महाराष्ट्र

maharashtra

यंदा महाराष्ट्रातच राहणार रणजी चषक! अंतिम फेरीत विदर्भाचा मुंबईबरोबर होणार सामना

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 12:25 PM IST

Ranji Trophy 2023-24 : रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्य फेरीत विदर्भानं मध्य प्रदेशचा पराभव केला. या विजयासह विदर्भानं अंतिम फेरीत धडक मारलीय. अंतिम फेरीत विदर्भ संघाचा मुंबई संघाबरोबर सामना होणार आहे.

महाराष्ट्रातच राहणार रणजी चषक! राज्यातील दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार
महाराष्ट्रातच राहणार रणजी चषक! राज्यातील दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार

मुंबई Ranji Trophy 2023-24 : रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम फेरीत विदर्भ संघानं धडक मारलीय. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात यश राठोडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यानं विदर्भासाठी शानदार फलंदाजी करताना शतक झळकावलं. आता अंतिम फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होणार आहे. 10 मार्चपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जाणार आहे. यानिमित्तानं रणजीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रातीलच दोन संघ आमने-सामने येणार आहेत.

पहिल्या डावात विदर्भाची खराब सुरुवात :अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यानंतर संघानं चांगली कामगिरी करुन सामन्यात दमदार पुनरागमन केलं. विदर्भानं पहिल्या डावात सर्वबाद 170 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून सलामीवीर अथर्वनं 39 धावांचं योगदान दिलं होतं. तर करुण नायरनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 105 चेंडूत 63 धावा केल्या. तर कर्णधार अक्षय अवघ्या 1 धावा करुन बाद झाला. त्यांच्या संघाचे तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. मध्य प्रदेशसाठी आवेश खाननं भेद गोलंदाजी केली. त्यानं 15 षटकांत 49 धावा देत 4 बळी घेतले. तर कुलवंत आणि व्यंकटेश अय्यरनं 2-2 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. विदर्भाच्या 170 धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशनं पहिल्या डावात 252 धावा केल्या. त्यांच्याकडून हिमांशू मंत्रीनं शतक झळकावलं. त्यानं 265 चेंडूत 126 धावा केल्या. मात्र त्याचं शतक संघाला विजय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडलं नाही. विदर्भाकडून उमेश यादवनं 3 तर यश ठाकूरनंही 3 बळी घेतले.

दुसऱ्या डावात विदर्भाचं दमदार पुनरागमन :पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर विदर्भानं दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केलं. संघानं सर्वबाद होईपर्यंत 402 धावा केल्या. दुसऱ्या डावात यश राठोडनं शतकी खेळी खेळली. त्यानं 200 चेंडूंचा सामना करत 141 धावा केल्या आहेत. यशच्या या खेळीत 18 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अक्षयनं कर्णधारपदाची खेळी खेळली. त्यानं 139 चेंडूंचा सामना करत 77 धावा केल्या. या खेळीत त्यानं 8 चौकार मारले. तर अमननं 59 धावांचं योगदान दिलंय. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा संघ दुसऱ्या डावात केवळ 258 धावा करु शकला. त्यांचा 62 धावांनी पराभव झाला.

अंतिम सामन्यात महाराष्ट्रातील दोन संघ आमनेसामने : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामना विदर्भ आणि मुंबई संघात होणार आहे. हा सामना 10 मार्चपासून आयोजित केला जाणार आहे. विदर्भापूर्वी मुंबईनं अंतिम फेरी गाठली होती. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईनं तामिळनाडूला पराभूत करत विक्रमी 48व्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलाय. विशेष म्हणजे त्यांनी यापैकी 41 वेळा ही स्पर्धा जिंकलीय.

हेही वाचा :

  1. धर्मशाळेत 7 मार्चपासून शेवटचा कसोटी सामना, भारतीय संघ जिंकून मोडणार 112 वर्षे जुना विक्रम?

ABOUT THE AUTHOR

...view details