ETV Bharat / bharat

अफगाणिस्तान: तालिबानशी शांतता करार करण्यासाठी ४३ सदस्यीय परिषदेची स्थापना

author img

By

Published : Aug 30, 2020, 8:59 PM IST

राष्ट्रीय सलोखा राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी एका उच्चस्तरीय परिषदेची स्थापना केली आहे. ही समिती तालिबान सोबत शांतता करार करावा की नाही, यावर मत नोंदविणार आहे.

राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी
राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी

काबूल (अफगाणिस्तान)- देशात सलोखा राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी एका परिषदेची स्थापना केली आहे. ही समिती तालिबान सोबत शांती करार करावा की नाही, यावर मत नोंदवणार आहे.

फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार पार पडला होता. त्यावेळी देशाचे भवितव्य ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन व्हावे यासाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा काही कारणास्तव होऊ शकली नाही. त्यामुळे, याबाबत अमेरिका नाराज झाली होती. मात्र, आता परिषदेच्या स्थापनेनंतर अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात शांतता करार होण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवित झाली आहे.

राष्ट्राध्यक्ष घनी यांनी काल (२९ ऑगस्ट) रात्री उशिरा ४३ सदस्यीय परिषदेच्या स्थापनेचे आदेश जारी केले होते. या परिषदेचे नेतृत्व अब्दुल्ला अब्दुल्ला करणार आहेत. ते गेल्या वर्षी देशातील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत घनी यांच्या विरुद्ध उभे होते.

दरम्यान, ही परिषद घनी यांनी मार्चमध्ये स्थापन केलेल्या २१ सदस्यीय वाटाघाटी संघापेक्षा वेगळी आहे. जी कतार येथे तालिबानशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे. कतार येथे तालिबानचे राजकीय कार्यालय आहे. वाटाघाटी करताना कोणत्या मुद्यांवर तालिबानशी चर्चा करावी याचा निर्णय ही परिषद घेणार आहे.

या परिषदेत आजी-माजी अधिकारी असणार आहेत. यात ९ महिला प्रतिनिधींचाही समावेश असणार आहे. परिषदेत माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांना देखील सामील करण्यात आले होते. मात्र, त्यांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. अधिकाऱ्यांबरोबरच, परिषदेत १९८० साली सोव्हिएत संघाशी लढा देणाऱ्या मुजाहिद्दीन आणि जिहादी नेत्यांचा देखील समावेश असणार आहे. यात गुलबुद्दीन हेकमतयार याचा देखील समावेश आहे. हेकमतयार याने २०१६ या वर्षी घनी यांच्याबरोबर शांतता करार केला होता. मात्र, त्यापूर्वी त्याला अमेरिकी सरकारने दहशतवादी घोषित केलेले होते.

हेही वाचा- दाऊद इब्राहिम आमच्या कॅरेबियन बेटाचा नागरिक नाही - डोमिनिका सरकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.