ETV Bharat / bharat

बी. एस येडियुरप्पा... लिपीक ते ४ वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री

author img

By

Published : Jul 26, 2019, 6:35 PM IST

लिपीक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे येडियुरप्पा चौथ्या वेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

बी. एस येडियुरप्पा

बंगळुरू - बुकानाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा उर्फ बीएसवाय यांनी कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंगळवारी काँग्रेस-जेडी(एस) सरकार कोसळल्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. लिपीक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे येडियुरप्पा चौथ्या वेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

आज (शुक्रवार) बी. एस येडियुरप्पांनी सायंकाळी ६ वाजता शपथ घेतली. येडियुरप्पांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३ रोजी मंड्या जिल्ह्यातील बुकनाकेरे गावात झाला. येडियुरप्पांच्या वडिलांचे नाव सिद्धलिंगप्पा आणि आईचे नाव पुट्टतायम्मा आहे. येडियुरप्पा लिंगायत समाजाचे आहेत. येडियुरप्पा अवघ्या ४ वर्षांचे असतानाचा त्यांच्या आईचे निधन झाले.

लिपीक म्हणून कारकिर्दीला सुरुवात

येडियुरप्पा यांनी कला शाखेतून पदवी मिळवली आहे. १९६५ साली त्यांना समाज कल्याण विभागात प्रथम श्रेणी लिपीक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु, त्यांनी वीरभद्र शास्त्री यांच्या तांदळाच्या कारखान्यात लिपीकाची नोकरी केली. १९६७ साली त्यांनी वीरभद्र शास्त्री यांची मुलगी मैत्रादेवीशी विवाह केला. त्यांना २ मुली आणि २ मुले झाली. लिपिकाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी हार्डवेअरचे दुकान उघडले. २००४ साली एका दुर्घटनेत येडियुरप्पांच्या पत्नीचे निधन झाले.

१९८८ साली कर्नाटकचे भाजप अध्यक्ष

येडियुरप्पांनी महाविद्यालयानी जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. १९७० साली त्यांनी एका योजनेत अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यांनी अध्यक्षपदाचे काम व्यवस्थितरित्या पार पाडले. यानंतर, त्यांनी शिकारीपूरा शहरातून नगरपालिकेची निवडणूक लढवली. ही निवडणूक त्यांनी जिंकली. येडियुरप्पांनी शिकारीपूराचे जनसंघ अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

आणीबाणीच्या काळात येडियुरप्पांनाही अटक करण्यात आली होती. १९८० साली त्यांना शिकारीपुराचे भाजप अध्यक्ष बनवण्यात आले होते. १९८५ साली शिमोगाचे तर, १९८८ साली येडियुरप्पा कर्नाटकचे भाजप अध्यक्ष बनले. १९९४ आणि २००४ साली राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर येडियुरप्पांना विरोधी पक्षनेता म्हणून निवडण्यात आले होते.

भ्रष्टाचाराचे आरोप

भ्रष्टाचाराच्या आरोपात येडियुप्पांना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले आहे. याशिवाय त्यांच्यावर अवैध खोदकाम आणि घुसखोरीचे आरोप आहेत. २०११ साली जमिनीवर अवैध कब्जा केल्याने येडियुरप्पांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर्षीही येडियुरप्पा तुरुगांत गेले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने येडियुरप्पांना सर्व आरोपातून निर्दोष ठरवले होते.

५५ तासांचे मुख्यमंत्री

कर्नाटकातील २०१८ साली झालेली निवडणूक येडियुरप्पांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. भाजपला बहुमत तर मिळाले नाही. परंतु, सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला. राज्यपालांनी येडियुरप्पांना सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. परंतु, काँग्रेस-जेडी(एस)ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर, न्यायालयाने २ दिवसात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. परंतु, बहुमत नसल्याने येडियुरप्पांनी भावुक भाषण देताना राजीनामा दिला होता. यादरम्यान, येडियुरप्पा ५५ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते. येडियुरप्पांचे भाजप सरकार पडल्यानंतर काँग्रेस-जेडी(एस)ने आघाडी करत सरकार बनवले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.