ETV Bharat / bharat

कोरोनाच्या रुग्णांसाठी सशस्त्र सेना दल उभारत आहे ५१ नवी रुग्णालये..

author img

By

Published : Apr 4, 2020, 12:20 PM IST

Armed forces readying 51 hospitals for treating coronavirus affected people
कोरोनाच्या रुग्णांसाठी सशस्त्र सेना दल उभारत आहे ५१ नवी रुग्णालये..

संरक्षण मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दलांमार्फत मुंबईमध्ये सहा विलगीकरण कक्ष चालवले जात आहेत. तसेच देशभरात सशस्त्र सेना दलामार्फत कोरोनाला समर्पित अशी ५१ रुग्णालये उभारण्यात येत आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५१ नवी रुग्णालये उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सशस्त्र सेना दलामार्फत ही रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.

याआधीच लष्कराने कोरोनाची चाचणी करण्यासाठी पाच प्रयोगशाळा उभारल्या आहेत. यामध्ये दिल्लीमधील लष्करी रुग्णालय, बंगळुरूमधील हवाई दलाचे रुग्णालय, पुण्यातील सशस्त्र सेना दलाचे रुग्णालय, लखनऊमधील कमांड रुग्णालय आणि उधमपूरमधील कमांड रुग्णालयाचा समावेश आहे. यासोबतच आणखी सहा रुग्णालयांमध्ये अशा प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संरक्षण मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दलांमार्फत मुंबईमध्ये सहा विलगीकरण कक्ष चालवले जात आहेत. तसेच देशभरात सशस्त्र सेना दलामार्फत कोरोनाला समर्पित अशी ५१ रुग्णालये उभारण्यात येत आहेत. कोलकाता, विशाखापट्टणम, कोची, दुंडीगल, बंगळुरू, कानपूर, जैसलमेर, जोरहाट आणि गोरखपूर याठिकाणी यामधील काही रुग्णालये सुरू झाली आहेत. आतापर्यंत १,७३७ लोकांवर याठिकाणी उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत ४०३ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे सुमारे अडीच हजार रुग्ण आढळले असून, साठहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच जगभरात याचे दहा लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर साठ हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : जागतिक आरोग्य संस्थेच्या 'एकता चाचणी'मध्ये देशही होणार सहभागी..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.