अनोखं रक्षाबंधन! वर्षभरापूर्वी बहिणीचं निधन, पण तिच्याच हातांनी राखी बांधली
मुंबईत आज एक अनोखं रक्षाबंधन घडलं. या अनोख्या रक्षाबंधनाची अनोखी कहाणी आपण इथं जाणून घेणार आहोत. या खऱ्या कहाणीत बहीण मुंबईची तर भाऊ गुजरातचा आहे.

Published : August 9, 2025 at 8:49 PM IST
|Updated : August 10, 2025 at 12:22 PM IST
मुंबई : रक्षाबंधनाचा सण भावंडांसाठी खूप खास मानला जातो. प्रत्येक भावंडाच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी या सणाच्या माध्यमातून आणखी दृढ होते. यंदाच्या रक्षाबंधनाला 16 वर्षांची अनमता अहमद जेव्हा शिवम मिस्त्री याच्या मनगटावर राखी बांधत होती, तेव्हा उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दोघंही एकमेकांकडे प्रेमानं आणि आपुलकीनं पाहात होते, जणू त्यांचं अनेक वर्षांचं नातं आहे. त्या क्षणी, तिथं असलेल्या प्रत्येकाचं काळीज पिळवटलं. पण या अश्रूंमागची खरी कहाणी आम्ही तुम्हाला इथं सांगणार आहोत.
मुंबईची बहीण तर गुजरातचा भाऊ : अनमता ज्या हातांनी शिवमच्या मनगटावर राखी बांधत होती, तो हात शिवमची बहीण रियाचा होता. रिया, जी केवळ 9 वर्षांची होती, 2024 मध्ये एका गंभीर आजारामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनं तिच्या कुटुंबाला अपार दुःख दिलं. मात्र, रियाच्या आठवणींना कायम जपण्यासाठी एक अनोखी गोष्ट घडली. सुरतमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं, रियाचा एक हात अनमतामध्ये प्रत्यारोपित करण्यात आला. या प्रत्यारोपणामुळे अनमताला एक नविन संजीवनी मिळाली. सोबतच त्या हातानं एका विशिष्ट नात्याला जीवनदेखील दिलं. अनमता अहमद मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी आहे. तर शिवम मिस्त्री गुजरातच्या वलसाडचा राहणार आहे. दोघांमध्ये 180 किलोमीटरचं अंतर आहे. पण दोघंही एकमेकांशी जणू मनानं जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे आजच्या या भावनिक क्षणानं त्यांचं नातं आणखी मजबूत केलं.

अनमता अहमदला अपघातात हात गमावाला लागला : अनमता अहमद दहावीत असताना ती एका हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आली, ज्यामुळे तिचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला. 2022 मध्ये डॉक्टरांना तिचा संपूर्ण उजवा हात काढावा लागला. त्याचवेळी तिचा डावा हात केवळ 20% क्षमतेनं कार्यरत होता.

डॉक्टरांनी हात प्रत्यारोपण करण्यास सांगितलं : यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी तिच्या हाताच्या प्रत्यारोपणाची शिफारस केली. त्यासाठी अनमतासाठी अवयव दानाची शोध मोहीम सुरू झाली. ही शोध मोहीम २०२२ ते २०२४ पर्यंत चालली. सप्टेंबर २०२४ मध्ये, वलसाडमधील चौथी इयत्तेत शिकणारी रिया मिस्त्री आजारी पडली. तिला उलट्या होऊ लागल्या आणि ती असह्य डोकेदुखीनं त्रस्त झाली. अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यानंतर, तिच्या पालकांनी तिला 15 सप्टेंबर रोजी सुरतमधील किरण रुग्णालयात दाखल केलं.

रिया मिस्त्रीचा गंभीर आजारानं मृत्यू झाला : येथे सीटी स्कॅनमध्ये रक्तस्त्रावामुळे रियाच्या मेंदूला गंभीर हानी पोहोचल्याचं समोर आलं. त्याचे परिणाम रियाच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का देणारे होते. त्याचवेळी, डोनेट लाईफ या स्वयंसेवी संस्थेनं रियाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांना रियाचे अवयव दान करण्याचा सल्ला दिला.
रियाच्या नातेवाईकांनी दाखवलं मोठं मन : रियाच्या नातेवाईकांनी अवयव दानास होकार दिला, आणि त्यानंतर राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेकडे नोंदणी केली. रियाचा उजवा हात प्रत्यारोपणासाठी गुजरातहून मुंबईला पाठवण्यात आला. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनमता अहमद यांच्यावर रियाचा हात प्रत्यारोपित करण्यात आला. यामुळे अनमता ही खांद्यावर शस्त्रक्रिया करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली.
दोन्ही कुटुंबांनी व्यक्त केल्या भावना : शिवम मिस्त्रीचे वडील बॉबी मिस्त्री या सर्व घटकांना पाहात होते आणि त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू होते. माध्यमांशी बोलताना बॉबी मिस्त्री यांनी सांगितलं, "आम्ही अनमताच्या हाताला स्पर्श केला आणि आम्हाला ती रिया असल्यासारखंच वाटलं. रिया आमच्या संपूर्ण कुटुंबातील एकटीच मुलगी होती." तर, अनमता अहमद हिचे वडील अकील यांनी या भावनिक क्षणाबाबत सांगितलं, "१६ सप्टेंबर २०२४ रोजी मला रियाबद्दल सांगण्यात आलं. हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुंबईत झाली. आता अनमता अधिक आत्मविश्वासानं तिचे दोन्ही हात योग्यरित्या वापरू शकते. आम्ही बॉबी मिस्त्री आणि त्यांची पत्नी तृष्णा यांचे खूप आभारी आहोत."
हेही वाचा

