महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गात थकीत पगारासाठी एसटी कामगारांचे आत्मक्लेश उपोषण

By

Published : Oct 9, 2020, 6:35 PM IST

कणकवली येथील एसटीच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. मागील तीन महिन्यापासून एसटी कामगारांचे वेतन लवकरात लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ST worker' agitation for pending salary
ST worker' agitation for pending salary

सिंधुदुर्ग - मागील तीन महिन्यापासून एसटी कामगारांचे वेतन झालेले नाही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्याचे प्रलंबित असलेले वेतन राज्य सरकार देत नाही आहे. त्यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले असल्याने त्यात त्यात एसटी महामंडळ पगार देत नसल्याने वेतनाच्या मागणीसाठी जिल्ह्यात कामगार संघटनेच्या वतीने आत्मक्लेश उपोषण करण्यात आले.

कणकवली येथील एसटीच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार संघटनेचे कामगार पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या व कुटुंबीयांच्या जीवाची जोखीम घेऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेतनाचा प्रश्न सतावत आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वेळोवेळी शासन व प्रशासन दरबारी हा प्रश्न मांडला आहे. तरीही सरकारने कामगाऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले नाही. एस.टी. कामगारांना ५० लाखाचे विमासंरक्षण दिले जात नाही. तसेच विमासंरक्षण मिळविण्यासाठी कागदपत्रे आणि अटी अशा लादल्या आहेत की त्यामुळे कामगार हैराण झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासूनचे वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेतन देण्यात यावे अशी मागणी आज कामगारांनी केली.

हे आंदोलन मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे विभागीय सचिव विनय राणे,अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर,यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी खजिनदार अनिल नर,कार्याध्यक्ष प्रवीण कोंडरकर,मालवण आगाराचे कामगार संघटना अध्यक्ष काका खोत, मंगेश नानचे आदी उपस्थित होते. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे मालवण येथील एसटी डेपो अध्यक्ष काका खोत यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details