ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल; चार राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार? जाणून घ्या, A टू Z

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 10:45 PM IST

Updated : Dec 2, 2023, 10:51 PM IST

Assembly Election 2023
Assembly Election 2023

Assembly Election 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणूक २०२४ ची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जातंय. या निवडणुकांचे निकाल रविवारी स्पष्ट होतील. तीन राज्यांमध्ये भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये सरळ लढत असून, तेलंगणामध्ये कॉंग्रेस आणि सत्ताधारी बीआरएस यांच्यात चुरशीची लढत आहे. (Results in 4 states, Rajasthan assembly elections result 2023, Madhya Pradesh assembly elections result 2023, Chhattisgarh assembly elections result 2023, Telangana assembly elections result 2023.)

नवी दिल्ली Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी (३ डिसेंबर) सकाळी ८ वाजता सुरू होईल. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून, मध्य प्रदेशात भाजपा सरकारमध्ये आहे. तर तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती (BRS) सत्तेत आहे. (Results in 4 states, Rajasthan assembly elections result 2023, Madhya Pradesh assembly elections result 2023, Chhattisgarh assembly elections result 2023, Telangana assembly elections result 2023.)

कोणत्या राज्याची काय स्थिती : २०१३ मध्ये स्थापना झाल्यापासून, तेलंगणामध्ये केसीआर सत्तेत आहेत. यावेळी त्यांचं लक्ष्य विजयाची हॅट्ट्रिक साधण्याकडे असेल. मध्य प्रदेशात २००५ पासून भाजपाचे शिवराजसिंह चौहान यांचा वरचष्मा राहिला आहे. या काळात ते फक्त नोव्हेंबर २०१८ ते मार्च २०२० या काळात मुख्यमंत्री पदावर नव्हते. दुसरीकडे, मे महिन्यात भाजपाकडून कर्नाटक हिसकावून घेतल्यानंतर काँग्रेसची नजर आता मध्य प्रदेश आणि तेलंगणाकडे आहे. तर पक्षापुढे राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता टिकवण्याचं आव्हान असेल.

भाजपा विरुद्ध कॉंग्रेस मुख्य लढत : या निवडणुकांमधील प्रभावी कामगिरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या INDIA युतीमध्ये कॉंग्रेसची स्थिती मजबूत करेल. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली पकड कायम ठेवण्यासाठी भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपाचा मोठा मतदारवर्ग राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधून येतो.

मतमोजणीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था : रविवारच्या मतमोजणीसाठी तीन-स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ वैध पास असलेल्या लोकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मध्य प्रदेशातील २३० विधानसभा जागांची मोजणी ५२ जिल्हा मुख्यालयात केली जाईल. राजस्थानमध्ये, राज्यभरात मतपत्रिकांच्या मोजणीसाठी ९७९ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये, डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांसह राज्यातील ३३ जिल्ह्यांतील सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीये. तेलंगणातही ११९ जागांवर मतदान झाल्यानंतर मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

कुठे किती जागांवर निवडणूक झाली? :

  • मध्य प्रदेश - २३० जागा
  • छत्तीसगड - ९० जागा
  • राजस्थान - १९९ जागा
  • तेलंगणा - ११९ जागा

सध्या मुख्यमंत्री कोण? :

  • मध्य प्रदेश - शिवराज सिंह चौहान (भाजपा)
  • छत्तीसगड - भूपेश बघेल (कॉंग्रेस)
  • राजस्थान - अशोक गेहलोत (कॉंग्रेस)
  • तेलंगणा - के.चंद्रशेखर राव (बीआरएस)

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या २३० विधानसभा जागांची ५२ जिल्हा मुख्यालयात मोजणी केली जाईल. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी कमलनाथ यांच्याससह २,५३३ उमेदवार रिंगणात आहेत. चौहान यांनी दावा केला की, त्यांचा पक्ष राज्यात प्रचंड बहुमतानं सत्ता राखेल. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले की त्यांना राज्यातील मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत राज्यात विक्रमी ७७.८२ टक्के मतदान झालं, जे २०१८ च्या निवडणुकीपेक्षा २.१९ टक्के जास्त आहे.

Assembly Election 2023
शिवराज सिंह चौहान

राजस्थान : राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी १,८०० हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. येथे गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस आणि भाजपामध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतोय. सध्या कॉंग्रेसचे अशोक गेहलोत मुख्यमंत्री असून सचिन पायलट हे पक्षाचे दुसरे मोठे नेते आहेत. तर भाजपाकडे वसुंधरा राजे आणि गजेंद्रसिंह शेखावत यांच्या रुपानं अनुभवी नेते आहेत. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात ७५.४५ टक्के मतदारांनी मतदान केलं. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ७४.७१ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदानात ०.७३ टक्के वाढ झाली. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

Assembly Election 2023
अशोक गेहलोत

छत्तीसगड : राज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव यांच्यासह एकूण १,१८१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपाचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचाही समावेश आहे. बघेल प्रतिनिधित्व करत असलेल्या पाटण जागेवर तिरंगी लढत असून, तिथे भाजपानं मुख्यमंत्र्यांचे दूरचे पुतणे आणि लोकसभा खासदार विजय बघेल यांना उमेदवारी दिली. तर जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी हेही पाटणमधून निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झालं. ७६.३१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत नोंदवलेल्या ७६.८८ टक्के मतदानापेक्षा हे थोडं कमी आहे.

Assembly Election 2023
भूपेश बघेल

तेलंगणा : ११९ जागांच्या तेलंगणा विधानसभेसाठी २,२९० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये बीआरएस (भारत राष्ट्र समिती) अध्यक्ष चंद्रशेखर राव, त्यांचे मंत्री-पुत्र केटी रामाराव, TPCC अध्यक्ष ए रेवंत रेड्डी आणि भाजपा लोकसभा सदस्य बंदी संजय कुमार, डी अरविंद आणि सोयम बापू राव यांचा समावेश आहे. मतदानपूर्व युतीनुसार, भाजपा आणि जनसेना यांनी अनुक्रमे १११ आणि ८ जागा लढवल्या. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमनं हैदराबाद शहरातील ९ भागात आपले उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गजवेल आणि कामारेड्डी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण ३.२६ कोटी मतदारांपैकी ७१.३४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Assembly Election 2023
के चंद्रशेखर राव

हेही वाचा :

  1. मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली; 'ही' आहे नवी तारीख
Last Updated :Dec 2, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.