करा, यश आपल्या पायांशी लोळण घेईल. ह्या वर्षी परदेशवारीची दाट संभावना असल्याने आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न करावा. कोणाच्याही भावना दुखवू नका. गरजवंतास वेळो - वेळी मदत करा. असे केल्याने ह्या वर्षात आपण बरेच काही प्राप्त करू शकाल. ह्या वर्षात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष चढ - उताराने भरलेले आहे. ह्या वर्षात आपल्याला जोडीदाराशी असलेल्या नात्याची खरी ओळख व्हावी म्हणून कोणतीही समस्या निर्माण होऊ न देण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. स्वतःला एकटे समजू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कायद्याशी संबंधीत बाबीत आपण यशस्वी व्हाल. वर्षाच्या मध्या नंतर आपणास सामाजिक स्तरावर चांगला मान - सन्मान प्राप्त होईल. ह्या वर्षी आपणास एखादा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे आपण अत्यंत आनंदित व्हाल. संशोधन कार्यात गुंतलेल्याना उत्तम यश प्राप्ती होऊ शकते. ह्या वर्षात सासुरवाडी कडील लोक आपल्या पाठीशी उभे राहतील. ते आपणास आर्थिक मदत करत असल्याचे सुद्धा दिसून येईल. आपणास जर एखादा नवीन व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर तो वर्षाच्या मध्या नंतरच करावा, म्हणजे आपण त्यात यशस्वी होऊ शकाल. ह्या वर्षात जुने प्रेम - प्रकरण पुन्हा सुरु होऊ शकते. गुपचूप खर्च करण्याची संवय आपणास अडचणीत टाकू शकते. तेव्हा वायफळ खर्च टाळा व पैश्याचे महत्व ओळखा. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत ह्या वर्षी आपणास चांगले यश मिळू शकते. आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. ह्या वर्षी प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी दुहेरी सल्ला घेण्याचा प्रयत्न करावा.

तूळ : तूळ राशीच्या व्यक्ती जीवनात समतोलास महत्व देणारे व महत्वाकांक्षी असतात. ह्या वर्षाच्या सुरवातीस आपण आपल्या महत्वाकांक्षाची पूर्तता करण्यास प्राधान्य द्याल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा आपण पुन्हा प्राप्त कराल. त्यामुळे आपण जीवनाकडे वेगळ्या नजरेने बघण्यास सुरवात कराल. असे केल्याने जीवनास नावीन्य प्राप्त होऊन आपणास यश प्राप्ती सुद्धा होईल. वर्षाच्या सुरवातीस आपण आपल्या वाणीने व व्यवहाराने लोकांना आपल्याकडे ओढण्यात यशस्वी व्हाल, व त्यामुळे आपली सर्व कामे होताना दिसतील. व्यापार असो किंवा नोकरी किंवा स्वयं रोजगार, सर्व क्षेत्रात आपला दबदबा राहील. कुटुंबात सुद्धा आपली प्रतिष्ठा चांगलीच राहील. आपले धाडस वाढेल व त्यामुळे आपण व्यापारात जोखीम घ्याल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपल्यासाठी उन्नतीचे मार्ग मोकळे होत असल्याचे दिसून येईल. भावंडांच्या बाबतीत काही समस्या समोर येऊ शकतात. परंतु आपण आपले सामंजस्य दाखवून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून येईल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचे प्रेम मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने आपली कामे होतील. परदेशवारीची तयारी करत असलेल्या जातकांना सुरवातीस काही अडचणींचा सामना करावा लागेल. कदाचित त्यांचा व्हिसा मिळण्यात विलंब होऊ शकतो, परंतु निराश होऊ नका. कारण काही अडचणी व काही औपचारिकता पूर्ण केल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांना व्हिसा मिळू शकतो. ह्या वर्षी आपले खर्च जास्त होतील. खर्च इतके कसे वाढले हे आपणास समजणार