महाराष्ट्र

maharashtra

अनधिकृत खत विक्री करणाऱ्या दुकानावर छापा, 21 लाखांचा 84 टन खतसाठा जप्त

By

Published : Jun 13, 2021, 7:42 AM IST

सांगलीच्या कृषी विभागाकडून अनधिकृत खत विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत 21 लाखांचा 84 टन खतसाठा जप्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कृषी विभागाकडून जिल्ह्यात 11 भरारी पथके नेमण्यात आले आहेत.

21 लाखांचा 84 टन खत साठा जप्त
21 लाखांचा 84 टन खत साठा जप्त

सांगली- अनधिकृतपणे खत विक्री करणाऱ्या सांगली शहारतील एका दुकानावर कृषी विभागाने छापा टाकला. या कारवाईत तब्बल 21 लाख किमतीचा 84 मेट्रीक टन खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून खताची मागणी होत असताना काही ठिकाणी खतांची अनिधिकृतपणे विक्री केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कृषी विभागाकडून जिल्ह्यात 11 भरारी पथके नेमण्यात आले आहेत.

खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके सज्ज

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना माफक दरात व गुणवत्ता पूर्ण खते-बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खतांचा काळाबाजार आणि भेसळ युक्त खत विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कृषी विभागाकडून जिल्ह्यात 11 भरारी पथके नेमण्यात आले आहेत.

अनधिकृत खत विक्री दुकानावर छापा

दरम्यान सांगली शहरातील जुना कुपवाड रोडवरील सह्याद्री नगर, गजानन कॉलनी येथील ग्लोबल इम्पोर्टस या ठिकाणी शेतकरी, किरकोळ उत्पादक आणि कृषी सेवा केंद्रांना सूक्ष्म अन्नद्रव्ये विकण्यात येत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी यांचे कार्यालय व गोडावूनवर छापा टाकला. तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात खते आढळून आले आहेत. ज्यामध्ये कॅल्शीयम नायट्रेट २ मे.टन, सल्फर (९९.९ %) २ मे.टन, सल्फर (९०%) ९०० कि.ग्रॅ, झिंक सल्फेट ४०० कि.ग्रॅ, फेरस सल्फेट २ मे.टन, मॅग्नेशीअम सल्फेट ५०, बोरॉन २ मे.टन, तसेच सिलिकॉन गोळी ५ मे.टन, सिलिकॉन पावडर १० मे.टन, हुमिक फ्लेक्स ३० मे.टन, बेन्टोनेट गोळी ३० मे.टन असा एकूण तब्बल ८४ मे.टन ३५० किलो इतका व एकूण २०,६०,६०० किंमतीचा खतांचा साठा हाती लागला आहे.

अनधिकृतपणे सुरू होती खत विक्री

याबाबत ग्लोबल इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी यांच्याकडे भरारी पथकाकडून विक्री परवाना व खरेदी पावत्यांची मागणी केली असता ते सादर करू शकले नाही. तर खतांची विक्री अनधिकृतपणे करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित विनापरवाना खताचे नमुने शासकीय खत तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अनधिकृत खतसाठा व विक्री प्रकरणी कृषी विभागाकडून संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -आक्रमक झाल्याशिवाय शिवसेनेला धडा शिकवता येत नाही - निलेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details