बहीण-भावाच्या नात्याला गावरान बियाण्यांची जोड; भाऊ चंद्रकांत पाटील अन् जवानांसाठी राहीबाईंची प्रेमाची ‘बीज राखी’
पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी रक्षाबंधनानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील तसेच देशाच्या जवानांसाठी गावरान बियाण्यांपासून तयार केलेली एक अत्यंत अनोखी 'बीज राखी' (Seed Rakhi) पाठवली.
Published : August 26, 2026 at 1:24 PM IST
अहिल्यानगर : 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे..वेड्या बहिणीची रे वेडी माया..'या गीतातील सुंदर शब्दांमधून बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आपल्या मनाला स्पर्शून जातो. याच नात्याला गावरान बियाण्यांच्या संवर्धनाची अनोखी जोड देत अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (Rahibai Soma Popere) यांनी यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त (Rakhi Purnima) एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. आपल्या भाऊ मानलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आणि सीमेवरील जवानांनासाठी त्यांनी विविध गावरान बियाण्यांपासून स्वतःच्या हातानं आकर्षक 'बीज राखी' तयार केलीय.
गावरान बियाण्यांची राखी : भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, तूर, मूग, उडीद, वाल, घोसाळी, डांगर भोपळा यांसह विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून राहीबाईंनी या बीज राख्या साकारल्या आहेत. त्यामुळं या राख्या केवळ बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक न राहता गावरान बियाण्यांचं संवर्धन, पारंपरिक शेती आणि निसर्गाशी असलेलं नातं जपण्याचा संदेश देणाऱ्या ठरल्या आहेत.
गावरान बियाण्यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य: पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गावरान बियाण्यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केलं आहे. बीज बँकेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत पारंपरिक आणि गावरान बियाणे पोहोचवले आहे. बियाण्यांचं वाटप करताना निर्माण झालेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळं अनेक शेतकरी राहीबाईंना आपली बहीण मानतात तर राहीबाईही या शेतकऱ्यांना आपल्या भावांप्रमाणे मानतात. याच प्रेमातून आणि शेतकरी बांधवांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी त्यांनी यंदा गावरान बियाण्यांपासून बीज राख्या तयार करण्याचा निर्णय घेतला. बियाण्यांपासून तयार झालेली ही राखी म्हणजे भविष्यातील शेती आणि अन्नसुरक्षेचा संदेश देणारी अनोखी संकल्पना आहे.
चंद्रकांत पाटील अन् जवानांसाठी प्रेमाची राखी : माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना राहीबाई आपल्या भावाचं स्थान देतात. त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील हेही राहीबाईंना आपल्या भगिनीप्रमाणे मानतात. या प्रेमळ नात्याची जपणूक करण्यासाठी राहीबाईंनी त्यांच्यासाठी विशेष बीज राखी तयार केली. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा धागा गावरान बियाण्यांच्या रूपाने अधिकच अर्थपूर्ण झाला आहे. राहीबाईंच्या या उपक्रमाला राष्ट्रप्रेमाचीही जोड मिळाली आहे. देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत लढत देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी बीज राख्या तयार केल्या आहेत.
गावरान बियाण्यांचं संवर्धन: एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचाराला पुढे नेत देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठीही या बीज राख्या भेट म्हणून पाठवण्यात आल्या आहेत. आपल्या शेतातील पारंपरिक बियाण्यांपासून तयार केलेली राखी जवानांच्या हातावर बांधली जावी आणि त्यातून देशाच्या मातीशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे अशी भावना राहीबाईंची आहे. गावरान बियाण्यांचं संवर्धन हेच आपल्या शेतीचं आणि भविष्यातील अन्नसुरक्षेचं महत्त्वाचं साधन असल्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला आहे. एका छोट्याशा राखीच्या माध्यमातून बहीण-भावाचं प्रेम शेतकऱ्यांशी असलेले नाते गावरान बियाण्यांचं महत्त्व आणि जवानांप्रती कृतज्ञता अशा विविध भावना जोडण्याचा प्रयत्न राहीबाईंनी केलाय.
शेतकरी, माती, बीज आणि निसर्गाशी अतूट नातं :यंदाच्या या अनोख्या उपक्रमात राहीबाईंची नातवंडे सायली आणि धनश्री यांनीही मोलाची मदत केली. आपल्या आजीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बीज राख्या तयार करण्याच्या कामात सहभाग घेतला. त्यामुळं गावरान बियाण्यांचं संवर्धन आणि त्यामागील विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कामही या उपक्रमातून होत आहे. राहीबाईंच्या कार्याची विशेषता म्हणजे त्या कोणतेही काम केवळ करण्यापुरतं न करता त्यामध्ये पूर्ण निष्ठेने आणि मनापासून एकरूप होतात. गावरान बियाण्यांचं संवर्धन हे त्यांनी आपलं जीवनकार्य मानलं आहे. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून शेतकरी, माती, बीज आणि निसर्गाशी असलेले त्यांचे अतूट नाते अधोरेखित होते.
राखी पौर्णिमेच्या अनोख्या शुभेच्छा: राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राहीबाई पोपेरे यांनी बीज राखीच्या माध्यमातून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. राखीचा धागा केवळ नात्यांचे बंध मजबूत करणारा नसून तो मातीशी, शेतीशी, बियाण्यांशी आणि राष्ट्राशी असलेले आपले नातेही दृढ करू शकतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमातून 'गावरान बीज वाचवा, शेती वाचवा' आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अन्नसुरक्षा जपा असा संदेश देण्यात आला आहे. बीज राखीच्या माध्यमातून राहीबाईंनी सर्व देशबांधवांना राखी पौर्णिमेच्या अनोख्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
हेही वाचा -