सुद्धा नाही. आपणास सर्व खर्च योग्य असल्याचे वाटेल व त्यामुळे अनावश्यक रूपात पैसे खर्च होतील. ह्या व्यतिरिक्त धनलाभाची सुद्धा संधी मिळेल व त्यामुळे आपण बँकेतील शिल्लक वाढविण्यासाठी व बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसे पाहू गेल्यास ह्या वर्षी आपणास आर्थिक आघाडीवर उत्तम यश प्राप्त होऊ शकते. प्रेम संबंध सांभाळण्याचे आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकते. परंतु, आपण जर आव्हाने स्वीकारलीत व जीवनात समतोलास प्राधान्य दिले तर प्रणयी जीवनात सर्व काही मिळू शकेल. वैवाहिक जीवनात सुखद बातमी मिळेल. मुलांकडून सुद्धा आपणास ख़ुशी प्राप्त होईल. ह्या वर्षी आपणास मातुल घराण्याशी संभाव्य वादास सामोरे जावे लागू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. प्रॉपर्टीच्या खरेदी - विक्रीतून लाभ होईल. वर्षाच्या मध्यास आपणास नशिबाची साथ मिळेल व वर्षाच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंत चांगला आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या व्यक्ती आपल्या गोष्टी गुप्त ठेवण्यात तरबेज असतात. ह्या वर्षी आपणास ह्याचा खूपच चांगला फायदा होणार आहे. आपण आपल्या गुप्त योजना इतरां पासून गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ह्या वर्षी आपण खूप काही प्राप्त करू शकाल. वर्षाची सुरवात आपल्यासाठी खूपच चांगली होईल. आपले चुंबकीय आकर्षण लोकांच्या डोक्यावर बसेल व आपल्या चाहत्या वर्गात वाढ होईल. आपण पुरुष असा किंवा महिला, आपणास लोक पसंत करतील. त्यामुळे आपली बरीचशी कामे होतील. वैवाहिक जीवनात सुद्धा प्रेम व रोमांस बरोबरीत राहतील. हे वर्ष प्रणयी जीवनासाठी चढ - उतारांचे आहे. आपणास आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करण्यात थोडा संकोच वाटेल. अनेकदा आपण जरुरीपेक्षा जास्त बोलाल, जे तिला आवडणार नाही. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. कुटुंबीयांची प्रकृती, विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती आपणास त्रस्त करू शकते. आपणास जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर ह्या वर्षी आपण त्यात यशस्वी होऊ शकाल. कौटुंबिक दृष्ट्या समाजात आपली स्थिती मजबूत होईल. नोकरीत व व्यापारात आपणास कठोर प्रयत्न केल्यावरच यश प्राप्त होऊ शकते. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यावर आपला भर राहील. ह्या वर्षी मे महिन्या पर्यंत परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. त्या नंतर आपला विवाह होऊ शकतो. आपण जर अजून अविवाहित असाल तर ह्या वर्षी आपला विवाह होण्याची दाट संभावना आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांना सुद्धा यश मिळू शकते. हे वर्ष प्रकृतीच्या बाबतीत काहीसे प्रतिकूल असू शकते, तेव्हा आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करत राहावे. वर्षाच्या सुरवातीस अचानकपणे आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. ह्या वर्षी एखादा नवीन व्यवसाय सुरु करू शकता. वर्षाच्या सुरवातीस कोणाशीही वेडे - वाकडे बोलू नये. अन्यथा आपली होऊ घातलेली कामे सुद्धा बिघडू शकतात व कामात खोळंबा होऊ शकतो. ह्या वर्षी आपल्या बहुतांश इच्छा पूर्ण होतील, तेव्हा आनंद साजरा करा, परंतु पाय जमिनीवरच ठेवा. आपल्या माणसांवर प्रेम करा. कोणालाही आपल्या द्वारा निराश होण्याची संधी देऊ नका. त्यामुळे ह्या संपूर्ण वर्षात आपण यशस्वी होऊ शकाल.

