ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिलेले सेवाग्राम आश्रम

author img

By

Published : Oct 3, 2021, 6:06 AM IST

Updated : Aug 10, 2022, 1:23 PM IST

महात्मा गांधींच्या वास्तव्याने पवित्र झालेले वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे. सेवाग्राममधील महात्मा गांधींच्या वास्तव्यादरम्यान स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिलेले "सेवाग्राम आश्रम"
स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिलेले "सेवाग्राम आश्रम"

वर्धा : महात्मा गांधींच्या वास्तव्याने पवित्र झालेले वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे. सेवाग्राममधील महात्मा गांधींच्या वास्तव्यादरम्यान स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे हे आश्रम एका अर्थाने स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानीच तेव्हा राहिले होते.

म्हणून गांधीजी आले सेवाग्रामला

साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला निघाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साबरमतीला परतणार नाही असा निर्णय महात्मा गांधींनी घेतला होता. दांडी यात्रेनंतर इंग्रजांनी गांधीजींना तुरूंगवासात टाकले. दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर गांधीजी जेव्हा बाहेर आले तेव्हा देशाच्या मध्यभागी असलेल्या एखाद्या गावाला स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे केंद्र बनवावे असे त्यांनी ठरविले. यानंतर गांधीजींना राहण्यासाठी कुठे व्यवस्था केली जावी यावर विचारमंथन सुरू झाले. यावेळी जमनालाल बजाज यांनी वर्ध्यातील जागा सुचवली. ही जागा देशाच्या मध्यभागी असल्याने इथून देशात कुठेही जाणे सोपे होईल असे सांगून त्यांनी या जागेचे महत्व गांधीजींना पटवून दिले.

बजाज यांच्या आग्रहावरून बापू आले वर्ध्यात

जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून महात्मा गांधी पालकवाडीत(आजचे वर्धा) आले तेव्हा सेवाग्राम मार्गावर असलेले पहिले सत्याग्रही आश्रम म्हणजेच आजच्या महिला आश्रमात ते राहिले. जानेवारी 1935 मध्ये मगनवाडीत त्यांचा मुक्काम राहिला. याच काळात मिस स्लेड उर्फ मीरा बेन यांना बापूंनी आश्रमासाठी शांत जागेची निवड करण्याची जबाबदारी दिली होती. मीराबेन यांनीच सेवाग्रामची निवड केल्याचे सांगितले जाते. 30 एप्रिल 1936 मध्ये महात्मा गांधी पहिल्यांदा सेवाग्राम आश्रमात आले. यापूर्वी 17 एप्रिलला ते सेवाग्राम म्हणजे तत्कालीन शेगाव या गावातील लोकांना भेटले होते. 30 एप्रिलला आल्यावर इथे कुठलीही कुटी नसल्याने आद्य आदी निवास म्हणजेच तत्कालीन पेरुची बाग आणि एका विहीरीजवळ असलेल्या झोपडीत ते राहिले. साधारण पाच दिवस ते इथे राहिले होते. त्यांनतर जमनालाल बजाज यांना त्यांनी कुटी बांधण्यास संगितले. ही कुटी सामान्यांच्या घराप्रमाणे असावी अशी बापुंची इच्छा होती. कुटी उभारण्यासाठी 100 रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊ नये तसेच ही कुटी स्थानिक संसाधनांचा वापर करून व स्थानिक मजुरांकडून बांधून घ्यावी अशीही सूचना त्यांनी केली होती. यानंतर 5 मे 1936 ला गांधीजी खादी यात्रेसाठी निघून गेले.

म्हणून बापू झाले नाराज

16 जूनला 1936 मध्ये ते परत आले. तेव्हा आदी निवास तयार झाले होते. मीरा बेन आणि बलवंत सिंग यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दीड महिन्यांत हे निवास तयार केले होते. याच्या उभारणीसाठी 499 रुपये खर्च आला होता. हे कळल्यानंतर बापू नाराज झाले होते. मात्र जमनालाल बजाज यांनी बापूंची समजूत काढली. यानंतर 1937 च्या अखेरीस बापू मीरा बेन राहत असलेल्या कुटीत राहायला गेले. त्याच कुटीला आज बापू कुटी म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला ही कुटी लहान होती. बापू राहायला आल्यानंतर तिचा विस्तार करण्यात आला. या कुटीत स्नानगृह, औषधोपचार केंद्र बांधण्यात आले. याच ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत अनेक महत्वाच्या बैठका होत होत्या.

बा यांच्यासाठी बनविली वेगळी कुटी

सेवाग्राममध्ये स्वतंत्र कुटी नसल्याने बा यांना थोड्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हे लक्षात घेऊन बजाज यांनी बा यांच्यासाठी वेगळी कुटी तयार करून दिली. सेवाग्राममध्ये आजही बापूंच्या वापरातील विविध वस्तु ठेवण्यात आलेल्या आहेत. बापूंच्या वापरातील कंदील, रामायण, बायबल आणि कुराण हे तिन्ही ग्रंथ ठेवलेले छोटे कपाट या कुटीत आहे. याशिवाय गारगोटीचे पेपर वेट, नकली दात ठेवण्याचे भांडे, थुकदान, पेन पेन्सिल स्टॅन्ड, तीन माकडांची मूर्ती, सुई-दोरा, पेटी-चरखा, जपमाला, लाकडी करंडक, संगमरवरी पेपवरवेट, अंग घासणी या वस्तू येथे आहेत. सेवाग्राममध्ये बापूंसोबत कधीही संपर्क करता यावा यासाठी लॉर्ड लिन लिथ गो यांनी येथे हॉटलाईन फोन लावला होता. महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या हॉटलाईनचा उपयोग केला जात असे. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा साक्षीदार राहिलेल्या सेवाग्राम आश्रमातच भारत छोडो हा नारा संपूर्ण देशभरात पोहोचला. यासंबंधीची महत्वाची बैठक 9 जुलै 1942 रोजी सेवाग्राममध्ये पार पडली होती. ब्रिटिशांना भारत सोडण्यासाठी निर्वाणीचा इशारा देणाऱ्या आंदोलनाला काय नाव द्यावे यावर चर्चा झाली होती. सर्वांना समजेल असे सोपे नाव आंदोलनााला दिले जावे असे बापूंना अपेक्षित होते. युसूफ अली यांनी वापरलेला 'गो बॅक, क्विट इंडिया' या घोषणा सुचविण्यात आल्यानंतर बापूंनी त्याला मान्यता दिली आणि "भारत छोडो" हे घोषवाक्य पुढे आले.

स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी सेवाग्राम

यानंतरही बापू सेवाग्राम आश्रमात अधून-मधून आल्याची नोंद आहे. पण स्वातंत्र लढ्यादरम्यानच्या येथील घडामोडी अत्यंत महत्वाच्या ठरल्या आहेत. एकूणच देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या वाटचालीत सेवाग्राम आश्रम केंद्रस्थानी राहिले आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्त होण्याच्या महत्वाच्या कालखंडाचा साक्षीदार राहिलेले हे आश्रम आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणास्रोतच म्हणावे लागेल. इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील देशप्रेमाची भावना आपसुकच अधिक तीव्र होते.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य मिळवून देणारे 'साबरमतीचे संत' महात्मा गांधी!

Last Updated : Aug 10, 2022, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.