महाराष्ट्र

maharashtra

सांगली लोकसभेत कोणत्या कारणानं विशाल पाटील यांनी केलं बंड? काँग्रेसबाबत स्पष्टच सांगितलं! - Vishal Patil

By ANI

Published : May 2, 2024, 9:31 AM IST

Updated : May 2, 2024, 5:18 PM IST

Sangli Lok Sabha Constituency : काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून सांगली लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Vishal Patil says contesting polls from sangli as independent to retain congress ideology and its existence
विशाल पाटील

सांगली Sangli Lok Sabha Constituency : मागील काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आल्याचं बघायला मिळतंय. सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यामुळं काँग्रेसमधून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असणाऱ्या विशाल पाटील यांनी वेगळा निर्णय घेतलाय. काँग्रेसला ही जागा न मिळाल्यानं विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय. त्यामुळं काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसची विचारधारा आणि अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं विशाल पाटील म्हणालेत.

काय म्हणाले विशाल पाटील? : यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना काँग्रेस नेते विशाल पाटील म्हणाले की, "सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, महाविकास आघाडीत राहण्यासाठी पक्षानं शिवसेनेशी (ठाकरे गट) तडजोड केली. मी निवडणूक लढावी अशी जनतेची इच्छा आहे. तसंच जेव्हा मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, तेव्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं कधीच वाटलं नव्हतं. मी काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच आपलं कार्य करत होतो. मात्र, ही जागा ठाकरे गटाला मिळाल्यानंतर मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला. यासंदर्भात पक्षाकडून मला कोणतेच आदेश आलेले नव्हते. त्यामुळं मी पक्षाच्या आदेशाची अवज्ञा केली असं मला वाटत नाही", असं पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ठाकरे गटावर टीका : " सांगलीत काँग्रेसची विचारधारा आणि तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो इंडिया आघाडीच्या युतीसाठी कटिबद्ध आहे. काँग्रेस इंडिया आघाडीत राहण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळं ठाकरे गटाला ती जागा हवी होती. तसंच या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती काम केलंय हेही ठाकरे गटाला माहित होतं. त्यामुळं मत हस्तांतरणासाठी ठाकरे गटानं ही जागा घेतली," आरोपही विशाल पाटील यांनी केला.

चंद्रहार पाटील काय म्हणाले? : विशाल पाटील यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील म्हणाले की, "काँग्रेस 2014 पासून ही जागा गमावत आहे. 2014 मध्ये त्यांचे भाऊ केंद्रीय मंत्री होते. पण तरीही ते हरले. 2019 मध्ये तर काँग्रेसला ही जागा मिळालीच नाही. 2014 ते 2024 पर्यंत काँग्रेस कुठेच नव्हती. मग सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा दावा ते कसं करू शकतात?", असा सवाल चंद्रहार पाटील यांनी केला. "तसंच विशाल पाटील हे भाजपाची 'बी' टीम असून त्यांच्याच सांगण्यावरून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत," असा आरोपही चंद्रहार पाटील यांनी केला.

हेही वाचा -

  1. सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी, विशाल पाटील आजच्या बैठकीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार? - Sangli Congress
  2. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तणाव वाढला; काँग्रेसचा दावा असताना उबाठा गटाने उमेदवार दिल्यानं नाराजी, विश्वजित कदम विशाल पाटील संतप्त - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभा निवडणूक 2024 : तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार आजमावणार आपलं नशीब, बारामती, सांगली चर्चेत - Lok Sabha Election 2024
Last Updated :May 2, 2024, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details