धनु : आपण स्वभावाने कर्तव्याप्रती व जीवनाच्या उद्देशांप्रती दृढ निश्चयी असता. असे असले तरी आपण त्वरित क्रोधीत होत असता. परंतु आपले लक्षांक गाठणे हे आपले ध्येय असते. आपले विचार स्वतंत्र असतात व इतरांनी आपल्या विचारांच्या विरोधात जाऊ नये अशी अपेक्षा बाळगून असता. ह्या वर्षी आपण नवीन उंची गाठण्यात यशस्वी व्हाल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपला आत्मविश्वास उंचावलेला असल्याने जीवनातील विविध क्षेत्रात आपण यशस्वी व्हाल. आपल्या आर्थिक प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. वर्षाच्या सुरवातीसच मोठा धनलाभ संभवतो. आपण सढळ हस्ते पैसा खर्च कराल. आपल्या मनोरंजना व्यतिरिक्त आवश्यक वस्तूंसाठी सुद्धा भरपूर पैसा खर्च कराल. वर्षाची सुरवात आरोग्यास चांगली असली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपली दिनचर्या व व्यायाम किंवा ध्यानधारणे बरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कौटुंबिक आघाडीवर हे वर्ष काहीसे त्रासदायी ठरणारे आहे. कुटुंबियात आपसात योग्य समन्वय नसल्याने अनेकदा भांडणाची किंवा वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. आपणास गृहसौख्यात कमतरता असल्याचे जाणवेल. आपण आपल्या कामात अति व्यस्त राहाल, व त्यामुळे घराकडे सुद्धा योग्य तितके लक्ष देऊ शकणार नाही. परदेशात जाण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना वर्षाच्या सुरवातीस यश मिळू शकते. त्या नंतर त्यांना ऑगस्ट महिन्या पर्यंत वाट बघावी लागू शकते. आपणास जर एखादे वाहन खरेदी करावयाचे असेल तर त्यासाठी हे वर्ष विशेष अनुकूल नसल्याने ते विचारपूर्वक करावे. विशेष मुहूर्त बघूनच वाहन खरेदी करणे आपल्यासाठी हितावह होईल. शनी महाराजांच्या कृपेने आपली बरीचशी कामे होऊ लागतील, व त्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन आपण जीवनात प्रगती करू शकाल. नोकरी असो किंवा व्यापार किंवा स्वयं रोजगार सर्व क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम होईल. ह्या वर्षी आपणास आपल्या एखाद्या भावंडास मदत करण्याची संधी मिळेल, जी आपल्या जीवनासाठी एक महत्वाची घटना असेल. अशा परिस्थितीत आपण जर त्यांना मदत केलीत तर ते आयुष्यभर आपली आठवण काढतील व त्यांच्याशी आपल्या संबंधात सुद्धा सुधारणा होईल.

मकर : हे नवीन वर्ष आपल्यासाठी खूपच चांगले असणार आहे. ह्या वर्षी आपणास आर्थिक प्राप्ती सुद्धा उत्तम होईल. आजवर आपण जे काही प्रयत्न केले आहेत, त्यातून आता आपणास भरपूर पैसा मिळणार आहे. असे असले तरी खर्च सुद्धा होणार आहेत, परंतु अर्थ प्राप्ती चांगली झाल्याने आपली सर्व कामे सुरळीत होतील. आजवर आपण जितक्या समस्यांना सामोरे गेला आहात व जे काही प्रश्न आपल्या समोर आले आहेत, ते सर्व काही हळू - हळू दूर होतील. कौटुंबिक आघाडीवर वर्षाची सुरवात आपल्यासाठी चांगलीच असेल. गुरुकृपेने कुटुंबात ऐक्य राहील. माता - पित्यांचे सहकार्य व पाठिंबा सुद्धा आपणास मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या व्यापारात उन्नती होईल. आपण काही मोठे निर्णय घेऊ शकाल. त्यात त्यांची महत्वाची भूमिका असेल. आपणास पैतृक संपत्ती सुद्धा मिळू शकते. कुटुंबात आपले प्रभुत्व वाढेल. आपणास मोठा सन्मान मिळून लोक आपले म्हणणे ऐकतील. आपण पौष्टिक आहार घेऊन आपल्या उत्तम आरोग्याचा आनंद सुद्धा घेऊ शकाल. कोणतेही काम पैश्यांच्या अभावी अडून राहणार नसल्याने आपण निश्चिन्त राहावे. बराचसा वेळ मित्रांच्या सहवासात घालवाल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. समाज माध्यमांवर सुद्धा आपण बरेचसे कार्यरत राहाल व आपल्या फॉलोवरची संख्या सुद्धा