महाराष्ट्र

maharashtra

गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विमानतळावर जंगी स्वागत, सभेला तगडा पोलीस बंदोबस्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 6:48 AM IST

Updated : Mar 5, 2024, 9:51 AM IST

Amit Shah Rally Today : आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव इथं सभा घेणार आहेत. रात्री उशीरा त्यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

Amit Shah Rally Today
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर Amit Shah Rally Today: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचं छत्रपती संभाजीनगर इथं सोमवार 4 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास विमानतळावर आगमन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. मंगळवारी अकोला, जळगाव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभेला ते उपस्थितीत राहणार आहेत.

सभेला तगडा पोलीस बंदोबस्त

यांची होती विमानतळावर उपस्थिती :यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. सुभाष भामरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, विजया रहाटकर, आ. प्रशांत बंब तसेच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तीन जिल्ह्यात अमित शाह यांचे कार्यक्रम :"केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ इथून हेलिकॉप्टरनं अकोल्याकडं रवाना होणार आहेत. अकोला आणि जळगाव इथला नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५.४० वाजता त्यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळ इथं हेलिकॉप्टरनं आगमन आणि हॉटेल रामा इंटरनॅशनल इथं ते जाणार आहेत. सायंकाळी ६.१० वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल इथून कारनं क्रांती चौकाकडं प्रयाण करणार आहेत. क्रांती चौक इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन तिथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान या सभास्थळी अमित शाह पोहोचतील. सभा झाल्यावर रात्री आठच्या सुमारास मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन पावणे आठ वाजता विमानानं मुंबईकडं रवाना होणार आहेत," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वॉच टावरसह सीसीटीव्हीची निगराणी :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे. सांस्कृतिक क्रीडा मंडळ इथं 5 मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही सभा होणार आहे. "या सभेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून ड्रोनद्वारे सभास्थळी लक्ष ठेवणार आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सभास्थळी वॉच टॉवरसह सीसीटीव्हीची निगराणी देखील आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.

सभेची जय्यत तयारी :आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आचारसंहिता दहा मार्चनंतर लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगानं आता सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या तयारीचा वेग वाढवला आहे. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. सांस्कृतिक क्रीडा मंडळावर 5 मार्च रोजी होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी पक्षातर्फे सुरू करण्यात आली आहे. जागोजागी पोस्टर, होल्डिंग, कट आउट, झेंडे या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपानं केला आहे. जालना, संभाजीनगर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्याचा क्लस्टर तयार करून, त्या अनुषंगानं ही पहिली महत्त्वाची सभा पार पडणार आहे. त्यासाठी भाजपातर्फे जोर लावण्यात येतोय. या निमित्तानं मोठी वातावरण निर्मिती केली जाईल, असं भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या परिसराला छावणीचं स्वरूप या निमित्तानं पाहायला मिळतेय. "सभेच्या दिवशी परिसरात जवळपास 1800 पोलीस तैनात असणार आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त, 6 उपायुक्त, 11 सहायक पोलीस आयुक्त, 41 पोलीस निरीक्षक, 128 सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 1300 पुरुष पोलीस कर्मचारी, 130 महिला पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफची एक तुकडी तैनात असणार आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. मराठा आंदोलक आक्रमक; संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या सभेचं बॅनर फाडलं; आंदोलकांची घोषणाबाजी
  2. भाजपानं महाराष्ट्रावर लक्ष वाढवलं; जे.पी नड्डांपाठोपाठ अमित शाह विदर्भ दौऱ्यावर
Last Updated : Mar 5, 2024, 9:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details