महाराष्ट्र

maharashtra

चिमुरड्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेस रंगेहात अटक

By

Published : May 23, 2021, 7:48 PM IST

Updated : May 23, 2021, 8:38 PM IST

आरोपी महिला बालसुधारगृहात आयाचे काम करत होती. या काळात तिने दत्तक घेण्यासाठी येणाऱ्या पालकांचे संपर्क क्रमांक मिळवल्यानंतर नोकरी सोडली. या दरम्यान तिला दत्तक प्रक्रिया किचकट असल्याची आणि पालकांना मुल दत्तक मिळण्यास काही वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती मिळाली. यामुळेच तिने गरजू पालकांना हेरून त्यांना किचकट दत्तक प्रक्रियेविना मुले मिळवून देण्याचा गोरखधंदा सुरू केला.

आरोपी
आरोपी

ठाणे - बेकायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे मुलाची परस्पर खरेदी विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्हा महिला बाल सरक्षण कक्ष आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे मुल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांना हेरून गरीब पालकांना पैशाचे आमिष दाखवत त्यांची मुले विकणाऱ्या महिलेला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात जिल्हा महिला व बाल सरक्षण कक्षासह कल्याण गुन्हे शाखेने रंगेहाथ अटक केली आहे. तसेच स्वतःच्या मुलाची विक्री करणाऱ्या दाम्पत्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पाच महिन्याच्या चिमुरड्याला महिला बाल विकास विभागाच्या ताब्यात दिले आहे. मानसी जाधव, असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

माहिती देताना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

आरोपी बालसुधारगृहात करायची आयाचे काम

आरोपी मानसी जाधव ही महिला काही महिने डोंबिवलीतील जननी आशिष बालसुधारगृहात आयाचे काम करत होती. या काळात तिने दत्तक घेण्यासाठी येणाऱ्या पालकाचे संपर्क क्रमांक मिळवल्यानंतर नोकरी सोडली. या दरम्यान तिला दत्तक प्रक्रिया किचकट असल्याची आणि पालकांना मुल दत्तक मिळण्यास काही वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती मिळाली. यामुळेच तिने गरजू पालकांना हेरून त्यांना किचकट दत्तक प्रक्रियेविना मुले मिळवून देण्याचा गोरखधंदा सुरू केला.

जागृत कुटुंबामुळे प्रकार उघडकीस

उल्हासनगर येथील एका गरीब दाम्पत्याला पैशाचे आमिष दाखवत त्यांना त्यांच्या मुलांपैकी एका मुलाची विक्री करण्यास तयार केले. यानंतर जननी आशिष नोंदणी केलेल्या एका व्यक्तीला फोन करत आपल्याकडे एक पाच महिन्याचे बालक असून ते दोन लाखात विकण्यास तयार असल्याचे सांगत व्यवहार सुरू केला. मात्र, प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीरपणे मुल दत्तक घेणे योग्य नसल्याची कल्पना असलेल्या त्या कुटुंबाने याबाबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाने कल्याण गुन्हे शाखेकडे तक्रार केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त कडलक यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला यासाठी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनाच बनावट ग्राहक बनविण्यात आले. शनिवारी (दि. 22 मे) सकाळी या बनावट ग्राहकांनी आरोपी महिलेकडून 5 महिन्याच्या बालकाची 1 लाख 60 हजार आणि 30 हजार अशा 1लाख 90 हजार रुपये किंमतीत खरेदी केली. या दरम्यान आरोपी महिलेसह या बालकाची विक्री करणाऱ्या आई वडिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी महिलेने यापूर्वीही मुले विक्री केल्याचे आले समोर

आरोपी महिलेने यापूर्वी 2 ते 3 बालकांची विक्री केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, अशा कारवाईमुळे बेकायदेशीर मानवी तस्करीस निश्चितच आळा बसेल, असा विश्वास रामकृष्ण रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला दिला शंभर तोळे सोन्याचा हार.., त्यानंतर पतीची 'अशी' झाली धावपळ..

Last Updated : May 23, 2021, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details