वाढणार आहे. तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वात कशी सुधारणा करावयाची ह्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. हे वर्ष आपणास बरेच काही देणारे आहे. आपणास परदेशात जाऊन आपले कौशल्य दाखविण्याची संधी सुद्धा मिळू शकते. आपला एखादा छंद जोपासण्यासाठी हे वर्ष उत्तमच आहे. ह्या वर्षात भरपूर प्रवास सुद्धा होतील. लहान - सहान प्रवास करून आपण ताजेतवाने व्हाल. मित्रांसह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा ठरवाल. कुटुंबियांसह तीर्थक्षेत्रा व्यतिरिक्त रमणीय ठिकाणी फिरावयास गेल्याने आपणास नवीन ऊर्जा प्राप्त होईल. आपल्यातील कठोरपणा आपणास अनेकदा अडचणीत सुद्धा टाकू शकतो, कारण आपण खरे बोलाल ज्यात कठोरपणा असेल व तो समोरच्या व्यक्तीस रुचणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्या व्यतिरिक्त कोणाशीही कटू बोल बोलू नका. अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. धर्म - कर्माकडे आपला कल वाढेल व आपण एखाद्या धार्मिक स्थळाच्या निर्माणात सुद्धा आपला खारीचा वाटा उचलू शकाल.

कुंभ : कुंभ राशीच्या व्यक्ती व्यवहार कुशल असतात. आपले म्हणणे पटवून देणारे व आपल्या वक्तव्याने समोरच्यास आश्चर्यचकित करणारे असू शकतात. आपण आपल्या नियमात कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यास तयार नसता. परंतु जे ध्येय बाळगून आपण काम करत असता ते पूर्ण केल्या शिवाय स्वस्थ बसत नाही. आपला राशिस्वामी शनी हे संपूर्ण वर्ष आपल्या राशीतच राहणार असल्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. आपण जास्त परिपकव झाल्याचे दिसून येईल. आपली परिपकवता आपल्या कामातून व आपल्या कृतीतून दिसू लागेल. व्यक्तिगत जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन असो, प्रत्येक ठिकाणी आपण उत्तम कामगिरी करत असल्याचे दिसून येईल. वर्षाच्या सुरवातीस आपली अर्थप्राप्ती व प्रकृती उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी आपणास नव - नवीन कामे मिळतील जी आपण वेळेच्या पूर्वीच पूर्ण करून दाखवाल. त्यामुळे ह्या वर्षात आपणास एखादी मोठी संधी मिळू शकते. आपण एखादे काम असे करून दाखवाल कि ज्यामुळे आपणास एखादे बक्षीस सुद्धा मिळू शकेल. ह्या वर्षी सरकारी क्षेत्राकडून आपणास एखादा मोठा लाभ होणार आहे. आपणास जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर फेब्रुवारी व मार्च महिना त्यासाठी जास्त अनुकूल आहे. धर्म - कर्माच्या बाबतीत सुद्धा आपण खूप स्वारस्य दाखवाल. आपण एखाद्या मंदिर - मस्जिद किंवा धार्मिक ठिकाणी सेवा करण्यास प्राधान्य द्याल. धार्मिक संस्थेशी संबंधित एखाद्या ठिकाणी आपणास एखादे मोठे पद सुद्धा मिळू शकते. सध्या आपल्यावर राहूचा प्रभाव असल्याने अनेकदा आपण असे काही शब्द प्रयोग कराल जे समोरच्या व्यक्तीस अचंबित करू शकतील. आपण जे काही सांगाल त्यावर समोरची व्यक्ती सहजा - सहजी विश्वास ठेवणार नाही. कारण सांगताना आपण असे काही बोलाल कि ज्यावर कोणाचाही पटकन विश्वासच बसणार नाही. व्यापार व नोकरी अशा दोन्ही ठिकाणी आपली कामगिरी नजरेस भरेल. आरोग्याच्या बाबतीत आपण निश्चिन्त राहावे. कोणतीही मोठी समस्या निर्माण होणार नसली तरी केतुमुळे एखादी दडून बसलेली किंवा गुप्त समस्या त्रस्त करू शकते. वर्षाच्या सुरवातीस आपले कौटुंबिक जीवन खूपच सुखद असेल. आपणास आपल्या माता - पित्यांचे प्रेम मिळेल. त्यांच्यासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखू शकाल. वर्षभर कुटुंबियांचे प्रेम आपणास मिळेल. आपली मोठी भावंडे ह्या वर्षी आपणास खूप मदत करतील. ते आपली आर्थिक स्थिती उंचावण्यात आपल्याला सहकार्य करतील.

