महाराष्ट्र

maharashtra

Husband Murder Case : पत्नीनं सैन्यदलातील प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट; पत्नी, प्रियकरासह साथीदाराला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 9:04 PM IST

Husband Murder Case : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी पोलीस ठाणे हद्दीमध्ये चिंबळी या भागात एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीनं आपल्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पतीचा खून घडवून आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

Husband Murder Case
पतीचा खून

पत्नीने केलेल्या पतीच्या हत्येविषयी माहिती देताना डीसीपी संदीप डोईफोडे

पिंपरी चिंचवड (पुणे) Husband Murder Case :पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं खून केलेल्या पतीचं नाव राहुल सुदाम गाडेकर (वय 36 वर्षे) असं आहे. या खून प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पोलीस पथकानं त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर (वय ३० वर्षे, ता. अकोले, जि. अहमदनगर) तसेच तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे (रा. देहुगाव, पुणे) आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे (वय ३२ वर्षे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशा तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

'या' कारणानं रचला खूनाचा कट :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया गाडेकर हिने कोरोना साथी दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश मोटाभाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले होते. याची जाणीव राहुल गाडेकर याला झाल्याने सुप्रिया आणि राहुलमध्ये सतत भांडणं होत होती. त्यामुळे सुप्रिया हिने तिचा प्रियकर सुरेश पाटोळे आणि त्यांचा मित्र रोहिदास सोनवणे यांच्या मदतीनं स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचला होता.

इन्शुरन्सचे अर्धे पैसे प्रियकराला देण्याचे ठरले :राहुल गाडेकर याचा खून करण्यासाठी सुरेश पाटोळे सुट्टीवर असताना संगमनेर तालुक्यातील चिचपूर या गावी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते. राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला होता. याची जाणीव राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती. त्यामुळे राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया त्याच्या इन्शुरन्सचे अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास सोनवणे यांना देणार होती. त्यामुळे सुरेश पाटोळे आणि रोहिदास सोनवणे यांनी राहुल गाडेकर हा आपल्या चाकण येथील कंपनीवर कामाला जात असताना पाठीमागून त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला.

खून करून दोघांनीही काढला पळ :सुरेश पाटोळे आणि रोहिदास सोनवणे यांनी राहुल गाडेकर याला गंभीर जखमी करून त्याचा खून केला. यानंतर रोहिदास यास गावी चिंचपूर येथे सोडून सुरेश हा प्रथम दिल्ली येथे कामावर गेला आणि तिथून हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी हजर राहिला. आरोपी सुरेश पाटोळे यास हैदराबाद येथून तर आरोपी रोहिदास सोनावणे याला त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेऊन आळंदी पोलीस ठाण्यात हजर केले गेले.



आरोपींचा 'या' तारखेपर्यंत रिमांड :प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात महिला आरोपी सुप्रिया राहुल गाडेकर (वय ३० वर्षे, रा. ता. अकोले, जि. अहमदनगर) हिला हजर करून तिची १८/०३/२०२४ रोजी पर्यंत आरोपी सुरेश मोटाभाऊ पाटोळे यास आणि आरोपी रोहिदास नामदेव सोनावणे यांची १९/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉडने यावर समांतर तपास केला. यात मृत व्यक्तीच्या पत्नीकडे अधिक तपास केला असता तिनं दोन व्यक्तींच्या मदतीनं पतीचा खून केल्याचं निष्पन्न झालं. यामध्ये तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. -- संदीप डोईफोडे, डीसीपी

'या' पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावले कर्तव्य :ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त सो. व अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, श्रे. पो. उप. निरीक्षक हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहिते, तौसिफ शेख, नागेश माळी आणि पोपट हुलगे यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Sanjay Shirsat : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले, “येत्या दोन दिवसांत…”
  2. MNS BJP Alliance : 'इंजिन' नव्हे 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवा, भाजपाची मनसेला अट
  3. Loksabha Election : लोकसभा निवडणूक वेळापत्रक उद्या जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद

ABOUT THE AUTHOR

...view details