महाराष्ट्र

maharashtra

पंढरपुरात अवैध वाळू तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By

Published : May 4, 2021, 6:54 PM IST

पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथे दोन तरुण अवैधरित्या बैलगाडीतून वीस पांढऱ्या सिमेंटच्या गोण्याच्या पोत्यातून वाळू घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली.

पंढरपूर पोलीस
पंढरपूर पोलीस

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीपात्रातून वाळू उपसा जिल्हाधिकाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आला आहे. मात्र वाळूमाफिया हे चोरट्या मार्गाने वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न करत असतात. पंढरपूर शहरातील वाळूमाफियांनी काही दिवसांपूर्वी गाढवांचा वापर केला होता. आता चक्क बैलगाडी व बैलांचा वापर करून वाळू चोरण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथे दोन तरुण अवैधरित्या बैलगाडीतून वीस पांढऱ्या सिमेंटच्या गोण्याच्या पोत्यातून वाळू घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक बैलगाडी व दोन बैलांसह 54 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बैलगाडीसह दोन बैल पोलिसांकडून जप्त..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथे भीमा नदीपात्रातून बैलगाडीच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी 3 मे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास शिरढोण गावातील खंडोबा मंदिराजवळ एक बैलगाडी जात असल्याचे दिसून आली. सदर पथकाला बैलगाडीबाबत संशय आला. त्यांनी थांबायला सांगितले. तेव्हा बैलगाडी चालक व सोबत असणारा व्यक्ती पोलिसांना पाहताक्षणी पळून गेले. बैलगाडीतून अर्धवट भरलेली 20 वाळूचे पोते आढळून आले. सदर बैलगाडी व दोन बैलांसह 54 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पंढरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बैलगाडी चालक अक्षय भुसणर व सुशांत भूसणर (रा. शिरढोण) यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींविरोधात गौण खनिज कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. बैलगाडीचे बैल पोलीस ठाण्यात न ठेवता दोन्ही बैलांची रवानगी पंढरपूर येथील गोपालदास गोशाळेमध्ये करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details