महाराष्ट्र

maharashtra

लोकसभेच्या तोंडावर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, जाणून घ्या राजकीय अर्थ

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 8:45 PM IST

Narayan Rane News भाजपाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या भेटीमागील राजकीय अर्थ जाणून घेऊ

Narayan Rane Meet CM Eknath Shinde
Narayan Rane Meet CM Eknath Shinde

मुंबई Narayan Rane News - केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही नेमकी कुठल्या कारणासाठी झाली, याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, राज्यसभेतून नारायण राणे यांचा पत्ता पक्षानं कापण्यात आलाय. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक लढवावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

एकनाथ शिंदे गटाचं लागणार सहकार्य-राज्यसभेतून बाहेर झाल्यानंतर लोकसभेबाबत प्रश्नचिन्ह- कोकणात नारायण राणे यांचा दबदबा मानला जातो. परंतु कोकणात शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे. अशात आता शिवसेनेचे दोन गट झाल्यानं कोकणी माणूस दोन गटात विखुरला गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नारायण राणे यांना रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढावी लागण्याची शक्यता आहे. जर भाजपानं त्यांना निवडणूक लढवण्यास भाग पाडले तर त्यांना शिंदे गटाचे समर्थनसुद्धा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. याच कारणानं नारायण राणे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.



कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा जिंकायची-रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं असून विनायक राऊत हे येथील खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून नारायण राणे यांना निवडणूक लढविण्याचा आदेश पक्षानं दिल्यास नारायण राणे यांना विजयासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची ताकद मोठ्या प्रमाणात लागणार आहे. याच कारणासाठी कशा पद्धतीनं रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात रणनीती आखता येईल? या दृष्टीनं ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला जिंकायची आहे. त्यामुळे राजकीय गणितं काय असू शकतात या संदर्भात सुद्धा राणे - शिंदे यांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.



शिवसेना शिंदे गट जागा सोडेल का?भाजपानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जरी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा देऊ केली असली तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गट ही जागा भाजपला सोडेल का? हा प्रश्नही निर्माण झाला आहे. याच अनुषंगानं नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकसभा जिंकून राजकीय सामर्थ्य सिद्ध करावं लागणार-राजकीय विश्लेषकांच्या मते राणेंच्या राजकीय कारकिर्दीच्या आलेखाला काहीसा उतार लागला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून राणे हे कोकणात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवतील अशी भाजपाला अपेक्षा होती. मात्र, गेल्या सहा वर्षात कोकणात राणेंची ताकद वाढण्याऐवजी कमी झाली. तसचं भाजपाचं सामर्थ्यदेखील कोकणात वाढलेलं नाही. अशा काळात राणेंना राजकीय सामर्थ्य दाखविण्याबरोबर भाजपासाठी उपयुक्तता दाखवावी लागणार आहे.

हेही वाचा-

  1. अशोक चव्हाणांमुळं नारायण राणेंची पुन्हा राजकीय गोची?
  2. भाजपाच्या नीतीचा प्रत्यय आता नारायण राणेंना आलेला आहे - खासदार विनायक राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details