महाराष्ट्र

maharashtra

घोडबंदर येथे कायमस्वरूपी सुरू होणार आरटीओ उपकेंद्र; पुढील आठवड्यात परिवहनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By

Published : Dec 18, 2020, 3:39 PM IST

मीरा भाईंदर शहर हे ठाणे जिल्ह्यात मोडते. मात्र हे शहर ठाणे शहरापासून २५ किलोमीटर लांब आहे. तसेच शहराची लोकसंख्या तेरा लाखाच्या घरात असल्यामुळे या शहराला स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.

rto
rto

मीरा भाईंदर(ठाणे) -मीरा भाईंदर शहरातील नागरिकांकरिता घोडबंदर येथे कायमस्वरूपी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ )चे उप-केंद्र सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. या केंद्रात प्रादेशिक परिवहन विभागाशी संबंधित सर्व कामे करण्यात येणार असल्यामुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांना भविष्यात ठाण्याच्या दिशेने जाण्याची गरज भासणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात परिवहनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मीरा भाईंदर शहर हे ठाणे जिल्ह्यात मोडते. मात्र हे शहर ठाणे शहरापासून २५ किलोमीटर लांब आहे. तसेच शहराची लोकसंख्या तेरा लाखाच्या घरात असल्यामुळे या शहराला स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यानुसार केवळ आठवड्यातील दोन दिवस घोडबंदर येथे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शिबीर आयोजित करून हे काम पार पाडण्यात येत होते.मात्र दिवसोंदिवस वाढत चालल्या मागणीमुळे या शहरात कायम स्वरूपी ठाणे प्रादेशिक परिवहन उपकेंद्र सुरु करण्याच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार घोडबंदर येथील बस आगाराला लागून असलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात हे सुरु करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वास्तूचा वापर करून कॅम्पुटर आणि कर्मचाऱ्यांची सोय ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फ़त करण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

आरटीओसाठी इमारत उभारणीची मागणी

राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फ़त मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर भागात ठाणे आरटीओ उप-केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासाठी देण्यात आलेली ही जागा तात्पुरत्या स्वरूपाची आहे .त्यामुळे येत्या दिवसात पालिका प्रशासनाने आरटीओसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षित भूखंडावरील जागेत इमारतीची निर्मिती करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त विजय राठोड यांच्याकडे केली आहे.

दीड हजार युवकांचे परवाने प्रलंबित -

मीरा भाईंदर शहरातील युवकांना वाहन परवाना मिळवण्याकरिता ठाणे आरटीओ केंद्रात जावे लागते. मात्र, या केंद्रात कामाचा भार अधिक असल्यामुळे मीरा भाईंदर शहरातील युवकांचे सुमारे दीड हजार परवाने प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे घोडबंदर येथे सुरु होणाऱ्या आरटीओ उप-केंद्रामुळे ही अडचण दूर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details