मीन : मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने कष्टाळू व शिक्षणास महत्व देणारे असतात. इतकेच नव्हे तर ते खूपच भावनाप्रधान सुद्धा असतात. भावनाप्रधान असल्याने लोक अनेकदा त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना रडवतात. ह्या वर्षी आपणास अति भावनाप्रधान होणे टाळावे लागेल, अन्यथा आपले त्रास वाढू शकतात. आता हे संपूर्ण वर्ष राहू आपल्या राशीतून भ्रमण करणार आहे. त्यामुळे आपल्या वागण्या - बोलण्यात फरक पडेल. आपण जे काही सांगाल ते पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आपणास मानसिक नैराश्याचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. जे करण्यास आपण असमर्थ असाल ते आपण करू शकतो असे कोणालाही सांगू नका. अन्यथा ते आपणास वेडे - वाकडे काहीही बोलतील व त्यामुळे भावनिक दृष्ट्या आपण दुखावले जाल. आपण जर कोणाशी भावनिक नात्याने गुंतला असाल किंवा विवाहित असाल तर आपल्या जोडीदारास चुकून सुद्धा वेडे - वाकडे काही बोलू नका. सध्या आपल्या सप्तमातून केतुचे भ्रमण होत असल्याने आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊन आपल्या नात्यात कटुता येऊ शकते. तेव्हा आपणास खूपच सावध राहावे लागेल. ह्या वर्षी आपणास कारकिर्दीत चांगले यश प्राप्त होणार आहे. सरकारी क्षेत्रात सुद्धा एखादे मोठे पद मिळू शकते. आपणास राजकारणात यशस्वी होण्याची संधी मिळू शकते. परदेश गमन होण्याची दाट संभावना आहे. आपण जर अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर ह्या वर्षी आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. आपण परदेशात जाण्यास विलंब करणार नाहीत. त्यामुळे आपले खर्च तर वाढतीलच, परंतु उत्तम स्थैर्य सुद्धा लाभेल. गुरुकृपेने आर्थिक प्राप्तीत वाढ होऊन बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल. आपणास जर आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर वर्षाच्या सुरवातीस ती करणे टाळावे. ह्या वर्षी आपली प्रकृती काहीशी बिघडू शकते व त्यामुळे उपचारांवर खर्च सुद्धा होऊ शकतो. वर्षाच्या सुरवाती पासूनच कुटुंबीय खुश राहतील. वेळोवेळी ते आपणास सहकार्य करतील व आपल्या पाठीशी उभे राहतील. त्याचा आपणास जीवनातील विविध क्षेत्रात खूप मोठा लाभ होईल. वर्षाच्या सुरवातीस आपली भावंडे सुद्धा आपल्या पाठीशी राहतील. त्यांच्यासह आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. रजेवर जाऊन दूरवरचे प्रवास केल्याने आपल्यातील समन्वय व प्रेम सुद्धा वाढेल. आपण त्यांच्यासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्यासाठी आपणास पैश्यांची चणचण भासू शकते. अशा वेळी आपला जोडीदार आपणास मदत करेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.