महाराष्ट्र

maharashtra

गुंडांसोबत फोटो व्हायरल झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर; घेतला 'हा' मोठा निर्णय

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 12:51 PM IST

CM Eknath Shinde : शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांचा नुकताच गोळीबारात मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळीबार करणारा मॉरीस भाईचा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं समोर आलं. तो फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, अशा घटना घडल्यानंतर बदनामीला सामोरं जावं लागतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता फोटोबाबद अलर्ट झाले आहेत.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांची प्रतिक्रिया

मुंबई CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच अन्य मंत्र्यांसोबत कित्येकदा लोक फोटो काढतात. त्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचेही फोटो असतात. यावर ''आम्हाला भेटायला येणाऱ्या व्यक्तीला आम्ही प्रत्यक्षात ओळखत नसतो आणि आम्ही भेटायला येणाऱ्याला टाळूही शकत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीशी आमचा संबंध असतो असा होत नाही'' असं स्पष्टीकरण या संदर्भात राजकीय व्यक्तींकडून दिलं जातं. मात्र, अशा फोटोमधील व्यक्तींचे संबंध जोडून राजकीय नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. गुंड शरद मोहोळ याच्यासोबतचा फोटो असेल अथवा अन्य गुंडांसोबतचे फोटो असतील, यावरून अनेकदा समाज माध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये चर्चा होते.

पदाधिकाऱ्याला हाकलून दिलं :गेल्याच आठवड्यात एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी घेऊन आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यालाच पदावरुन हाकलून देण्यात आलं होतं. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील गुंड हेमंत दाभेकर याने वर्षावर त्यांची भेट घेतली होती. पुण्यातील गुंड निलेश घायवळ यानंही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरला झाला. पुण्यातील गुंड जितेंद्र जंगम याने शिंदे गटात प्रवेश केल्याचा फोटो आणि नाशिकचा गुंड वेंकट मोरे याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

आता ताकही फुंकून पिणार : दुधाने तोंड भाजल्यानंतर ताकही फुंकून प्यायले जाते. तसाच प्रकार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिसतोय. मुख्यमंत्र्यांचे गुंडांची सातत्याने संबंध जोडले जात आहेत. कायद्याचे राज्य शिल्लक नाही, असा आरोप होतो. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी तर थेट गुंडाराज तयार होत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. आपला गुंडांची अथवा गुंड प्रवृत्तीच्या कुणाशीही संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी यापुढे अशा प्रवृत्तीच्या लोकांसोबत फोटो काढणं टाळण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्यक्षात असे लोक ओळखणे आणि टाळणे शक्य नसल्याने त्यांच्यासोबत काढण्यात आलेल्या फोटोतील व्यक्तीच्या चारित्र्याची पडताळणी झाल्याशिवाय त्या व्यक्तीला फोटो दिला जाणार नाही, असा फतवाच मुख्यमंत्र्यांनी काढलाय.

मुख्यमंत्र्यांची भूमिका स्वागतार्ह : अलीकडच्या काळात एक अत्यंत चुकीचा पायंडा आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे कोणीही राजकीय नेते आले की मग त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं आणि हातामध्ये मोबाईल घेऊन सेल्फी किंवा फोटो काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल करणं. बऱ्याचदा त्याच्यामधून आम्ही अमुक नेत्यासोबत आहोत किंवा तमुक नेत्यासोबत आहेत, असं दाखवलं जातं, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केलीय. वाघमारे पुढे म्हणाल्या की, "महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जशी आतापर्यंत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, तसा त्यांनी एक अत्यंत चांगला पायंडा सुरू केलाय. इथून पुढं मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या सगळ्यांचे फोटो तर काढले जातील. अधिकृत फोटोग्राफर ते काढेल. पण त्यांना फोटो देण्याच्या आधी त्या व्यक्तीच्या चारित्र्याची पडताळणी होणार आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details