ETV Bharat / bharat

पुराचा कर्नाटकला सुमारे 4 हजार कोटींचा फटका; केंद्राकडे मदतनिधीची करणार मागणी

author img

By

Published : Aug 10, 2020, 6:42 PM IST

महसूल मंत्री अशोक म्हणाले, की नुकसानीची अंदाजित आकडेवारी ही साडेतीन हजार ते चार हजार कोटी रुपये आहे. मात्र, ही आकडेवारी अंतिम नाही. सुमारे 80 हजार हेक्टरवरील पीक उद्धवस्त झाले आहे.

कर्नाटकमधील पुराचे दृश्य
कर्नाटकमधील पुराचे दृश्य

बंगळुरू – कर्नाटक सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे राज्याचे सुमारे साडेतीन हजार ते चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारकडून त्वरित मदतनिधी मिळण्याची मागणी करणार असल्याची माहिती राज्य महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे महसूल मंत्री अशोक हे गृहमंत्री बसवराज बोमणाई यांच्यासमवेत पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विविध भागातील पुरस्थिती जाणून घेणार आहेत.

महसूल मंत्री अशोक म्हणाले, की नुकसानीची अंदाजित आकडेवारी ही साडेतीन हजार ते चार हजार कोटी रुपये आहे. मात्र, ही आकडेवारी अंतिम नाही. सुमारे 80 हजार हेक्टरवरील पीक उद्धवस्त झाले आहे. आम्ही सर्व माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. पंतप्रधानांच्यासमोर ही माहिती ठेवली जाणार आहे.

पंतप्रधानांच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री अशोक म्हणाले, की अंदाजित आकडेवारीहून अधिक नुकसान झालेले असू शकते. आम्ही मदतनिधीची मागणी करणार आहोत. हा मदतनिधी मिळाला तर त्वरित उपाययोजना करणे आणि पुरेसा दिलासा देणे शक्य आहे. केंद्र सरकार किती मदत करणार आहे व किती गरज आहे, यावर नुकसानीसाठी एकूण मदतनिधी मागणार आहोत. येत्या काही दिवसात व्यवस्थित सर्वेक्षण करून त्याचा अहवाल केंद्राकडे पाठविणार आहोत.

दरम्यान, अतिवृष्टी आणि पुराचा फटका हा समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागासह कर्नाटकच्या अंतर्गत भागालाही बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.